Tue, Nov 20, 2018 19:06होमपेज › Kolhapur › ‘सेफ सिटी’अंतर्गत दुसर्‍या टप्प्याला लवकरच मंजुरी

‘सेफ सिटी’अंतर्गत दुसर्‍या टप्प्याला लवकरच मंजुरी

Published On: Jun 14 2018 1:33AM | Last Updated: Jun 13 2018 11:46PMकोल्हापूर ः सतीश सरीकर

कोल्हापूर शहरासाठी सेफ सिटी (सुरक्षित शहर) टप्पा दोनचा प्रस्ताव मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहे. महापालिका, जिल्हा पोलिस दल असा प्रवास करून राज्याच्या गृह विभागाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता. गृह विभागाने छाननी करून ग्रीन सिग्‍नल दिल्यानंतर माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या संचालकांनी बुधवारी तांत्रिक छाननी केली. तब्बल 11 कोटी 56 लाखांच्या प्रस्तावावर बुधवारी छाननी करण्यात आली. लवकरच प्रस्तावाला अंतिम मंजुरी मिळून निधीचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे. 

काही वर्षांपूर्वी शहरात सेफ सिटीचा साडेसहा कोटींचा पहिला टप्पा राबविण्यात आला. त्यांतर्गत शहरात 65 ठिकाणी 165 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते. दुसर्‍या टप्प्यात 100 सीसीटीव्ही कॅमेर्‍यांसह व्हिडीओ सर्व्हिलन्स सिस्टिम, ऑटोमेटिक नंबर प्लेट रिकग्‍निशन कॅमेरे, भूमिगत ऑप्टिकल फायबर नेटवर्क, पब्लिक अ‍ॅड्रेस सिस्टिम, ऑडिओ-व्हिडीओ संवाद सुविधा केंद्र, इमर्जन्सी व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टिम, मोबाईल व्हिडीओ, सर्व्हिलन्स सिस्टिम, वाहतूक पोलिसांसाठी दुय्यम नियंत्रण कक्ष आणि कोल्हापूर महापालिका येथे (आपत्कालीन व्यवस्थापन कक्ष) आदी सुविधांचा समावेश आहे. 

ऑटोमेटिक नंबर प्लेट रिकग्‍निशन कॅमेर्‍यांमुळे कोल्हापूर शहरात प्रवेश करणार्‍या वाहनांची नोंद होणार आहे. शहरातून बाहेर जाणार्‍या वाहनांचीही नोंद केली जाणार आहे. सर्व वाहनांचे ऑटोमेटिक स्क्रीन शॉट घेतले जाणार आहेत. त्यामुळे गुन्ह्याशी संबंधित असलेली वाहने शोधण्यात मदत होणार आहे. व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टिमद्वारे आपत्कालीन व्यवस्थेसाठी असलेल्या वाहनांची सिस्टिम सुधारण्यात येणार आहे.