Sat, Feb 16, 2019 02:52होमपेज › Kolhapur › अश्‍विनी बिंद्रे हत्याप्रकरणी आणखी दोघांची चौकशी

अश्‍विनी बिंद्रे हत्याप्रकरणी आणखी दोघांची चौकशी

Published On: Mar 07 2018 1:52AM | Last Updated: Mar 07 2018 1:12AMआजरा : प्रतिनिधी

सहायक पोलिस निरीक्षक अश्‍विनी बिंद्रे यांच्या हत्येप्रकरणी आजरा कनेक्शन स्पष्ट होत असल्याने पोलिसांनी मुंबईनंतर तपासाचा केंद्रबिंदू आजरा व परिसर ठेवला असून, एका जिल्हास्तरीय बड्या सहकारी संस्थेत काम करणार्‍या आजरा येथील एकाची व गडहिंग्लज येथील आचारी काम करणार्‍या एकाची अशा दोघांची पोलिसांनी चौकशी सुरू केल्याने अभय कुरूंदकर याचा स्थानिक मित्र परिवार आपल्या पाठीमागेही चौकशीचा ससेमिरा लागेल, या भीतीने धास्तावला आहे.

आजरा येथील संबंधित तरुण हादेखील यापूर्वी अटक झालेल्या महेश फळणीकर याच्याप्रमाणेच कुरूंदकर याचा बालमित्र आहे. त्याच्यासोबत कुरूंदकर याच्या हाळोली येथील फार्म हाऊसवर वेळोवेळी जेवण बनवण्यासाठी येणार्‍या गडहिंग्लज तालुक्यातील एकाची गोपनीय पद्धतीने चौकशी सुरू केली आहे. आजरा येथे कुरूंदकर याच्याशी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या संपर्कात असणारी मंडळी या प्रकाराने हादरून गेली आहे. आपल्या पाठीमागेही चौकशीचा ससेमिरा लागण्याची शक्यता गृहीत धरून कुरूंदकर याचा विषय चर्चेपासून लांब ठेवण्याचा प्रयत्न करू लागली आहेत. एकीकडे तपासाचा एक भाग म्हणून मुंबई येथील वसईच्या खाडीमध्ये नौदलाच्या सहाय्याने अश्‍विनी बिंद्रे यांच्या मृतदेहाच्या अवयवांचा शोध सुरू असताना, दुसरीकडे आजरा परिसरामध्ये नवी मुंबई पोलिसांच्या फेर्‍या वाढल्या आहेत.

या प्रकरणात आणखी किती आजरेकरांची चौकशी होणार? व या प्रकरणाचा शेवट काय? या दोन प्रश्‍नांकडे तालुकावासीयांचे लक्ष लागून आहे.