Sat, Jul 20, 2019 10:37होमपेज › Kolhapur › आणखी एक लाख लोकांना मिळणार स्वस्त धान्य

आणखी एक लाख लोकांना मिळणार स्वस्त धान्य

Published On: Sep 12 2018 1:48AM | Last Updated: Sep 12 2018 1:42AMकोल्हापूर : अनिल देशमुख

‘अन्‍नसुरक्षा’ योजनेंतर्गत जिल्ह्यातील आणखी एक लाख लोकांना स्वस्त धान्य दिले जाणार आहे. संबंधितांकडून हमीपत्र घेऊन या योजनेच्या प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांच्या यादीत त्यांचा समावेश केला जाणार आहे. त्याची प्रक्रिया तहसील आणि शहर अन्‍नधान्य वितरण कार्यालयात सुरू झाली आहे.

जिल्ह्याला दर महिन्याला सुमारे 13 हजार 500 मेट्रिक टन अन्‍नधान्य मंजूर होते. मात्र, त्यापैकी 93 टक्के म्हणजे सुमारे 12 हजार 500 मेट्रिक टन धान्याची उचल होत होती. जिल्ह्यातील 22 लाख 10 हजार 400 लोकांना ‘अन्‍नसुरक्षे’चा लाभ देण्यात येत होता. दरम्यान, गेल्या तीन महिन्यांत धान्याची उचल न केलेल्या कार्डधारकांची शोधमोहीम राबविण्यात आली, त्यात 25 हजार कार्डधारक आढळून आले. 

याबाबतचा अहवाल राज्य शासनाला सादर केल्यानंतर जिल्ह्यातील लाभार्थ्यांची संख्या 23 लाख 18 हजार 615 इतकी निश्‍चित करण्यात आली आहे. यामुळे 1 लाख 80 हजार लोकांना या योजनेचा लाभ देणे शक्य असले, तरी जिल्हा प्रशासनाने उपलब्ध धान्यानुसार 1 लाख लोकांना या योजनेचा लाभ देण्याचे नियोजन केले आहे.

लाभार्थ्यांची वाढीव संख्या एक लाखांवर गेली असून जिल्हा प्रशासनाने नव्या एक लाख लोकांना या योजनेत समाविष्ट करून त्यांना धान्याचा लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानूसार त्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. गरजू केशरीकार्ड धारकांना शहर पुरवठा कार्यालय अथवा तहसील कार्यालयात मागणी अर्ज भरून द्यावा लागेल, त्यासोबत उत्पन्नाबाबतचे हमीपत्र द्यावे लागणार आहे. यानंतर दाखल होणार्‍या अर्जांची पूरवठा निरिक्षकांकडून तपासणी केली जाईल, त्यानंतर लाभार्थी अंतिम केले जाणार आहेत.

3 हजार 900 जणांनी केला ‘त्याग’

अन्न सुरक्षा योजनेतील अनुदानित धान्याचा त्याग करण्याची योजना आहे. या योजनेला जिल्ह्यात प्रतिसाद म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नसला तरी आजअखेर 3 हजार 900 लोकांनी लाभार्थी असूनही या धान्याचा त्याग केला असल्याचे जिल्हा पुरवठा कार्यालयातून सांगण्यात आले.

अन्न सुरक्षा योजनेतर्गंत 55 हजार अंत्योदय कार्डधारकांना दोन रूपये प्रतिकिलो दराने गहू व तीन रुपये प्रतिकिलो दराने तांदूळ असे एकूण 35 किलो धान्य दिले जाते. तर प्राधान्य कुटूंब यादीत समाविष्ट असलेल्या 22 लाख 10 हजार 500 लोकांना याच दराने एकूण पाच किलो धान्य देण्यात येते. 

‘अन्न सुरक्षा’ची जिल्ह्यातील स्थिती
ं अंतोदय कार्डधारक-55 हजार
ं प्राधान्य कुटूंब योजनेतील लाभार्थी-22 लाख 10 हजार 500
ं नव्याने वाढणारे लाभार्थी-1 लाख 80 हजार 115
ं प्रत्यक्ष लाभ मिळणारे लाभार्थी-1 लाख