Tue, Jun 25, 2019 22:07होमपेज › Kolhapur › अश्‍विनी बिंद्रे प्रकरणी १७ जण 'रडार'वर

अश्‍विनी बिंद्रे प्रकरणी १७ जण 'रडार'वर

Published On: Mar 20 2018 1:48AM | Last Updated: Mar 20 2018 1:48AMकोल्हापूर : दिलीप भिसे

सहायक पोलिस निरीक्षक अश्‍विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येनंतर फरारी काळात मुख्य संशयित व निलंबित पोलिस निरीक्षक अभय कुरूंदकरच्या सतत संपर्कातील तीन वरिष्ठ पोलिस निरीक्षक, पाच कॉन्स्टेबलसह सतराजण चौकशी पथकाच्या ‘रडार’वर आले आहेत. ‘गुगल मॅप’ व ‘सीडीआर’द्वारे संबंधित संशयाच्या भोवर्‍यात सापडले आहेत. त्यात कोल्हापूर, सांगली व ठाण्यातील अधिकार्‍यांसह कॉन्स्टेबलचा समावेश आहे. याशिवाय हातकणंगले, कुपवाड, विश्रामबाग व मिरजेतील काही राजकीय पक्षांशी संबंधित व कुरूंदकरच्या काळात ‘कलेक्शन’ करणार्‍या तिघांसह नऊजणांमागे नवी मुंबई पोलिसांचा ससेमिरा लागण्याची चिन्हे आहेत.

कुरूंदकर व पोलिस अधिकारी बिद्रे यांच्यातील संबंधांची त्याच्या सहकारी मित्रांना माहिती होती. बिद्रेंचा घातपात झाल्याचीही वर्तुळात दबक्या आवाजात चर्चा असतानाही संशयित व संबंधित एकमेकांच्या संपर्कात असायचे. प्रत्यक्ष, मोबाईलद्वारेही बराच काळ त्यांच्यात संभाषण चालायचे, याचा तपशीलही उपलब्ध झाला आहे, असेही वरिष्ठ सूत्राकडून समजते.
अश्‍विनी यांच्या हत्येनंतर कुरूंदकर सात महिने रजेवर होता. या काळात कोल्हापूर शहरातील एका पोलिस ठाण्यात त्याची ऊठबस होती. संबंधित ठाण्याला त्याच्या किमान सहा-सातवेळा फेर्‍या झाल्या आहेत. शहर व जयसिंगपूर

 उपविभागातील दोन पोलिस कॉन्स्टेबल व दोन झीरो पोलिसही कुरूंदकरच्या संपर्कात होते, अशीही माहिती ‘सीडीआर’ तपशीलाद्वारे पुढे आली आहे. संबंधित पोलिस व खबर्‍यांची नावेही चौकशीत निष्पन्‍न झाल्याचे समजते. 28 जून 2006 ते जून 2014  काळात कुरूंदकर सांगली पोलिस दलात कार्यरत होता. या काळात संशयित विश्रामबाग, कुपवाड व मिरज येथील मंडळींच्या गळ्यातला ताईत बनला होता. कुपवाड येथील तर ‘त्रिमूर्ती’ संशयितासाठी ‘पायघड्या’ घालत होत्या. कुरूंदकरला अटक होईपर्यंत ही सर्व मंडळी त्याच्या संपर्कात होती. खुनाच्या कटासह पुरावा नष्ट करण्याच्या कृत्यात संबंधित मंडळींचा सहभाग असावा का? याचीही चौकशी सुरू झाल्याचे वरिष्ठ सूत्राकडून समजते.
अश्‍विनी यांच्या पतीला गुन्ह्यात

अडकविण्याचा प्रयत्न

अश्‍विनी बेपत्ता झाल्यानंतर पती राजू गोरे यांनी वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांसह न्यायालयस्तरावर पाठपुरावा करताच दोन गंभीर गुन्ह्यांत त्यांना अडकविण्याचाही एका पोलिसाने प्रयत्न केला. गतवर्षी या पोलिसाची बदलीही झाली होती. तथापि, राजकीय वजन वापरून त्याची बदली रद्द करण्यात आली होती. संबंधित पोलिसावर अश्‍विनी यांचा पती, भाऊ, वडिलांच्या हालचालींवर वॉच ठेवण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती.
 

Tags : Kolhapur, Assistant police inspector, Ashwini Bidre-Gore, Ashwini Bidre-Gore murder, Abhay Kurundkar.