होमपेज › Kolhapur › अटलजींचं कोल्‍हापूरशी अतूट नातं

अटलजींचं कोल्‍हापूरशी अतूट नातं

Published On: Aug 17 2018 12:19AM | Last Updated: Aug 17 2018 10:52AMकोल्‍हापूर : पुढारी ऑनलाईन

कवी मनाचे माजी पंतप्रधान भारतरत्‍न अटल बिहारी वाजपेयी यांचं आज (१६ ऑगस्‍ट) निधन झालं. यानंतर संपूर्ण देश शोकसागरात बुडाला आहे. अटलजींचं निधण झालं असलं तरी त्यांच्या स्‍मृती, त्यांच्या कविता, संसदेतील गाजलेली भाषणं, गाजवलेले राजकीय फड हे अगदी कोरल्यागत भारतीयांच्या मनपटलावर कायम राहणार आहे. अटलजींचं कोल्‍हापूरशी नातंही जिव्‍हाळ्याचं राहिलं आहे. ते कित्येकदा कोल्‍हापुरात आले, राहिले, फिरले आणि रंकाळ्यावर विसावलेही. तत्‍कालीन जनसंघ आणि सध्याच्या भाजपची मातृसंस्‍था असणार्‍या राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांशी त्यांनी कोल्‍हापुरात येऊन संवादही साधला. 

अटलजींचा सहवास कोल्‍हापुरातील अनेकांना लाभला. अटलजी कोल्‍हापुरात आल्यावर ज्यांचा त्यांच्याशी सहवास राहिला. ज्यांनी संघाच्या नियमानुसार दिन प्रमुख म्‍हणून अटलजींच्या सहवासात एक अख्‍खा दिवस व्यतीत केला. यापैकीच एक माधव श्रीपतराव ठाकूर. त्यांनी अटलजींच्या सहवासातील आठवणींचा पट 'पुढारी ऑनलाईन'शी बोलताना उलगडला. 

अटलजी एकदा कोल्‍हापूर दौर्‍यावर येणार होते. दौर्‍यात एक कार्यक्रम संगीत तर दुसरा कृषी क्षेत्राशी संबंधित होता. वसंतदादांनी उत्तर प्रदेशातून एक कृषी तज्ज्ञ आणले होते. द्राक्ष बागायतीसंदर्भात हा कार्यक्रम होता. या कार्यक्रमाला अटलजींची उपस्‍थिती होती. यावेळी ते बोलले परंतु विशेष हे की यामध्ये कोणतीही राजकीय भाषणबाजी नव्‍हती. त्यांचं सगळं बोलणं हे कृषी क्षेत्राशी निगडीत असंच होतं. यावेळी कार्यक्रमाला मारूती मानेही हजर होते. त्यांना अटलजींचं भाषण एवढं भावलं की कार्यक्रम संपल्यानंतर माने यांनी अक्षरश: अटलजींना मिठी मारली. 

कार्यक्रमावरून परतत असताना अटलजींची गाडी हातकणंगलेतील हालुंडीजवळ रात्रीच्या वेळी पंक्‍चर झाली. यावेळी सहकार्‍यांनी त्यांना दुसर्‍या गाडीत जाण्याची विनंती केली. बरोबर प्रकाश जावडेकरही होते. यावेळी अटलजी खूप थकले होते. त्यांनी गाडीतच पाणी मागितले. त्यांना थंड पाणी लागायचं. सहकार्‍यांनी थंड पाणी दिलं. थंड पाणी पिऊन हायसं वाटल्याचं त्यांनी सहकार्‍यांशी बोलून दाखवलं. नंतर आम्‍ही शासकीय विश्रामगृहावर परतलो. तेव्‍हा अटलजींना तिथं भिंतीवर लावलेलं रंकाळ्याचं चित्र दिसलं. त्यांनी त्याची चौकशी केली. 

अटलजींना महालक्ष्‍मी मंदिराजवळच रंकाळा असून संध्यामठ असल्याचं सांगितलं. यावर त्यांनी दुसर्‍या दिवशी त्या ठिकाणी जाण्याची इच्छा बोलून दाखविली. परंतु, पुढच्या नियोजनामुळे दुसर्‍या दिवशी जाता येणार नसल्याचे समजले. दुसर्‍या दिवशी अंबाबाईचं दर्शन घेऊन अटलजी परतणार होते. परंतु, त्यांनी रंकाळा पाहण्याचा मनोदय बोलून दाखवला. तिथे गेल्यावर संध्यामठकडे पाहून ‘संध्यामठ’चा अर्थ विचारला. विशेष म्‍हणजे अटलजींना मराठी चांगलं बोलता येत होतं. त्यांनी संध्यामठचा अर्थ जाणून घेतला. ते त्याठिकाणी खूप आनंदात दिसत होते. 

