Tue, Jun 25, 2019 13:08होमपेज › Kolhapur › भविष्यातील युद्धासाठी सेनेची सज्जता 

भविष्यातील युद्धासाठी सेनेची सज्जता 

Published On: May 21 2018 1:05AM | Last Updated: May 21 2018 12:51AMभविष्यातील युद्धासाठी अत्याधुनिक साधनांसह भारतीय सेना सज्ज होत असून, त्यासाठी एक अत्यंत महत्त्वाकांक्षी संरक्षण योजना हाती घेण्यात आली. कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजेन्सी अर्थात एआय) प्रणालीचा वापर करून शस्त्रास्त्रे तयार केली जाणार आहेत. यात मानवरहित रणगाडे, रोबोटिक हत्यारे, विमानांची निर्मिती आदींचा प्रामुख्याने समावेश आहे. आपल्या लष्करात ‘एआय’चा वापर करण्यासाठी चीनने प्रचंड मोठी गुंतवणूक करण्यास प्रारंभ केला असून, भारतही आता तसूभरही मागे राहणार नाही. ही योजना लष्कर, हवाई दल आणि नौसेनेसाठीही राबवली जाणार आहे. 

भविष्यातील ‘एआय’चा वापर 

भविष्यात एखादे मोठे युद्ध झाले, तर त्यात कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीचा वापर अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्याचद‍ृष्टीने आता भारतीय लष्कराने पावले टाकण्यास प्रारंभ केला आहे. या योजनेवर टाटा सन्सचे प्रमुख एन. चंद्रशेखरन यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय टास्क फोर्स काम करीत आहेत. या योजनेतील बारकावे, तसेच त्याची रचना याला अंतिम रूप दिले जात आहे, अशी माहिती संरक्षण उत्पादन सचिव अजयकुमार यांनी दिली.   

‘भावी पिढी’चे युद्ध 

भावी पिढीतील युद्धात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. त्यासाठी भारताची तयारी सुरू आहे. स्वयंचलित, मानवविरहित शस्त्रे तसेच रोबोटिक प्रणालीवर आधारित ही युद्धे असतील. अनेक हॉलीवूडपटात तंत्रचमत्कार आपण सध्या पाहतो. मात्र, हेच ‘चमत्कार’ भविष्यातील युद्धात प्रत्यक्षात होऊ शकतात. मानवविरहित हवाई यान, रणगाडे, स्वयंचलित रोबोटिक रायफल ही भावी पिढीतील हत्यारे असणार आहेत. लष्कराच्या तिन्ही विभागांसाठी मानवविरहित हत्यारांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन केले जाणार आहे 

‘एआय’च्या वापराचा फायदा 

चीन आणि पाकच्या सीमेवर निगराणीसाठी ‘एआय’चा वापर केल्यास तेथील जवानांवरील ताण कमी होण्यास मदत होणार आहे. छोट्या छोट्या मोहिमांमधील यशासाठीदेखील याचा वापर केला जाऊ शकतो. चीनने आपल्या लष्करात ‘एआय’चा वापर सुरू करण्यासाठी संशोधन सुरू केले असून, त्यावर अब्जावधी डॉलरची गुंतवणूक केली आहे. 2030 पर्यंत चीनला ‘एआय’संबंधीचे जगातील प्रमुख केंद्र बनवण्याची योजना चीनने आखली आहे. 

अमेरिका, फ्रान्स पुढे 

अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स आदी देश ‘एआय’मधील गुंतवणुकीत कितीतरी पुढे निघून गेले आहेत. मानवविरहित ड्रोनच्या मदतीने अमेरिकेने अफगाणिस्तानात दहशतवाद्यांच्या गुप्‍त ठिकाणांचा शोध लावून ती उद्ध्वस्त केली आहेत. मानवविरहित ड्रोनही ‘एआय’च्या मदतीनेच काम करते. 

डीआरडीओची महत्त्वपूर्ण भूमिका 

संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचा (डीआरडीओ) या सगळ्या योजनेत महत्त्वाचा सहभाग असणार आहे. देशातील माहिती तंत्रज्ञान उद्योगाचा पाया चांगलाच मजबूत असून, त्याचाही फायदा या योजनेत होणार आहे. ‘एआय’संबंधी क्षमता वाढवण्यासाठी माहिती तंत्रज्ञान क्षेत्राची मदत घेतली जाणार आहे. 

काय आहे कृत्रिम बुद्धिमत्ता? 

कृत्रिम वस्तूने केलेल्या बुद्धिमान वर्तनास ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ अथवा आर्टिफिशियल इंटेलिजन्सी’ असे म्हणतात. कृत्रिम बुद्धिमत्ता ही संगणक शास्त्रातील एक महत्त्वाची शाखा आहे.  मुख्यत: स्वयंचलित कार्य करण्यासाठी आवश्यक असलेली बुद्धिमान वर्तणूक करू शकतील अशा यंत्रांची निर्मिती यातून केली जाते. कृत्रिम बुद्धिमत्ता असणार्‍या प्रणाली, अर्थशास्त्र, आरोग्य विज्ञान, अभियांत्रिकी, संरक्षण, कॉम्प्युटर गेम्स (बुद्धिबळ इत्यादी) आणि संगणक प्रणाली यामध्ये वापरल्या जातात.