Fri, Apr 26, 2019 15:18होमपेज › Kolhapur › चंदनशिवेसह चौघांच्या जामीन रद्दसाठी अपील

चंदनशिवेसह चौघांच्या जामीन रद्दसाठी अपील

Published On: Apr 29 2018 2:09AM | Last Updated: Apr 29 2018 12:00AMकोल्हापूर : प्रतिनिधी

वारणानगर (ता. पन्हाळा) येथील कोट्यवधीच्या चोरीतील संशयित व सांगलीतील निलंबित पोलिस अधिकारी सूरज चंदनशिवेसह चौघांच्या मंजूर जामिनाविरुद्ध हायकोर्टात अपील दाखल करण्यास विधी व न्याय विभागाने शनिवारी मंजुरी दिली. शुक्रवारी (4 मे)  अपील दाखल करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

तपासाच्या नावाखाली सांगली येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकातील निलंबित पोलिस निरीक्षक विश्‍वनाथ धनवट, चंदनशिवेसह सात पोलिसांनी वारणानगर येथील शिक्षक कॉलनीतील ‘त्या’ फ्लॅटची झडती घेतली. कपाटात सापडलेल्या 9 कोटी 18 लाखांच्या रकमेवर डल्ला मारून चोरी केल्याचे यापूर्वीच निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी अधिकार्‍यासह 9 जणांना ‘सीआयडी’ने यापूर्वीच अटक केली आहे.

सूरज चंदनशिवे, हवालदार शंकर पाटील, रवींद्र पाटील, मुल्ला याला अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने काही दिवसांपूर्वी सशर्त जामीन मंजूर केला आहे. त्यानुसार शंकर पाटील, रवींद्र पाटील, मुल्ला जामिनावर सुटले आहेत. बहुचर्चित चोरीचा अजूनही तपास सुरू आहे. संशयितावर अद्याप पुरवणी दोषारोपपत्र दाखल झाले नाही.

जामिनावर सुटलेल्या संशयितामुळे साक्षीदारावर दबावतंत्राचा अवलंब होण्याची शक्यता गृहित धरून ‘सीआयडी’चे  विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील रामानंद यांनी चंदनशिवेसह चौघांच्या जामिनाविरुद्ध हायकोर्टात अपील दाखल करण्याबाबत तपासाधिकार्‍यांना सूचना केल्या होत्या. पोलिस अधीक्षक डॉ. दिनेश बारी, अप्पर अधीक्षक नरेंद्र गायकवाड यांनी पंधरवड्यापूर्वी विधी व न्याय विभागाकडे प्रस्ताव दाखल करून अभिप्राय मागविला होता. 

प्रस्तावास शासनाने तत्काळ मंजुरी दिल्याने त्याच्याविरुद्ध हायकोर्टात अपील दाखल करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पोलिस अधीक्षक डॉ. बारी म्हणाले, विधी व न्याय विभागाने मंजुरी दिल्याने संशयिताच्या जामिनाविरुद्ध शुक्रवारी (दि.4) हायकोर्टात अपील दाखल करण्यात येईल. जामीन रद्दसाठी संशयितांविरोधातील भक्कम पुरावे हजर करण्यात येतील.