Tue, Jul 23, 2019 01:57होमपेज › Kolhapur › प्राधिकरणाला ‘ड’वर्ग मनपा विकास नियमावली लागू

प्राधिकरणाला ‘ड’वर्ग मनपा विकास नियमावली लागू

Published On: May 26 2018 1:18AM | Last Updated: May 26 2018 12:28AMकोल्हापूर : प्रतिनिधी

कोल्हापूर क्षेत्र नगरविकास प्राधिकरणाला ‘ड’वर्ग महापालिका विकास नियमावली लागू करण्याचा ठराव शुक्रवारी प्राधिकरणाच्या बैठकीत झाला. प्राधिकरणातील 42 गावांना यामुळे टीडीआर, वाढीव एफएसआय मिळेल, असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. शहरासह या गावांचा एकात्मिक आणि संतुलित विकास केला जाईल, त्यासाठी निधीची कमतरता भासणार नाही. सहा जून रोजी प्राधिकरणात समाविष्ट असलेल्या गावांच्या सरपंचांची बैठक घेतली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

पालकमंत्री पाटील म्हणाले, प्राधिकरणामुळे 42 गावांचा विकास तर होईलच पण त्या ग्रामपंचायतींची स्वायत्ताही आबाधित राहील. ‘ड’ वर्ग महापालिकेला लागू असलेली विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली शासनाने कोल्हापूर प्राधिकरणाला लागू करावी, असा ठराव या बैठकीत झाला. याबाबतचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. पाटील म्हणाले, प्राधिकरणाच्या हद्दीतील 42 गावांना पिण्याचे शुद्ध पाणी, रस्ते, सांडपाणी व्यवस्थापन, बाजारपेठा,  उद्याने,  मध्यवर्ती हॉस्पिटल आदी सुविधा पुरवू. सुमारे 50 खाटांचे हॉस्पिटल उपनगरात उभे करण्याचा विचार आहे. प्राधिकरणातील 17 गावांच्या पाणीपुरवठा योजनांना मंजुरी दिल्याचेही त्यांनी सांगितले.

या बैठकीत प्राधिकरण कार्यालयाचा कर्मचारी आकृतीबंध, भरती प्रक्रिया, कार्यालय इमारत आदींबाबतही चर्चा झाली. बैठकीला उपस्थित आमदारांनी विविध सूचना केल्या. या बैठकीला जि.प. अध्यक्षा शौमिका महाडिक, आमदार सतेज पाटील, आ. डॉ. सुजित मिणचेकर, आ. चंद्रदीप नरके, आ. अमल महाडिक, प्रभारी जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, मनपा आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, हातकणंगले पं.स. सभापती रेश्मा सनदी, करवीर पं.स. सभापती प्रदीप झांबरे, प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील, डीआरडीएचे प्रकल्प संचालक डॉ. हरिश जगताप यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

विमानतळ प्राधिकरण एनओसीची अट रद्द करा

प्राधिकरणात येणार्‍या गावांपैकी मोरेवाडी, पाचगाव विमानतळापासून 6-7 किलोमीटर अंतरावर आहेत. येथील इमारत बांधकामासाठी विमानतळ प्राधिकरणाची एनओसीची अट रद्द करावी, अशी मागणी आ. सतेज पाटील यांनी निवेदनाद्वारे पालकमंत्री पाटील यांच्याकडे केली. यासह विकास रेखांकन बांधकाम परवानगी प्रक्रियेत सुधारणा करा, प्राधिकरणात मनुष्यबळ व आर्थिक तरतूद होईपर्यंत पूर्वीप्रमाणे तहसीलदार, प्रांत यांच्यामार्फत बांधकाम परवानगी द्या, आदी मागण्या या निवेदनात केल्या आहेत.