Sun, Aug 18, 2019 15:07होमपेज › Kolhapur › उदं गं अंबाबाई, सरकार फसवं गं बाई

उदं गं अंबाबाई, सरकार फसवं गं बाई

Published On: Dec 23 2017 2:06AM | Last Updated: Dec 23 2017 12:09AM

बुकमार्क करा
केव्हा कायदा अंमलात आणणार, 
कधी पगारी पुजारी नेमणार, 
समितीच्या या अहवालाचा 
तो कधी गं विचार करणार
हिवाळी अधिवेशन, पोकळ भाषण
कायदा भिजत ठेवला बाई
आई उदं गं अंबाबाई, सरकार फसवं गं बाई.....


कोल्हापूर : प्रतिनिधी 

अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी नेमण्याचे आश्‍वासन पालकमंत्र्यांनी दिले, यासाठी हिवाळी अधिवेशनात  स्वतंत्र कायदा करण्याची घोषणा करण्यात आली. पण अधिवेशन संपले तरी कायदा झाला नाही. शासनाच्या या नाकर्तेपणाचा धिक्‍कार करीत अंबाबाई भक्‍त आणि करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर पुजारी हटाव कृती समितीच्या वतीने आज महाद्वार चौकात देवीचा जागर घालून आंदोलन करण्यात आले. येत्या पंधरा दिवसांत पगारी पुजारी नेमण्याबाबत कायदा नाही झाला, तर मंत्र्यांच्या दारात अंबाबाईचा गोंधळ घालण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. 

सरकारच्या नावे विडंबनात्मक गोंधळ आणि निषेधाच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. पगारी पुजारी कायदा करण्याबाबत टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप यावेळी उपस्थित आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आला.

महाद्वार चौकात करण्यात आलेल्या आंदोलनाचे वैशिष्ट्य म्हणजे याठिकाणी देवीचा गोंधळ घालण्यात आला. यासाठी गोंधळी तर होतेच; पण शिवाशाहीर दिलीप सावंत स्वत: उपस्थित होते. त्यांनी रचलेला विडंबनात्मक गोंधळ त्यांनी स्वत: सादर केला. हा गोंधळ ऐकण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

यावेळी दिलीप देसाई, अशोक पोवार, अजित सासणे, संग्राम पाटील, तानाजी पाटील, शाहीर दिलीप सावंत, सुनील राऊत, सुनील शिंदे, दत्ता माने, किसन भोसले, महेश कुलकर्णी, धिरज पाटील, जयदीप शेळके, किशोर घाटगे, महादेव जाधव, सुशांत चव्हाण, उदय लाड, प्रसाद जाधव, सुरेश पाटील आदींची उपस्थिती होती.