Wed, Jul 24, 2019 05:48होमपेज › Kolhapur › मौजे सांगावच्या तलाठ्याला ५०० ची लाच घेताना अटक

मौजे सांगावच्या तलाठ्याला ५०० ची लाच घेताना अटक

Published On: Dec 21 2017 1:53AM | Last Updated: Dec 21 2017 12:46AM

बुकमार्क करा

कागल : प्रतिनिधी

शेतजमिनीच्या सातबारावर वारसांची नावे लावण्यासाठी 500 रुपयांची लाच घेताना कागल तालुक्यातील मौजे सांगाव येथील तलाठी मिलिंद रामचंद्र कांबळे (वय 50, रा. सुळकूड, सध्या रा. मोरेवाडी, ता. करवीर) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी सापळा रचून चावडीमध्येच रंगेहाथ पकडले.

दिलीप ज्ञानदेव पाटील (रा. मौजे सांगाव) यांच्या वडिलांच्या नावावर मौजे सांगाव येथे एक एकर शेतजमीन आहे. तक्रारदार दिलीप पाटील यांच्या वडिलांचा मृत्यू झाला आहे. संबंधित शेतजमिनीस आपल्यासह भाऊ व बहिणीचे वारस म्हणून नाव लावून तसा सातबारा उतारा मिळण्यासाठी पाटील यांनी तलाठी कांबळे याच्याकडे रीतसर अर्ज केला होता. तलाठी कांबळे याने अर्जाप्रमाणे नावे लावण्यासाठी पाटील यांच्याकडे एक हजार रुपयांची मागणी केली. पाटील यांनी एक हजार रुपये देण्यास असमर्थता दाखवल्यावर तलाठी कांबळे याने किमान 500 रुपये दिल्याशिवाय काम होणार नाही, असे सांगितले.

दरम्यान, पाटील यांनी कांबळे याच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे  तक्रार केली. बुधवारी पाटील यांच्या तक्रारीनुसार मौजे सांगाव चावडीत सापळा रचून तलाठी कांबळे याला पाटील यांच्याकडून 500 रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. त्याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे कोल्हापूर पोलिस उपअधीक्षक गिरीश गोडे, पोलिस हवालदार श्रीधर सावंत, पोलिस नाईक आबासो गुंडकणे, संदीप पावलेकर पो. कॉ. नवनाथ कदम, चालक गुरव यांच्या पथकाने केली.