Mon, Apr 22, 2019 23:43होमपेज › Kolhapur › कोल्हापूरच्या मातीत आल्याचा आनंद

कोल्हापुरात अनिल कपूरचा ‘झक्कास’ डान्स

Published On: Apr 08 2018 5:02PM | Last Updated: Apr 09 2018 1:32AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

आपल्या कला अदाकारीने रसिकांच्या हृदयावर अधिराज्य करणार्‍या सिनेअभिनेता अनिल कपूरने विविध हिंदी गीतांवर ताल धरून कोल्हापुरात चांगलीच धमाल केली. ‘वन टू का फोर’ या गीतांसह विविध गाण्यांवर नृत्य सादर करून करवीरवासीयांची मने जिंकली. भर उन्हात सुमारे दोन तास ताटकळत थांबून रसिकांनीही आपल्या लाडक्या अभिनेत्याच्या अदाकारीला टाळ्या आणि शिट्ट्यांच्या प्रतिसादात दाद दिली. येथील व्हिनस कॉर्नर येेथे मलाबार गोल्ड अँड डायमंडस्च्या शोरूमच्या उद्घाटनप्रसंगी हा धमाल कार्यक्रम झाला. 

शोरूमचा शुभारंभ सकाळी साडेअकरा वाजता होता; मात्र सकाळी दहापासून व्हिनस कॉर्नरला  चाहत्यांची प्रचंड गर्दी झाली होती. दुपारी सव्वाबारा वाजता अनिल कपूर यांचे आगमन झाले. टाळ्यांच्या गजरात आणि मोबाईल कॅमेर्‍यांच्या लखलखाटात चाहत्यांनी कपूर यांचे स्वागत केले. छोटेखानी स्टेजवर ‘झकास कोल्हापूरकर’ असा आवाज देत कपूर यांनी आपल्या अदाकारीस सुरुवात केली. ‘राम-लखन’मधील गाजलेल्या ‘वन टू का फोर’ या गीतांवर चांगलीच धमाल केली. राम-लखन नायक, सुटबुटात आलेल्या आपल्या अभिनेत्याची छबी टिपण्यासाठी चाहत्यांची धडपड सुरू होती. कपूर यांनी चाहत्यांशी संवाद साधला. जिंदगी हर कदम एक नई जंग है, जीत जायेंगे हम, तुम अगर संग है... अशी साद घालून कपूर म्हणाले, मी चाळीस वर्षांनंतर कोल्हापुरात आलो आहे. असि. प्रोड्युसरपासून छोटी छोटी कामे केली. येथील वातावरणात वाढलो. येथील जेवण  खाऊन मोठा झालो. कोल्हापूरच्या मातीत वास आणि मोठी ताकद आहे. या मातीतला माणूस खूप वर जातो,  मोठा होतो.  कपूर यांच्या नृत्यास चाहत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला.  गर्दीमुळे चारही बाजूने चौकात वाहतूक ठप्प झाली होती. कपूर यांची छबी  टिपण्यासाठी चाहत्यांची  धडपड सुरू होती.  चौकात गर्दीमुळे थांबलेल्या केएमटीच्या चालकानेही  मोबाईलमध्ये कपूर यांची छबी टिपली.  रंकाळा- कागल या जनता एसटीमधील प्रवाशांनीही जाता जाता कपूर यांची छबी टिपून आनंद द्विगुणीत केला. 

पहिले छायाचित्र कोल्हापुरात 

कपूर यांनी पत्रकारांशी संवाद साधताना कोल्हापुरातील जुन्या आठवणींना उजाळा दिला.  सिनेसृष्टीत जाण्यापूर्वी पहिले छायाचित्र कोल्हापुरात काढल्याचे कपूर यांनी अभिमानाने सांगितले. चाळीस वर्षांनंतर कोल्हापुरात आलो. कोल्हापूर खूप बदललेआहे. मोठ मोठे शोरूम आले आहेत. कोल्हापूरचा अभिमान वाटतो.  मी विविध हिंदी चित्रपटांत काम केले. ‘नायक’ चित्रपटाचा मात्र लोकांवर प्रचंड प्रभाव जाणवतो. अनेक ठिकाणी गेलो की लोक वास्तवात लोकप्रतिनिधी होण्यासंदर्भात बोलतात; मात्र ती एक भूमिका केली आहे.  लोकप्रतिनिधी बनणे कठीण असते. त्यासाठी मोठे योगदान आणि त्याग करावा लागतो. मी सिनेसृष्टीत खूश आहे. राजकारणात कधीच येणार नाही. सलमान खानबाबत बोलताना कपूर म्हणाले, तो माझा चांगला मित्र आहे, आम्ही एकत्र काम केले आहे. मात्र, आता प्रसंग घडला आहे. त्याला मी केवळ शुभेच्छा देतो. तब्येतीचे रहस्य विचारले असता ‘कोल्हापुरी मटण’ असे त्यांनी सहज उत्तर दिले.  मराठी चित्रपट ‘हमाल दे धमाल’मध्ये काम केले असून आगामी मराठी चित्रपट ‘डबल धमाका’ लवकरच प्रदर्शित होणार असल्याचे सांगत जाता जाता त्यांनी ‘झकास कोल्हापूरकर’ असा अस्सल कोल्हापुरी निरोप दिला. 
 

Tags : Anil Kapoor,  Kolhapur, Malabar Gold & Diamonds, Video