Wed, Apr 24, 2019 07:34होमपेज › Kolhapur › मध्यरात्री डॉल्बीच्या दणदणाटाचे पोलिसांना आव्हान

मध्यरात्री डॉल्बीच्या दणदणाटाचे पोलिसांना आव्हान

Published On: Dec 24 2017 1:44AM | Last Updated: Dec 24 2017 12:43AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी 

मध्यरात्री 12 वाजल्यानंतर कर्णकर्कश डॉल्बी सिस्टीमचा प्रचंड दणदणाट,  मोठ-मोठ्या आवाजाचे फटाके लावून दुचाकीचे सायलेन्सर काढून रस्त्यावरच वाढदिवस साजरा करण्याचा प्रकार शहरातील पेठांसह उपनगरातील नागरिकांची अक्षरश: डोकेदुखी बनला आहे. इतकेच नव्हे तर सर्वसामान्य नागरिकांची झोप उडविणार्‍या तरुणांची हुल्लडबाजी रोखण्याचे पोलिसांसमोर आव्हान उभे झाले आहे. 

काही दिवसांपूर्वी व्हिनस कॉर्नर परिसरातील कारवाई वगळता पोलिसांकडून हे प्रकार रोखण्यासाठी कोणत्याही प्रकारची उपाय-योजना होत नसल्याने नागरिकांच्या डोकेदुखीत वाढच होत आहे. व्हीनस कॉर्नर येथे चार-पाच दिवसांपूर्वी पोलिसांनी असा प्रकार रोखून संबंधितांवर कारवाई केली होती. ही घटना ताजी असतानाच दुसर्‍या दिवशी रात्री संभाजीनगर परिसरात मध्यरात्री मोटार कारमधील सिस्टीमच्या दणदणाटात वाढदिवस साजरा झाला.

रामानंदनगर परिसरातही वाढदिवसानंतर रात्री उशिरापर्यंत तरुणांचा गोंधळ सुरूच होता. इतकेच नव्हे तर शहरातील विविध पेठा आणि उपनगर परिसरात रात्री उशिरापर्यंत डॉल्बी व कार सिस्टीमचा दणदणाट सुरूच असतो. हुल्लडबाजी करणारी टोळकी बिनधास्त दंगा करून अर्वाच्च शिवीगाळ करत लोकांना नाहक त्रास देत असतात. या गोष्टी पोलिसांना दिसत नाहीत का? तक्रार केल्यानंतरच कारवाई करणार का? असे संतप्त सवाल नागरिकांतून विचारले जात आहेत. 

तक्रार करणार्‍यांवर प्रश्‍नांचा भडिमार...

गुरुवारी मध्यरात्री निवृत्ती चौक ते न्यू कॉलेज रोडवर 30 ते 40 तरुणांनी मुख्य रस्त्यावर दुचाकी लावून डॉल्बीच्या दणदणाटासह वाढदिवस साजरा करण्यात आला. यामुळे त्रस्त नागरिकांनी जुना राजवाडा पोलिसांना याबाबतची माहिती दिली. मात्र, त्यांनी तातडीने कारवाई करण्याऐंवजी तक्रार करणार्‍यांनाच प्रश्‍नांचा भडिमार करून पिडले. तुमचे नाव काय? पत्ता काय? अर्धा शिवाजी पुतळा का पूर्ण शिवाजी पुतळा? अशा प्रकारचे प्रश्‍न केले. यानंतर केवळ दोन पोलिस दुचाकीवरून याठिकाणी आले. त्यांनी वाढदिवस साजरा करणार्‍यांना दोन-चार मिनिटाच्या सूचना दिल्या आणि ते तेथून निघून गेले. पोलिस निघून जाताच हुल्लडबाजांनी पुन्हा डॉल्बीचा दणदणाट सुरूच ठेवला. यामुळे पोलिसांकडून करण्यात आलेल्या थातूर-मातूर कारवाईबद्दल नागरिकांतून संतप्त प्रतिक्रिया व्यक्‍त करण्यात आल्या.