Fri, Apr 19, 2019 11:57होमपेज › Kolhapur › सातवा वेतन आयोग लागू करा

सातवा वेतन आयोग लागू करा

Published On: Jun 05 2018 1:16AM | Last Updated: Jun 04 2018 10:48PMकोल्हापूर : प्रतिनिधी

ग्रामीण डाक कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग लागू करा, सरकारी कर्मचार्‍यांप्रमाणे पोस्टमास्तर आणि पोस्टमन यांना सुविधा लागू करा, यासह अन्य मागण्यांसाठी ग्रामीण डाक सेवक युनियनच्या वतीने काम बंद आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाचा भाग म्हणून संघटनेच्या वतीने सोमवारी रेल्वे रोको आंदोलन करण्यात येणार होते. पण रेल्वेतील अधिकार्‍यांनी याला विरोध केला. त्यामुळे कर्मचार्‍यांनी रेल्वेस्थानकावर निदर्शने केली. यावेळी देण्यात आलेल्या घोषणांनी स्थानक परिसर दणाणून गेला. 

सकाळी अकरा वाजता डाक कर्मचारी रेल्वे गेटसमोर जमा झाले. तेथून सर्व कर्मचारी मोर्चाने रेल्वेच्या प्रवेशद्वारासमोर गेले. परवाना नसल्याने पोलिसांनी आंदोलकांना पुढे सोडले नाही. यावेळी बोलताना संघटनेचे अध्यक्ष बी. डी. कलगोंडा म्हणाले, ग्रामीण भागातील एक एका पोस्टमनकडे चार ते पाच गावे असतात, या गावात जाऊन पत्रासह शासकीय पत्रांचे वाटप करावे लागते. यामध्ये या कर्मचार्‍याचे दिवसातील आठ ते दहा तास काम करावे लागते. पगार मात्र दहा हजारांच्यापुढे मिळत नाही, सध्या महागाईच्या काळात ग्रामीण डाक कर्मचारी एवढ्या तुटपुंज्या वेतनामध्ये कुटुंबांची गुजरान करू शकत नाही. तसेच त्याला शासनाच्या अन्य सुविधा मिळत नाहीत. त्यामुळे संघटनेच्या वतीने आंदोलन पुकारले आहे. गेली 9 दिवस कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले आहेत. पण सरकार दाद घेण्यासाठी तयार नाही, म्हणून रेल्वे रोको आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण रेल्वेच्या अधिकार्‍यांनी आंदोलन करण्यास नकार दिला. पण जोपर्यंत सरकार याबाबत ठोस निर्णय देत नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरू ठेवावे लागले, असे त्यांनी सांगितले. 

आंदोलनात सी. के. बुडके, योगेश जाधव, एस. जी. काळूगडे, व्ही. एम. कवडे, सूर्याजी रावण, ए. डी. पाडळकर, सुरेश तासे यांच्यासह जिल्ह्यातील 850 च्यावर ग्रामीण डाक कर्मचारी सहभागी झाले 
आहेत.