जगदीश खेबुडकरांचं कौतुक

दुसर्‍यांदा एकदा अटलजी सामाजिक समता परिषदेसाठी कोल्‍हापुरात आले होते. यावेळी सुरुवातीला एक गीत होत असे. या गीतासाठी आम्‍ही जगदीश खेबुडकर यांच्याकडे गेलो. केवळ तीनच मिनिटांत जगूनानांनी तीन कडव्यांचं एक गीत लिहलं. 

समानतेचा रथी, 
प्रजेचा जननेता सारथी
गाऊया समतेची आरती

समान संधी समाज सारा
अन्‍न, वस्‍त्र अन् एक निवारा
समतेमधूनी ममता येओ
गाऊया समतेची आरती

अटलजींना मराठी चांगलं येत असल्यानं त्यांना गाण्यातील भावार्थ लगेच समजला. त्यांनी जगदीशजींनी हे गाणं समारंभात सादर केल्यानंतर मंचावर बोलून त्यांचा सन्‍मान केला. यावेळी आपण त्यांच्यासह होतो याचा अभिमान वाटत असल्याचं माधव ठाकूर म्‍हणाले. 

छबुराव सांगलीकरांची आठवण..

अटलजी कोल्‍हापुरात आल्यावर छबुराव ऊर्फ वि.ना. सांगलीकर यांच्या घरी उतरायचे. ताराबाई रोडवर त्यांचं घर होतं. त्यांची दोन नंबरची मुलगी प्रभाताई पाटील त्यांचे पती आणि मुलगी शिमल्याला गेले होते. तेव्‍हा अटलजीही त्याठिकाणी आले होते. तेव्‍हा अटलजींना विस्‍मरणाची समस्या जाणवत होती. तेव्‍हा प्रभाताई अटलजींना भेटायला गेल्या. परंतु, त्यांना अटलजींच्या प्रकृतीमुळे भेट नाकारण्यात आली. आग्रहानंतर काही अधिक न बोलण्याच्या सूचना करून भेटीसाठी परवानगी देण्यात आली. प्रभाताईंनी जावून अटलजींना नमस्‍कार केला. तेव्‍हा अटलजींनी प्रभाताईंची तशाही अवस्‍थेत चौकशी केली. 
प्रभाताईंचं माहेर कोल्‍हापूर असल्याचं समजताच अटलजींनी छबुराव सांगलीकरांची ओळख सांगितली. यावर प्रभाताई या त्यांचीच मुलगी असल्याचं समजल्यानंतर अटलजींनी सर्व कुटुंबाला थांबवून घेतलं. त्यांच्यासह जेवण घेतलं आणि स्‍वत:च्या गाडीतून त्यांना निवासाच्या ठिकाणी सोडलं, अशी आठवण ठाकूर यांनी सांगितली. 

वक्तृत्व, नेतृत्व, कर्तृत्व देशाला कायमच प्रेरणादायी

अटलजींच्या जाण्यानं घरातली वडीलधारं माणूस गेल्याचं दु:ख होत आहे. ते कोल्‍हापुरात आल्यावर आस्‍थेनं संघटनेतील प्रत्येक कार्यकर्त्याची विचारपूस करायचे. त्याचा मनस्‍वी आनंद सर्व कार्यकर्त्यांना वाटायचा. त्यांची थाप पाठीवर पडली की संघटनेत काम करायला प्रोत्‍साहन मिळायचं. परंतु, त्यांच्या जाण्यानं अतिव दु:ख झालं आहे. जे शब्दांत सांगू शकत नाही. गेल्या काही काळात ते कार्यरत नसले तरी त्यांचं असणंही प्ररणादायी होतं. परंतु, त्यांचं जाणं संघटनेतील प्रत्येकाला पोरकं करून गेल्याचं सांगताना माधव ठाकूर यांचे डोळे पानावले. अटलबिहारी वाजपेयी यांचं वक्तृत्व, नेतृत्व, कर्तृत्व देशाला कायमच प्रेरणादायी राहील, अशा शब्दांत ठाकूर यांनी अटलजींना श्रद्धांजली वाहिली.