Fri, Feb 22, 2019 22:09होमपेज › Kolhapur › सहायक प्राध्यापक पदोन्नतीच्या मुलाखती रखडल्या

सहायक प्राध्यापक पदोन्नतीच्या मुलाखती रखडल्या

Published On: Aug 03 2018 1:35AM | Last Updated: Aug 03 2018 1:21AMकोल्हापूर : विजय पाटील 

शिवाजी विद्यापीठातील सहायक प्राध्यापकांच्या पदोन्नतीच्या मुलाखती रखडल्या आहेत. दोन महिन्यांपूर्वी शासनाचा प्रतिनिधी नसल्याचे कारण देत मुलाखतीचा नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आला होता. मुलाखती रखडण्याचे गौडबंगाल काय, असा प्रश्‍न आता उपस्थित होऊ लागला आहे. 

शिवाजी विद्यापीठात विविध विभागांत मोठ्या संख्येने प्राध्यापक काम करतात. पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी संबंधित प्राध्यापक कार्यरत असल्याने शिकवण्यासह संशोधन, पेपर प्रेझेंटेशन, कार्यशाळा, परिषदा आदींसह विविध उपक्रमांत त्यांना सहभागी व्हावे लागते. यासह विद्यार्थी संशोधकांना मार्गदर्शक म्हणून भूमिका निभवावी लागते. 

आयुष्यातील ऐन उमेदीची वर्षे शिक्षण, उच्चशिक्षण, सेट-नेट, पीएचडी, तासिका तत्त्वावर अधिव्याख्याता अशा भूमिका पार पाडल्यानंतर बहुतांश मंडळी प्रौढावस्थेत सहायक प्राध्यापक म्हणून विद्यापीठात रुजू होतात. सहायक प्राध्यापक हे सध्याच्या स्पर्धेच्या काळात खूप मेहनतीनंतर त्यांना मिळालेली संधी असते. ही संधी मिळाल्यानंतर नियमाप्रमाणे सहयोगी प्राध्यापक, प्राध्यापक अशा पदोन्नतीनंतर त्यांची जबाबदारी वाढत जाते.

शिवाजी विद्यापीठात नियमाप्रमाणे करिअर अ‍ॅडव्हान्समेंट स्कीम (कॅस) पदोन्नतीची प्रक्रिया राबवली जात आहे; परंतु किरकोळ कारणे देत ही पदोन्नती रखडत असल्याचे दिसते. पदोन्नती हा विषय सगळ्यांच्याच जिव्हाळ्याचा विषय असतो. त्यामुळे नियमाप्रमाणे आणि कायद्याप्रमाणे होणारी पदोन्नतीची प्रक्रिया का रखडली आहे की रखडवली आहे, याबाबत प्रश्‍नचिन्ह उपस्थित होत आहे. कारण, पदोन्नती मिळणारे सगळेच प्राध्यापक हे संशोधन करणारे असतात, हे वास्तव आहे. त्यामुळे संशोधन करणारे आणि विद्यार्थ्यांना संशोधन करण्यासाठी मार्गदर्शन करणार्‍या या वर्गाला नियमाप्रमाणे मिळणारी पदोन्नती मिळाली, तर ते प्रोत्साहित होतील; परंतु ही प्रक्रिया लांबली आहे. शिक्षणक्षेत्रात नियमाप्रमाणे होणार्‍या प्रक्रिया वेळेत करण्याचा संकेत असतानाही याबाबत मात्र दिरंगाईचे कारण स्पष्ट होत नाही. त्यामुळे कॅसची प्रक्रिया लवकरात राबवावी, अशी मागणी होत आहे.