Wed, Aug 21, 2019 19:47होमपेज › Kolhapur › बिंद्रे खून प्रकरणातील आमदारांवर कारवाईची मागणी

बिंद्रे खून प्रकरणातील आमदारांवर कारवाईची मागणी

Published On: Mar 13 2018 1:42AM | Last Updated: Mar 12 2018 10:17PMइचलकरंजी : प्रतिनिधी

सहायक पोलिस निरीक्षक अश्‍विनी बिंद्रे-गोरे यांच्या हत्येशी संबंधित तीन आमदारांची नावे तातडीने जाहीर करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, या मागणीचे निवेदन कोल्हापूर जिल्हा घर कामगार संघटनेच्या वतीने प्रांताधिकारी समीर शिंगटे यांना सादर करण्यात आले. 

सहायक पोलिस निरीक्षक बिंद्रे यांची हत्या अभय कुरुंदकर या पोलिस निरीक्षकाने केल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी भाजपचे आमदार व माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा भाचा राजेश पाटील याला संशयित म्हणून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ज्यादिवशी बिंद्रे यांची हत्या झाली, त्याच दिवशी संशयित अभय कुरूंदकर याने राजेश पाटील याला कळंबोली येथे फ्लॅटवर बोलावून घेतले. त्यावेळी राजेश याच्याबरोबर तीन आमदार होते, असा आरोप अश्‍विनीचे वडील, भाऊ व पतीने पत्रकार बैठक घेऊन केला आहे. त्यामुळे त्या तीन आमदारांची नावे सरकारने जाहीर करावीत व त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी.

नुकताच आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा झाला. त्यावेळी पंतप्रधानांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत सर्वांनी महिलांच्या सबलीकरणाबद्दल भाषणे दिली. अशावेळी सहायक पोलिस निरीक्षक बिंद्रे यांची पोलिस निरीक्षक असलेल्या कुरुंदकरकडून हत्या होते ही दुर्दैवाची घटना आहे. त्यामुळे या खुनाचा तातडीने तपास करून दोषींना कडक शिक्षा करण्यात यावी, हा खटला अ‍ॅड. उज्वल निकम यांच्याकडे सोपवण्यात यावा, असे निवेदनात नमूद केले आहे. मागणीकडे दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाही देण्यात आला आहे.