Thu, Apr 25, 2019 12:22होमपेज › Kolhapur › ‘अटल’ चषकाची शहरात मोटारसायकल रॅली

‘अटल’ चषकाची शहरात मोटारसायकल रॅली

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कोल्हापूर : क्रीडा प्रतिनिधी 

मैदान गाजविणार्‍या खेळाडूंना लाखो रुपयांच्या भरघोस बक्षिसांचे पाठबळ देणार्‍या आणि व्यावसायिक फुटबॉलची नांदी घेऊन आलेल्या ‘अटल’ चषक फुटबॉल स्पर्धेच्या पार्श्‍वभूमीवर रविवारी क्रीडानगरी कोल्हापुरातून भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली. स्पर्धेत सहभागी तालीम-मंडळांच्या फुटबॉल संघांना भेटी देऊन एकमेकांना शुभेच्छा देण्यात आल्या. मंडळ परिसरातील महिलांनी चषकाला औक्षण केले. तर आबालवृद्धांनी चषकासह आवर्जून सेल्फी घेतले.  

रविवारी सायंकाळी फुलेवाडी येथील फुलेवाडी फुटबॉल संघाजवळ रॅलीचे उद्घाटन पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांच्या हस्ते झाले. श्री नेताजी तरुण मंडळाचे अध्यक्ष राजू साळोखे, ‘केएसडीआय’चे अध्यक्ष सुजय पित्रे, भाजपचे जिल्हाध्यक्ष संदीप देसाई, अशोक  देसाई, तुषार देसाई, हेमंत अराध्ये, हेमंत कांदेकर, राजेंद्र राऊत, प्रदीप साळोखे, दिग्विजय मळगे, राजू साठे, अमित शिंत्रे, शेखर वळीवडेकर, विवेक वोरा, दीपक सुतार आदी यावेळी उपस्थित होते.  

स्पर्धेत सहभागी संघांच्या किटच्या रंगांचे ध्वज घेऊन, एकसारखे टी-शर्ट परिधान करून, स्पर्धेचे स्टीकर लावलेल्या मोटारसायकली घेऊन फुटबॉल खेळाडू व क्रीडाप्रेमीस्वार एका शिस्तीने रॅलीत सहभागी झाले होते. फुलेवाडीपासून सुरू झालेली रॅली रंकाळा, शिवाजी पेठ, उत्तरेश्‍वर पेठ, बुधवार पेठ, रविवार पेठ, मंगळवार पेठ अशा मार्गावरून नेण्यात आली. रॅलीदरम्यान, फुलेवाडी क्‍लब, संध्यामठ तरुण मंडळ, खंडोबा तालीम मंडळ, शिवाजी तरुण मंडळ, साईनाथ स्पोर्टस्, उत्तरेश्‍वर प्रासादिक तालीम मंडळ, जुना बुधवार पेठ, दिलबहार तालीम, पाटाकडील तालीम, प्रॅक्टिस क्‍लब आणि बालगोपाल तालीम या संघांना भेटी देण्यात आल्या. 

दिमाखदार उद्घाटन सोहळा

दरम्यान, स्पर्धेचा दिमाखदार उद्घाटन सोहळा छत्रपती शाहू स्टेडियमवर बुधवारी (दि. 28) सायंकाळी 4 वाजता होणार आहे. स्पर्धेत सहभागी संघ आपापल्या रंगांच्या किटस्मध्ये सहभागी होऊन संचलन करणार आहेत. कलानगरी कोल्हापूरच्या नावलौकिकास साजेशा सांस्कृतिक कार्यक्रमांची विविधता यावेळी उपस्थितांना पाहायला मिळणार आहे. गुरुवारी (दि. 29) सायंकाळी 4 वाजता, स्पर्धेतील पहिला सामना होणार आहे. स्पर्धेचे लॉटस् (वेळापत्रक) दि. 27 रोजी जाहीर करण्यात येतील.

सेलिब्रिटींच्या उपस्थितीत सामने

दररोज होणार्‍या सामन्यांना विविध क्षेत्रांतील नामवंत सेलिब्रिटींची उपस्थिती असणार आहे. यात राजकीय पक्षांचे लोकप्रतिनिधी, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय खेळाडू यांचा सहभाग असणार आहे. अंतिम सामना आणि बक्षीस समारंभास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, क्रीडामंत्री विनोद तावडे आदींची उपस्थिती असणार आहे.  

ज्येष्ठांचा आज सत्कार 

दरम्यान, स्पर्धेच्या निमित्ताने फुटबॉल परंपरा विकसित करणार्‍या ज्येष्ठ फुटबॉलपटूंचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. सोमवारी (दि. 26) आणि मंगळवारी (दि. 27) सायंकाळी 4 वाजता अनुक्रमे उभामारुती चौक शिवाजी पेठ आणि बालगोपाल तालीम मंगळवार पेठ येथे सत्कार समारंभ होणार आहे. यावेळी क्रीडाप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

स्पर्धेची वैशिष्ट्ये...

पश्‍चिम महाराष्ट्रातील सर्वाधिक बक्षिसांची स्पर्धा 
विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा सेलिब्रिटी सामना 
आंतरराष्ट्रीय दर्जाच्या फुटबॉलचा वापर
पहिल्या फेरीपासून संघांना बक्षिसाची हमी 
फुटबॉलप्रेमींसाठी लकी ड्रॉतून आकर्षक बक्षीस 
महिलांना लकी ड्रॉद्वारे पैठणी साडीचे बक्षीस 
शहरभर फुटबॉल्सच्या कटाऊटस्ची विविधता 
मैदानावर शिवछत्रपती, राजर्षी शाहूंच्या प्रतिमा 
नवीन स्कोर बोर्ड, स्टेडियमच्या प्रेक्षक गॅलरीला सप्‍तरंग

 

Tags : kolhapur, kolhapur news, Atal Cup Football Tournament, Motorcycles rally,


  •