Mon, Jun 17, 2019 18:14होमपेज › Kolhapur › कृषिमूल्य आयोगाच्या शिफारशीनुसार साखरेला प्रतिक्‍विंटल ३२०० भाव द्या

कृषिमूल्य आयोगाच्या शिफारशीनुसार साखरेला प्रतिक्‍विंटल ३२०० भाव द्या

Published On: Apr 20 2018 1:18AM | Last Updated: Apr 20 2018 12:27AMकोल्हापूर : प्रतिनिधी

साखरेच्या दराबाबत केंद्र सरकारच्या कृषिमूल्य आयोगाने 3200 रुपये प्रतिक्‍विंटल भाव द्यावा, अशी शिफारस सरकारला केली आहे. या शिफारशीची सरकारने तातडीने अंमलबजावणी करावी, अशी मागणी जिल्ह्यातील सर्व साखर कारखानदारांच्या बैठकीत करण्यात आली. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सभागृहात ही बैठक झाली. एफआरपीप्रमाणे शेतकर्‍यांना पैसे न दिल्याने साखर आयुक्‍तांनी जिल्ह्यातील कारखान्यांची साखर जप्‍त करण्याच्या नोटिसा पाठविल्या आहेत, या पार्श्‍वभूमीवर बैठक झाली.

बैठकीला जिल्हा बँकेचे अध्यक्ष आ. हसन मुश्रीफ, बिद्रीचे चेअरमन के. पी. पाटील यांच्यासह शाहू कागल, कुंभी-कासारी, जवाहर हुपरी, मंडलिक हमीदवाडा, दत्त शिरोळ, तात्यासाहेब कोरे साखर कारखाना वारणानगर, गुरुदत्त टाकळीवाडी, डॉ. डी. वाय. पाटील गगनबावडा, छत्रपती राजाराम कारखाना कसबा बावडा, आजरा, भोगावती, शरद नरंदे, इकोकेन म्हाळुंगे, वोलम अग्रो, राजगोळी खुर्द ब्रिक्स गडहिंग्लज, दत्त दालमिया, रेणुका शुगर इचलकरंजी आदी साखर कारखान्यांचे कार्यकारी संचालक उपस्थित होते.

हंगामापूर्वी एफआरपी ठरविताना 2017-18 या हंगामासाठी कृषिमूल्य आयोगाने साखरेचे होलसेल बाजारभाव 3200 रुपये प्रतिक्‍विंटल असे गृहीत धरले होते. कृषिमूल्य आयोगाची शिफारस विचारात घेऊनच केंद्र सरकारने अत्यावश्यक वस्तू कायद्याखाली 2017-18 च्या उसाची एफआरपी निश्‍चित केली आहे. या शिफारशीनुसार साखर कारखान्यांना ऊस दर देणे बंधनकारक आहे. तसेच बंधन सरकारलाही आहे. कारण कृषिमूल्य आयोगाने साखरेचे दर  प्रतिक्‍विंटल 3200 रुपये ठरविले आहेत, त्यानुसार सरकारनेही साखरेला 3200 रुपये दर द्यावा, अशी मागणी सर्व साखर कारखानदारांच्या वतीने  बैठकीत केली.

सध्या साखरेचे दर 900 ते एक हजार रुपये प्रतिक्‍विंटलने खाली आले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील परिस्थिती पाहिल्यास जगात साखरेचे उत्पादन जास्त झाले आहे. त्यांच्याकडून साखरेला रुपये 1900 प्रतिक्‍विंटल भावाची मागणी करण्यात येत आहे. त्यामुळे जागतिक बाजारपेठेतसुद्धा भारताच्या साखरेला मोठी मागणी नाही. अशा या अभूतपूर्व परिस्थितीचा गांभीर्याने विचार केल्यास एफआरपी ठरविताना गृहीत धरलेल्या साखरेची किंमत 3200 रुपये प्रतिक्‍विंटलप्रमाणे मिळावी, त्यासाठी जीवनावश्यक वस्तू कायद्याखाली साखलेला 3200 रुपये प्रतिक्‍विंटल दर मिळावा, अशी मागणीही या बैठक करण्यात आली.