Thu, Apr 25, 2019 15:28होमपेज › Kolhapur › सेलिब्रेटींच्या सामन्याने जिंकली फुटबॉलप्रेमींची मने

सेलिब्रेटींच्या सामन्याने जिंकली फुटबॉलप्रेमींची मने

Published On: Apr 15 2018 1:33AM | Last Updated: Apr 15 2018 1:33AMकोल्हापूर : क्रीडा प्रतिनिधी 

एरव्ही समाजाच्या विविध क्षेत्रांत वेगवेगळ्या पदांवर सक्रिय असणार्‍या प्रतिष्ठीत व्यक्तींनी आपली ओळख बाजूला ठेवून सर्वसामान्य खेळाडूंप्रमाणे मैदान गाजवत फुटबॉलप्रेमींची मने जिंकली. वय-वजन-उंची,  शारीरिक क्षमता याची पर्वा न करता धडधाकड खेळाडूंप्रमाणे कामगिरी करून त्यांनी ‘हम भी किसीसे कम नही...’ हे दाखवून दिले. 

निमित्तं होतं श्री नेताजी तरुण मंडळ व कोल्हापूर स्पोर्टस् डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह (केएसडीआय) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘अटल चषक’ फुटबॉल स्पर्धेअंतर्गत झालेल्या सेलिब्रेटींच्या सामन्याचे. अत्यंत चुरशीच्या आणि अटीतटीच्या सामन्यात शाहू रॉयल्स संघाने राजाराम वॉरिअर्स संघावर 3-2 अशा गोलफरकाने मात करून विजय मिळविला. शाहू वॉरिअर्सकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू अनिकेत जाधव याने दोन तर चंद्रकांत जाधव यांनी एका गोलची नोंद केली. उत्तरादाखल राजाराम वॉरिअर्सच्या धैर्यशील माने व राजू साळोेखे यांनी प्रत्येकी एका गोलची परतफेड केली. 

छत्रपती शाहू स्टेडियमवर हजारो फुटबॉलशौकिनांच्या उत्साही उपस्थितीत शनिवारी सामना रंगला. जिल्हाधिकारी डॉ. अविनाश सुभेदार यांच्या हस्ते सामन्याचे उद्घाटन झाले. केएसडीएचे अध्यक्ष सुजय पित्रे व सचिव दिग्विजय मळगे यांनी सर्वांचे स्वागत केले.

मध्यंतरापर्यंत सामना तुल्यबळ
सामन्याच्या सुरुवातीपासूनच दोन्ही संघांकडून प्रोफेशनल खेळाडूंप्रमाणे शॉर्टपासिंगसह जलद खेळाचा अवलंब करण्यात आला. आघाडीसाठी जोरदार चढाया करण्यात आल्या. शाहू वॉरिअर्सच्या अनिकेतच्या पासवर उद्योजक चंद्रकांत जाधव यांचा प्रयत्न फोल ठरला. मात्र, दुसर्‍या चढाईत अनिकेतच्या पासवरच चंद्रकांत जाधव यांनी गोल नोंदवत संघाला आघाडी मिळवून दिली. ही आघाडी फार काळ टिकू शकली नाही. 

राजाराम वॉरिअर्सकडून आ. चंद्रदीप नरके यांचा फटका गोलरक्षक सर्जेराव साळुंखे यांनी रोखला. महेश जाधव यांच्या पासवर धैर्यशील माने यांचा फटका गोलपोस्टला थडकला. ऋतुराज क्षीरसागर यांच्या पासवर नगरसेवक संभाजी जाधव यांची संधी हुकली. पाठोपाठ धैर्यशील माने यांनी मोठ्या डी बाहेरून मारलेल्या फटक्याने गोलपोस्टचा अचूक वेध घेतल्याने मध्यंतरापर्यंत सामना 1-1 असा बरोबरीत झाला. 

आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटूमुळे पारडे जड
पूर्वार्धातील बरोबरीमुळे उत्तरार्धातील सामना अधिकच रंगतदार बनला. दोन्ही संघांकडून आघाडीसाठी पुन्हा प्रयत्न झाले. शाहू वॉरिअर्सच्या अनिकेत जाधव, चंद्रकांत जाधव, आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, सीईओ कुणाल खेमनार, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी जोरदार चढाया केल्या. अनिकेतने सहज गोल नोंदवत पुन्हा आघाडी मिळविली. पाठोपाठ राजाराम वॉरिअर्सकडून झालेल्या चढाईत गोलक्षेत्रातील गोंधळाचा फायदा घेत राजू साळोखे यांनी गोलची परतफेड केली. यामुळे सामना 2-2 असा बरोबरीत झाला. आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू अनिकेत जाधवमुळे शाहू रॉयल्सचे पारडे जडच होते. अनिकेतने वैयक्तिक दुसरा आणि संघाकडून तिसरा गोल नोंदवत सामन्यात 3-2 अशी आघाडी मिळविली. 

अनिकेतच्या आक्रमक चढाया सुरूच होत्या. दै. ‘पुढारी’चे व्यवस्थापकिय संपादक डॉ. योगेश जाधव यांनी अनिकेतच्या दोन-तीन चढाया फोल ठरविल्या. डॉ. योगेश जाधव यांच्यासह आ. चंद्रदीप नरके, धैर्यशील माने यांनी गोल फेडण्यासाठी  केलेल्या चढाया अपयशी ठरल्याने सामना शाहू वॉरिअर्सने 3-2 असा जिंकला..  

