Tue, Apr 23, 2019 09:52होमपेज › Kolhapur › अश्‍विनी बिंद्रेंच्या मुलीची ‘डीएनए’ टेस्ट

अश्‍विनी बिंद्रेंच्या मुलीची ‘डीएनए’ टेस्ट

Published On: Dec 16 2017 2:06AM | Last Updated: Dec 16 2017 1:33AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

सहायक पोलिस निरीक्षक अश्‍विनी बिंद्रे बेपत्ताप्रकरणी चौकशीची व्याप्ती वाढविण्यात आली आहे. ‘डीएनए’ टेस्टसाठी अश्‍विनी यांच्या आठ वर्षांच्या मुलीच्या शुक्रवारी पनवेल ग्रामीण रुग्णालयात रक्ताचे नमुने घेण्यात आले. संशयित व वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय कुरूंदकर यांच्या वापरातील आलिशान मोटारीचा कोल्हापूर व सांगलीत शोध घेण्यात येत आहे, असे वरिष्ठ सूत्रांकडून सांगण्यात आले.

संशयित कुरूंदकर व राजेश पाटील यांच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्याना दुपारी पनवेल येथील मुख्य न्यायदंडाधिकार्‍यांसमोर हजर करण्यात आले. तपासाधिकारी तथा पनवेल पोलिस ठाण्याचे एसीपी ठाकूर यांनी न्यायालयात चौकशीचा अहवाल सादर केला. 

कुरूंदकर यांच्या वापरातील मोटारीचा ताबा घेणे आवश्यक आहे. बेपत्ताप्रकरणी गुन्हा दाखल होताच संबंधित मोटार कार कोल्हापूर अथवा सांगलीला हलविण्यात आल्याची माहिती आहे. वाहनाचा ताबा घेण्यासाठी पोलिस कोठडीची मुदत वाढवून मिळावी, अशी विनंती करण्यात आली. त्यानुसार न्यायालयाने 19 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीची मुदत वाढविली.

पनवेल येथील खोलीतून कुरूंदकर याच्या वापरातील जप्त कपडे व अन्य साहित्य फॉरेन्सिक लॅब तपासणीसाठी कॅलिन लॅबकडे पाठविण्यात आली आहेत, असेही तपासाधिकार्‍यांनी सांगितले. बिंद्रे यांच्या मुलीच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले. यावेळी बिंद्रे यांचे पती राजू गोरे व अन्य नातेवाईक उपस्थित होते.