अण्णा हजारे यांना आज शाहू पुरस्कार प्रदान

Published On: Jun 26 2019 1:39AM | Last Updated: Jun 26 2019 1:23AM
Responsive image


कोल्हापूर : प्रतिनिधी

राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टच्या वतीने देण्यात येणारा प्रतिष्ठेचा शाहू पुरस्कार बुधवारी ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक, सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांना प्रदान केला जाणार आहे.  1 लाख रुपये, स्मृतिचिन्ह व मानपत्र असे  पुरस्काराचे स्वरूप आहे. शाहू स्मारक भवन येथे सायंकाळी 6 वाजता शाहू महाराज यांच्या हस्ते आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार आहे.
  राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टच्या वतीने प्रतिवर्षी शाहू जयंतीनिमित्त समाज प्रबोधन, साहित्य, कला, संस्कृती, विज्ञान, संगीत, क्रीडा इत्यादी क्षेत्रांत दीर्घ काळ उल्लेखनीय योगदान देणार्‍या व्यक्‍तीस अथवा संस्थेस हा पुरस्कार दिला जातो.

यंदाचा हा  पुरस्कार  अण्णा हजारे यांना त्यांच्या सामाजिक क्षेत्रातील असामान्य कामगिरीबद्दल आणि  राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा कृतिशील वारसा चालू ठेवणारे एक ज्येष्ठ व्यक्‍तिमत्त्व म्हणून आणि त्यांनी समाज प्रबोधनाच्या वाटचालीमध्ये दीर्घकाळ दिलेल्या मौलिक योगदानाचा सन्मान म्हणून देण्याचा निर्णय ट्रस्टने घेतला आहे. या कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केले आहे.