शाळेत मित्रांसोबत फुटबॉल खेळलो. त्यानंतर रायफल शूटिंगमध्ये गुंतल्यामुळे फुटबॉल खेळण्याची संधी मिळाली नाही. अटल चषकाच्या निमित्ताने शाहू स्टेडियमवर फुटबॉल खेळण्याचा आनंद लुटता आला.  
- डॉ. योगेश जाधव,व्यवस्थापकीय संपादक, दै. ‘पुढारी’

सेलिब्रेटींच्या सामन्यामुळे समाजातील विविध क्षेत्रांत कार्यरत असणार्‍या व्यक्तींना खेळाचे मैदान गाजविण्याची संधी मिळाली आहे. असे उपक्रम नव्या पिढीला प्रेरणादायी  आहेत. 
- कुणाल खेमनार,

जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी 

सेलिब्रेटी सामन्यामुळे पारंपरिक फुटबॉलला क्रेझ निर्माण झाली आहे. यातून नव्या-जुन्या खेळाडूंना प्रोत्साहन आणि प्रेरणा मिळणार असून, प्रत्येकाला स्वत:च्या फिटनेसबद्दल विचार करावा लागणार आहे. 
- डॉ. अभिजित चौधरी,आयुक्त, महानगरपालिका

फुटबॉल खेळाला प्रोत्साहन  देण्यासाठी ‘अटल चषक’ संंयोजकांनी आयोजित केलेली सेलिब्रेटी मॅच कौतुकास्पद आहे. यामुळे नव्या-जुन्या काळाचा समन्वय साधून नवोदितांना बरेच शिकण्याची संधी मिळते. 
आ. चंद्रदीप नरके

कोल्हापूरच्या फुटबॉलला शतकी परंपरा आहे. तिच्या जतन-संवर्धन-संरक्षणासह विकासासाठी ‘अटल चषक’ सारख्या स्पर्धा गरजेच्या आहेत. सेलिब्रेटींच्या सामन्या सारख्या उपक्रमातून फुटबॉलला प्रोत्साहन मिळणार आहे.
- धैर्यशील माने

‘सैराट’ची आर्ची, सुवर्णकन्या तेजस्विनीची आज उपस्थिती
स्पर्धेचा अंतिम सामना आज (दि. 15) दुपारी साडेतीन वाजल्यापासून छत्रपती शाहू स्टेडियमवर बलाढ्य पाटाकडील तालीम मंडळ ‘अ’  विरुद्ध प्रॅक्टिस फुटबॉल क्लब ‘अ’ यांच्यात होणार आहे. ‘फायनल’ मधून 5 लाख रुपयांच्या बक्षीसाचा विजेता कोण? आणि 3 लाखांचा उपविजेता कोण? हे ठरणार आहे. याशिवाय मालिकावीर, उत्कृष्ट खेळाडू अशी हजारो रुपयांची  बक्षीसे कोण-कोण जिंकणार याकडे तमाम फुटबॉलशौकीनांचे लक्ष लागले आहे. सामन्यासाठी आंतराष्ट्रीय नेमबाजपटू- कोल्हापूरची सुवर्णकन्या तेजस्विनी सावंत-दरेकर, फुटबॉलच्या ए लायसन्स प्रशिक्षण कोर्स उत्तीर्ण करणारी भारताची पहिली (गडहिंग्लजची कन्या) अंजना तुरंबेकर, ‘सैराट’ चित्रपटातील अभिनेत्री रिंकू राजगुरू (आर्ची), आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू अनिकेत जाधव  यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. सामन्यानंतर बक्षीस समारंभ पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आणि केएसएचे चिफ पेट्रन शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. सामन्यापूर्वी दुपारी साडेतीन वाजता, तेजस्विनी मिरवणूक काढण्यात येणार आहे. यावेळी क्रीडाप्रेमींनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सेलिब्रेटी सामन्यातील संघ असे : 
•

राजाराम वॉरिअर्स : दै. ‘पुढारी’चे व्यवस्थापकीय संपादक डॉ. योगेश जाधव, आ. चंद्रदिप नरके, देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, भाजपचे जिल्हाध्यक्ष संदिप देसाई, नगरसेवक संभाजी जाधव, विजय खाडे, संतोष गायकवाड, धैर्यशील माने, ऋतूराज क्षीरसागर, पृथ्वीराज महाडिक, गोलरक्षक मनोज साळोखे, श्री नेताजी तरुण मंडळाचे अध्यक्ष राजू साळोखे. प्रशिक्षक राजेंद्र राऊत. 
•

शाहू रॉयल्स :  जि.प.चे मुख्य कार्य. अधिकारी डॉ. कुणाल खेमणार, मनपाचे आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, चारुदत्त जोशी, उद्योजक चंद्रकांत जाधव, केएसएचे फुटबॉल सचिव राजेंद्र दळवी,  आंतराष्ट्रीय फुटबॉलपटू अनिकेत जाधव, अभिनेता विकास पाटील व धनंजय पाटील, राजू साठे, तुषार देसाई, गोलरक्षक सर्जेराव साळुंखे. प्रशिक्षक प्रदिप साळोखे.