Wed, Jan 22, 2020 02:03होमपेज › Kolhapur › बुद्ध पौर्णिमेला अभयारण्यातील प्राणीगणना

बुद्ध पौर्णिमेला अभयारण्यातील प्राणीगणना

Published On: Apr 27 2018 12:44AM | Last Updated: Apr 26 2018 11:38PMकौलव : प्रतिनिधी

येत्या सोमवारी (दि. 30) बुद्ध पौर्णिमेदिवशी राज्यातील सर्वच अभयारण्यांत प्राणीगणना होणार आहे. कोणत्याही आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर न करता पारंपरिक पाणवठा प्राणीगणना पद्धतीने ही गणना होणार असून, वन्यजीवांच्या अधिवासाचा अंदाज बांधता येणार आहे. या निमित्ताने एरवी रात्री प्रवेश बंदी असलेल्या अभयारण्यात लख्ख चांदण्यात वन्यजीवांच्या हालचाली न्याहाळण्याची संधी अभ्यासकांना मिळणार आहे. देशातील व्याघ्र प्रकल्प अभयारणे व राष्ट्रीय उद्याने यातील वन्यजीवांची गणना वर्षातून दोनवेळा हिवाळा व उन्हाळ्यात केली जाते. वन्यजीवांच्या  हालचालींचा प्राथमिक अंदाज या गणनेदरम्यान केला जातो. त्यामुळे या गणनेला प्राणीगणनाही म्हणता येत नाही. प्रत्यक्ष प्राणीगणनेचा अहवाल दर चार वर्षांनी जाहीर केला जातो. पूर्वी प्राण्यांच्या पायाच्या ठशासनुसार  प्राणीगणना केली जात होती. मात्र, मध्यंतरी अत्याधुनिक जी. पी. एस. प्रणालीचाही वापर केला होता. त्याचबरोबर लाईन ट्रान्सेफ्ट पद्धतीने तृणभक्षी व कॉर्नव्हेरा साईन सर्व्हे पद्धतीने मांसभक्षी प्राण्यांची गणना केली होती. गतवर्षी पहिले तीन दिवस वरील पद्धतीने व चौथ्या दिवशी पाणवठा गणना पद्धतीने गणना केली होती. 

मात्र, यावर्षी जानेवारीमध्येच ट्रान्सेफ्ट लाईन व कॉर्नव्हेरा साईन पद्धतीने गणना केली होती. त्यामुळे आता फक्‍त पाणवठा गणना पद्धतीने प्राणीगणना केली जाणार आहे. सोमवारी बुद्ध पौर्णिमेच्या रात्री सलग चोवीस तास मचाणवरून ही गणना होणार आहे. प्रत्येक बीटवर ही गणना केली जाणार आहे. प्रत्येक बीटवर पाणवठ्याजवळ मचाण उभारली आहेत. दाजीपूर अभयारण्यात 21 बीट असून प्रत्येक बीटला वनखात्याचा एक कर्मचारी व एक अभ्यासक बसून ही पाहणी केली जाणार आहे. चोवीस तासांत पाणवठ्यावर एकदा का असेना प्राणी येतो. त्यामुळे प्राण्याचे हमखास दर्शन  होते. परिणामी ही गणना सुकर होणार आहे. उन्हाळ्यात अभयारण्यातील पाणवठे आटून कोरडे पडतात. ठराविक पाणवठ्यावरच पाणी उपलब्ध असल्याने तेथे हमखास प्राणी येतात. कोल्हापूर विभागातील दाजीपूर, चांदोली, कोयना व सागरेश्‍वर अभयारण्यात एकाचवेळी ही प्राणीगणना होणार आहे. एरवी अभयारण्यात रात्री पर्यटकांना प्रवेश दिला जात नाही. मात्र, बुद्ध पौर्णिमेच्या लख्ख चांदण्यात वनकर्मचार्‍यांसह वन्यजीव अभ्यासकांनाही अभयारण्याचे अंतरंग अभ्यासण्यास मिळणार आहे. बुद्ध पौर्णिमेच्या रात्री पारंपरिक पाणवठा प्राणीगणना पद्धतीने होणार असल्याचे प्राधिकृत अधिकारी तथा सहायक वनसंरक्षक अनिल पाटील यांनी सांगितले. 

Tags : Kolhapur Animal, counting,  Wildlife sanctuary,  Buddha Purnima