Sun, Jul 21, 2019 00:19होमपेज › Kolhapur › सूत्रधारास अटक करा; अन्यथा मुंबईत ठिय्या 

सूत्रधारास अटक करा; अन्यथा मुंबईत ठिय्या 

Published On: Aug 21 2018 1:36AM | Last Updated: Aug 21 2018 1:26AMकोल्हापूर : प्रतिनिधी

डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे यांची हत्या करणार्‍या सूत्रधाराला अटक झाली नाही तर अंधश्रद्धा निर्मुलन समिती व पुरोगामी विचाराचे एक लाख कार्यकर्ते मुंबईत ठिय्या मारतील, असा इशारा महाराष्ट्र विवेक वाहिनीचे जिल्हाध्यक्ष डॉ. टी. एस. पाटील यांनी आज येथे बोलताना दिला.

शहीद डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त ‘जवाब दो’  कार्यक्रमांतर्गत राजर्षी शाहू स्मारक भवनमध्ये परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. या परिसंवादात डॉ. पाटील अध्यक्षपदावरून बोलत होते. ‘दाभोलकरांचा खून आणि त्यानंतर...’ असा परिसंवादाचा विषय होता. ते पुढे म्हणाले,  ज्यांनी धर्माची चिकित्सा करण्याचा प्रयत्न केला, त्यांना प्रस्थापित जातीयवाद्यांनी त्रास दिला. यातून डॉ. दाभोलकरही सुटले नाहीत. या सर्वांसाठी बहुजन समाजाचा वापर करून घेतला जातो, हे बहुजन समाजाला कळत नसल्याने तो अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करत आहे. त्याचा परिणाम संविधान जाळण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे. देशावर जातीयवाद आणि धर्मांदांचे संकट आले आहे. हे संकट सर्वांनी मिळून रोखले पाहिजे, तरच संविधान सुरक्षित राहील.

अ‍ॅड. के. डी. शिंदे म्हणाले, विचारांचा मुकाबला विचाराने करता येत नाही तेव्हा त्याचा खून केला जातो. हे महात्मा गांधींपासून होत आलेले आहे; पण त्यावेळी सुद्धा वैचारिक संघर्ष असे खुनाचे कारण लिहिण्यात आले नव्हते. डॉ. दाभोलकर, कॉ. पानसरे यांच्या हत्येनंतर मात्र आता त्याद‍ृष्टीने विचार करण्याची वेळ पोलिसांंंवर आली आहे.  

ज्येष्ठ लेखिका नीलम माणगावे म्हणाल्या, मुलांवर संस्कार करण्यात आईची महत्त्वाची भूमिका असते. त्यामुळे महिलांनी विवेकी व विज्ञानवादी होणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रयत्न केल्यास निश्‍चितपणे समाजात बदल होईल. अनिल चव्हाण यांनी या प्रकरणाच्या मुळाशी पोहोचण्यासाठी तपास यंत्रणेला भाग पाडले पाहिजे, असे सांगितले.स्वागत सीमा पाटील यांनी केले.  प्रास्ताविक उमेश वडणगेकर यांनी केले.