होमपेज › Kolhapur › दिव्यांग मुलांनी कलाविष्कारातून गुंफले बंध प्रेमाचे

दिव्यांग मुलांनी कलाविष्कारातून गुंफले बंध प्रेमाचे

Published On: Mar 05 2018 1:42AM | Last Updated: Mar 04 2018 10:36PMकोल्हापूर : प्रतिनिधी 

निसर्गाने केलेला शारीरिक आणि मानसिक अन्याय विसरून सर्वसमान्य विद्यार्थ्यांनाही लाजवेल असा कलाविष्कार सादर करून दिव्यांग विद्यार्थ्यांनी प्रमुख पाहुण्यांसह उपस्थितांचीही मने जिंकली. या विद्यार्थ्यांनी ‘बंध प्रेमाचे, गोफ नात्याचे’ या संकल्पनेस सार्थठरविणारे विविध कलागुण सादर केले. निमित्त होते चेतना अपंगमती विकास संस्थेच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे. येथील संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात हा आगळा वेगळा कार्यक्रम पार पडला.  दै. ‘पुढारी’च्या कार्यकारी संचालिका डॉ. स्मितादेवी योगेश जाधव यांच्या हस्ते आणि संस्थेच्या पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन करण्यात आले. 

प्रेरणा गटातील विद्यार्थ्यांनी गणेश स्तवन सादर करून कार्यक्रमास सुरुवात झाली.  ‘पहाट झाली उठा उठा म्हणतो कोण? कोंबडा आणखी दुसरे कोण?’ या गीतातून विविध पक्ष्यांची ओळख करून देणारा ‘छोट्यांचे मित्र’ हा कलाविष्कार सादर केला.  ‘माझे घर’ या संकल्पनेवर आधारित कुटुंबातील विविध नातेसंबंधांची आठवण करून देणारी कलाकृती सादरकेली. ‘जाने कहा गये वो दिन’ या संकल्पनेवर आधारित गाण्यातून विद्यार्थ्यांनी मोबाईलचे अतिवेड  यावर प्रकाशझोत टाकला. ‘पक्ष्यांच्या गाण्या’तून प्रेमाची बेरीज करण्याचा संदेश दिला. 

मायलेकरांच्या नातेसंबंधावर प्रकाशझोत टाकणारे ‘मेरी माँ’ हे गीत सादर करून विद्यार्थ्यांनी आईचा महिमा दाखवून दिला. कुटुंबातील नातेसंबंधांवर टीकाटिप्पणी करणारे ‘सत्वर पाव गं मला’ या भारुडातून भाष्य केले. देशाच्या सीमेवर अहोरात्र सेवा बजावून देशवासीयांचे संरक्षण करणार्‍या सैनिकांची आठवण या मुलांनी ठेवली. समूहगीत, आमची माळीयाची जात, दादी अम्मा दादी अम्मा मान जा, मै ससुराल नही जाऊंगी, सारे जहाँ से अच्छा अशा विविध गीतांनी उपस्थितांना मनोरंजनाची मेजवानी दिली. 

डॉ. सौ. स्मितादेवी जाधव यांच्या हस्ते सादिक महात, श्‍वेता भोपळे, किरण वास्कर आणि निपम शहा यांना आदर्श विद्यार्थी पुरस्काराने गौरविण्यात आले. चंद्रकांत थोरात आणि सौ. अपर्णा थोरात यांना कै. आप्पासाहेब ब्रह्मनाळकर आदर्श पालक पुरस्कार, तर संदीप जाधव आणि प्रसाद बारटक्के यांचा  कै. राजेंद्र पाटील स्मृती पुरस्कार देऊन  सत्कार करण्यात आला. शाळीग्राम खातू आणि सौ. प्रतिभा खातू यांचा यांचाही सत्कार करण्यात आला.  

डॉ. सौ. स्मितादेवी जाधव म्हणाल्या, आपण सारे प्रवासी असून ईश्‍वराकडून आपले इच्छित स्थळ ठरविले जाते. जीवन हे संघर्ष असून प्रत्येक क्षण आनंदी जगणे हेच खरे जीवन आहे. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कलाविष्काराने सर्वांनाच पे्ररणा मिळाली आहे. या मुलांचे शिक्षक आणि पालक यांचे खरे कष्ट असून या दोघांचेही कौतुक करावे तेवढे थोडे आहे.  

कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष नरेश बगरे, उपाध्यक्ष डॉ. सुनील पाटील, कार्यकारी अध्यक्ष पवन खेबुडकर, सचिव दिलीप बापट कृष्णात चौगले, यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सौ. उज्ज्वला खेबुडकर यांनी स्वागत व प्रस्ताविक केले. मुख्याध्यापिका सौ. संध्या इनामदार यांनी आभार मानले. सूत्रसंचालन सौ. सुनीता सडोलीकर यांनी केले.