Mon, Jun 17, 2019 04:49होमपेज › Kolhapur › तस्करांसाठी सीमाभागात गस्तीपथके नियुक्त करा

तस्करांसाठी सीमाभागात गस्तीपथके नियुक्त करा

Published On: Feb 17 2018 2:06AM | Last Updated: Feb 17 2018 1:53AMकोल्हापूर : प्रतिनिधी

आंतरराज्य तस्करी टोळ्यासह गंभीर गुन्ह्यातील फरारी गुन्हेगारांच्या हालचालीवर करडी नजर ठेवण्यासाठी सीमाभागात ठिकठिकाणी विशेष गस्तीपथके नियुक्त करून रात्रंदिवस नाकाबंदी व संशयास्पद वाहनांच्या तपासणीचे आदेश विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनी शुक्रवारी दिले.

 कोल्हापूर परिक्षेत्रांतर्गत पोलिस अधीक्षक, अप्पर अधीक्षकांची बैठक विशेष पोलिस महानिरीक्षकांच्या दालनात झाली. यावेळी अधिकार्‍यांना मार्गदर्शन करताना नांगरे-पाटील बोलत होते. कर्नाटकातील निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर बेळगावात शनिवारी (दि. 17) ‘बॉर्डर कॉन्फरन्स’च्या अनुषंगानेही बैठकीत चर्चा झाली.

चार तास चाललेल्या बैठकीला पोलिस अधीक्षक संजय मोहिते, अप्पर पोलिस अधीक्षक तिरूपती काकडे, सांगलीचे पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा, पोलिस अधीक्षक संदीप पाटील (सातारा), वीरेश प्रभू (सोलापूर ग्रामीण), सुवेझ हक (पुणे ग्रामीण) उपस्थित होते.

पत्रकारांशी बोलताना नांगरे- पाटील म्हणाले, तस्करी टोळ्यासह गंभीर गुन्ह्यातील सराईतांचा वावर असतो. अमली पदार्थासह देशी, विदेशी दारूचीही तस्करीची रेलचेल असते. कोल्हापूर, सांगली व सोलापूर ग्रामीणला सीमावर्ती भाग संलग्न असल्याने टोळ्यांना रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबविणे गरजेचे आहे. कर्नाटक विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आहेत. पोलिसांचा ससेमिरा टाळण्यासाठी सराईत गुन्हेगार सीमाभागात आश्रयाला येण्याची शक्यता गृहित धरून उपाययोजना राबविणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी ठिकठिकाणी गस्तीपथके नियुक्त करून सराईतांच्या हालचालीवर वॉच ठेवण्यात येत आहे, असे ते  म्हणाले. 

कोल्हापूर परिक्षेत्रातील अनेक गंभीर गुन्ह्यातील सराईतानी कर्नाटकासह गोव्यात आश्रय घेतल्याचे निष्पन्न झाले आहे. बेळगाव येथे शनिवारी (दि. 17) होणार्‍या बॉर्डर कॉन्फरन्समध्ये गुन्हेगारांच्या आदान-प्रदानाबाबत प्राधान्याने चर्चा अपेक्षित आहे, असेही ते म्हणाले.