Mon, Aug 19, 2019 04:55होमपेज › Kolhapur › अणुशास्त्रज्ञ डॉ. काकोडकर व डॉ. प्रतापसिंह जाधव यांची चर्चा

अणुशास्त्रज्ञ डॉ. काकोडकर व डॉ. प्रतापसिंह जाधव यांची चर्चा

Published On: May 21 2018 1:05AM | Last Updated: May 21 2018 12:49AMकोल्हापूर : प्रतिनिधी

नॅशनल अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्सेस इंडियाचे प्रेसिडेंट, राजीव गांधी सायन्स अँड टेक्नॉलॉजी कमिशनचे चेअरमन जागतिक कीर्तीचे ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी रविवारी दै.‘पुढारी’च्या मुख्य कार्यालयास सदिच्छा भेट दिली. ‘पुढारी’चे संस्थापक संपादक पद्मश्री कै. डॉ. ग. गो. जाधव यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांनी अभिवादन केले. यानंतर त्यांनी मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. याप्रसंगी उभयतांनी डॉ. ग. गो. जाधव यांच्या आठवणी जागवीत स्मृतींना उजाळा दिला.

डॉ. काकोडकर म्हणाले, काही दिवसांपूर्वी शिवाजी विद्यापीठात निवडक शेतकर्‍यांची बैठक घेऊन चर्चा करून अडचणी व मते जाणून घेतली. जिल्ह्यात साखर उत्पादन व गुर्‍हाळघरांची संख्या जास्त असली, तरी गूळ भेसळयुक्‍त व गुणवत्तापूर्ण नसल्याचे बोलले जाते. नैसर्गिक व भेसळविरहीत गूळ पावडरसह इतर उत्पादनांसंदर्भात कोल्हापूर गूळ संशोधन केंद्र व शिवाजी विद्यापीठाने एकत्रितपणे काम करून नवीन चळवळ उभी केल्यास शेतकर्‍यांना पर्याय उपलब्ध होऊन त्यांचे जीवनमान उंचावेल.

डॉ. प्रतापसिंह जाधव म्हणाले, महात्मा गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासमवेत डॉ. ग. गो. जाधव यांनी चळवळीत काम केले. सामाजिक कार्यात त्यांचा हिरिरीने सहभाग होता. डॉ. ग. गो. जाधव यांनी दै. ‘पुढारी’रूपी लावलेल्या रोपट्याचा वटवृक्ष झाला आहे. स्पर्धेच्या युगात चीनसारख्या देशाने वृत्तपत्र कागदावरील पुनर्प्रक्रिया बंद केली आहे. त्यामुळे कॅनडा, रशियातून कागद मागविण्याची वेळ आली आहे. दर महिन्याला वृत्तपत्र कागदाच्या किमतीत वाढ होत असून, खर्च दुप्पट झाला आहे. अशा परिस्थितीतही दै.‘पुढारी’चा स्वतंत्र वृत्तपत्र म्हणून दर्जा कायम असल्याचे त्यांनी सांगितले.

डॉ. जाधव म्हणाले, सर्वच राजकीय पक्ष, संस्था, संघटनांबरोबर संबंध चांगले आहेत. अनेक सामाजिक प्रश्‍नांना वाचा फोडून सोडवणूक केली आहे. ऊस आंदोलनात सहभागी होऊन दराची कोंडी फोडण्याचा प्रयत्न सातत्याने केला आहे. साखरेबरोबर इतर उत्पादने वाढविल्यास शेतकर्‍यांना याचा नक्‍कीच फायदा होईल. डॉ. जयंत नारळीकर, डॉ. वसंत गोवारीकर यांच्यासारखी बोटांवर मोजण्याएवढी मराठी शास्त्रज्ञांची नावे आहेत. परंतु, डॉ. काकोडकर यांचा अणुशास्त्रज्ञ म्हणून नावलौकिक पाहिल्यानंतर मराठी माणूस एवढ्या मोठ्या पदावर असल्याचा अभिमान वाटतो, असे गौरवोद‍्गार डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी काढले.

डॉ. काकोडकर म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यात ऊस क्षेत्र जास्त आहे. साखरेपेक्षा येथील गूळ खूप प्रसिद्ध असल्याने भाव जास्त आहे. ‘आयसीटी’ संस्थेला गूळ पावडर प्रकल्प सुरू करण्याबाबत सांगितले. परंतु, काही कारणास्तव ते लांबणीवर पडले. ‘आयआयटी’ने वारणानगर येथे प्रकल्प उभारला आहे. तो सर्वांना पाहण्यासाठी खुला करण्याची गरज आहे. शेतकर्‍यांच्या उत्पादनांना पर्याय मिळावा म्हणून प्रयत्न सुरू असल्याचे डॉ. काकोडकर यांनी सांगितले. यावेळी शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, वरिष्ठ उपकुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, प्रा. डॉ. रत्नाकर पंडित आदी उपस्थित होते.

सियाचीनमध्ये रुग्णालय उभारल्याचे समाधान

कारगिल युद्धावेळी हजारो जवान युद्धभूमीवर जखमी झाले. त्यांना वेळेत उपचार मिळत नसल्याचे मेजर जनरल शिवाजीराव पाटील यांच्याकडून समजले. तत्कालीन संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस यांच्यासमवेत चर्चा करून जवानांना वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी रुग्णालय उभारण्याचा मानस व्यक्‍त केला. त्यानुसार दै.‘पुढारी’ने सियाचीन येथे अडीच कोटी खर्चाचे सुसज्ज रुग्णालय उभारले. या रुग्णालयातून आतापर्यंत 44 हजार जवान उपचार घेऊन बाहेर पडले आहेत. गेली 15 वर्षे दै.‘पुढारी’ सर्व गोष्टी रुग्णालयास पुरवीत आहे. सियाचीनसारख्या अतिउच्च युद्धभूमीवर रुग्णालय उभारल्याचे समाधान इतर कोणत्याही गोष्टीतून मिळणार नाही, अशी कृतज्ञ भावना दै.‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी व्यक्‍त केली.