होमपेज › Kolhapur › अश्‍विनी बिंद्रे यांच्या अवयवांची आजरा फार्म हाऊसजवळ विल्हेवाट

अश्‍विनी बिंद्रे यांच्या अवयवांची आजरा फार्म हाऊसजवळ विल्हेवाट

Published On: Mar 08 2018 2:05AM | Last Updated: Mar 08 2018 12:59AMकोल्हापूर : दिलीप भिसे

सहायक पोलिस निरीक्षक अश्‍विनी बिंद्रे-गोरे यांची हत्या करून मृतदेहाच्या केलेल्या तुकड्यांपैकी काही अवयव हत्येप्रकरणातील मुख्य संशयित व निलंबित वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय कुरूंदकर याच्या हाळोली (ता. आजरा) येथील फार्म हाऊसजवळील खड्ड्यात जाळून विल्हेवाट लावण्यात आल्याचा प्रकार नवी मुंबई पोलिसांच्या चौकशीत उघडकीला आला आहे, वरिष्ठ सूत्रांकडून ही माहिती मिळाली. पथकाने खड्ड्यातील जळीतमिश्रित माती व अन्य नमुने ताब्यात घेऊन तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबकडे पाठविले आहेत. 

मृतदेहाच्या अवयवांची विल्हेवाट लावून पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने कुरूंदकरला मदत करणार्‍या अन्य दोन तरुणांची नावे चौकशीतून पुढे आली आहेत. त्यापैकी एकाला नवी मुंबई येथील चौकशी पथकासमोर हजर राहण्याची नोटीस दोन दिवसांपूर्वी बजावण्यात आली होती. त्यानुसार संबंधित तरुण मंगळवारी (दि. 6) रात्री मुंबईकडे रवाना झाल्याचेही समजते. चौकशी प्रक्रियेत महत्त्वाचे धागेदोरे हाती लागल्याने अश्‍विनी बिंद्रे हत्येप्रकरणी आणखी काही तरुण संशयाच्या भोवर्‍यात आहेत. त्यापैकी एकावर एक-दोन दिवसांत अटकेची कारवाई अटळ असल्याचेही वरिष्ठ सूत्रांकडून समजते.
अश्‍विनी बिंद्रेची दि. 11 एप्रिल 2016 रोजी हत्या झाल्यानंतर मुख्य संशयित कुरूंदकर याने वूडकटरने मृतदेहाचे तुकडे केले. शरीराचा काही भाग लोखंडी पेटीत भरून वसईच्या खाडीत फेकून देण्यात आला आहे. तर शिर, हात, 

पायाचे वूडकटरने लहान-लहान तुकडे करून हाळोली येथील फार्म हाऊसजवळ आणण्यात आले. फार्म हाऊसपासून काही अंतरावर खड्डा खोदण्यात आला. खड्ड्यात अवयवांचे तुकडे टाकून पेटवून देण्यात आले. अवयव जळून खाक झाल्यानंतर खड्डा मुजविण्यात आला. यावेळी मुख्य संशयितासह त्याचा बालपणीचा विश्‍वासू मित्र हजर होता, अशी माहिती पुढे आल्याने तपास पथकाने आजर्‍याकडे धाव घेतल्याचे सांगण्यात आले. 

वूडकटरची भंगारात विक्री
नवी मुंबई गुन्हे अन्वेषणची दोन स्वतंत्र पथके रविवारपासून कोल्हापूर जिल्ह्यात शोधमोहिमेवर आहेत. त्यापैकी सहायक निरीक्षक सरपुरे व टीम आजरा परिसरात, तर सहायक निरीक्षक माने टीमसह कोल्हापुरासह परिसरात कार्यरत आहेत. गुन्ह्यातील वूडकटरची भंगार दुकानात विक्री केल्याची माहिती संशयितांनी दिली आहे. शहरासह जिल्ह्यातील अनेक दुकानांत प्रत्यक्ष जाऊन अधिकार्‍यांनी चौकशी सुरू केली आहे, असेही समजते.