Tue, Apr 23, 2019 19:50होमपेज › Kolhapur › औषध घोटाळा चौकशी समितीचीही परस्पर नियुक्ती

औषध घोटाळा चौकशी समितीचीही परस्पर नियुक्ती

Published On: Mar 07 2018 1:52AM | Last Updated: Mar 07 2018 12:57AMकोल्हापूर : प्रतिनिधी

जिल्हा परिषद औषध खरेदी घोटाळ्यात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश पाटील यांच्या मनमानी कारभाराचे नमुनेच बाहेर येत आहेत. सदस्यांकडून झालेल्या तक्रारीनंतर घोटाळ्याची वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी चौकशी समितीही आरोग्य अधिकार्‍यांनी स्वत:च्या मर्जीनेच नेमली. याची जि.प. अध्यक्ष, सीईओ, सभापती यांना कोणतीही कल्पना दिली नाही. आरोग्य अधिकार्‍यांच्या या मनमानी आणि निष्क्रिय कारभाराबद्दल स्वत: अध्यक्ष शौमिका महाडिक यांनी वारंवार नाराजी व्यक्त केली होती, तर सीईओ डॉ. कुणाल खेमनार यांनी गेल्या वर्षभरात त्यांना 16 नोटिसा काढल्या होत्या. पण, डॉ. पाटील यांनी केराची टोपली दाखवल्याचे आता समोर येत आहे. 

आरोग्य विभागाच्या गेल्या वर्षभरातील औषधे व उपकरण खरेदीत तब्बल 16 लाखांची आर्थिक अनियमितता असल्याचा प्राथमिक अहवाल चौकशी समितीने जिल्हा परिषदेकडे सादर केला आहे. तथापि आरोग्य विभागाचा गेल्या वर्षभरातील कारभार व अनागोंदी पाहता ही रक्कम खूपच जुजबी असून यात मोठा हात मारल्याची चर्चा जिल्हा परिषदेत सुरू आहे. विशेषतः जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांच्या कारभारावरच चर्चेचा रोख दिसत आहे. 

सध्या सक्तीच्या रजेवर असलेल्या जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश पाटील यांची गेल्या पावनेदोन वर्षाची कारकीर्द वादग्रस्त ठरली आहे. त्यांच्या कार्यपद्धतीवर स्वत: सीईओंसह हाताखालील अधिकारी, कर्मचारीही नाराज होते. जि.प. अध्यक्षांसह इतर पदाधिकारी, सदस्यांनीही याबाबत आरोग्य समितीच्या बैठकीत याबाबतीत स्पष्ट शब्दात नाराजी व्यक्त केली होती. तरीही डॉ. पाटील यांच्या कार्यपद्धतीत कोणतीही सुधारणा झालेली नव्हती. सीईओ डॉ. खेमनार यांनी तर गेल्या वर्षभरात त्यांना 16 नोटिसा देऊन कामात सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या होत्या. यात चंदगडमध्ये रुग्णवाहिकेला झालेला अपघातात कायदेशीर पूर्तता नाही, कणेरी आरोग्य केंद्र निविदा पूर्तता नाही, राजपत्रीत वैद्यकीय अधिकारी वेतन व सेवा पुस्तके अद्ययावत नाहीत, करवीरसह गडहिंग्लज, शिरोळ, गगनबावडा येथील आरोग्य केंद्राची प्रलंबित कामासंबंधात लोकप्रतिनिधींच्या तक्रारी व सूचनाही बेदखल, डीपीडीसीच्या योजनाही अपूर्ण, रुग्ण कल्याण समितीचे लेखापरीक्षण नाही, 50 लाख रुपये मंजूर झालेल्या आयुर्वेदिक दवाखान्याची फाईलचीही पुढे काहीच कार्यवाही झाली नसल्याबाबत स्पष्ट शब्दात नाराजी व्यक्त करत कार्यवाहीच्या सूचना दिल्या होत्या. पण, त्याकडे आरोग्य अधिकार्‍यांनी वर्षभर दुर्लक्षच केले.

आरोपीकडूनच घोटाळ्याची चौकशी
औषध खरेदी घोटाळ्याची चौकशीसाठी स्वत: आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश पाटील यांनीच चौकशी समिती नेमली. चौकशीची जबाबदारी अतिरिक्त आरोग्य अधिकारी डॉ. उषादेवी कुंभार व प्रभारी औषध निर्माण अधिकारी एन.एन.सोनावणे यांच्याकडे देण्यात आली. सोनावणे हे 2007 मध्ये झालेल्या मुदतबाह्य औषध विक्रीच्या घोटाळ्यात आरोपी ठरलेल्या 10 जणांमध्ये समाविष्ट असणारे अधिकारी होते. त्यांना त्यावेळी मुख्यालयातून भुये प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आले. आता औषध खरेदीच्या 30 लाखांच्या फाईलवरून लोकप्रतिनिधी, अधिकार्‍यांमध्ये वाटणी सुरू झाल्याने सोनावणे यांना पुन्हा एकदा चौकशी अधिकारी पदाचा चार्ज देऊन औषध भांडारात आणले गेले. औषध निर्माण अधिकारी बी. के. चौगले यांचाच हात असल्याचे सांगत त्यांना तातडीने सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले. ते रजेवर गेल्यावर तातडीने सोनावणे यांच्या औषध निर्माण अधिकार्‍याचा प्रभारी चार्ज देण्यात आला. या  पदावर राहूनच सोनावणे यांनी चौकशी केली. त्यांच्या चौकशी अहवालाबाबतही साशंकता व्यक्त झाल्याने स्वत: सीईओ डॉ. खेमनार यांनी त्याची पडताळणी सुरू केली. यात जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांचाही हात असल्याचे समोर आले. ही पडताळणी झाली नसती तरी आरोग्य अधिकार्‍यांना नामानिराळे ठेवण्याचा डाव यशस्वी झाला असता अशी आता चर्चा सुरू आहे.