Sun, Oct 20, 2019 11:25होमपेज › Kolhapur › अंगणवाडी कर्मचार्‍यांचा १५ दिवसांत दोन संघटनांकडून मोर्चा 

मागण्या त्याच फक्त चेहरे बदलले

Published On: Dec 17 2017 1:29AM | Last Updated: Dec 16 2017 11:53PM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

अंगणवाडी कर्मचार्‍यांची शासनाकडून फसवणूक होत असल्याचे सांगत गेल्या 15 दिवसांत दोन वेगवेगळ्या संघटनांनी मोर्चा काढून शासनाचा निषेध केला. दोन्ही संघटनांच्या मागण्या एकच असल्यातरी मोर्चा काढणार्‍यांचे चेहरे बदललेले दिसले. संघटनातील दुहीमुळे अंगणवाडी कर्मचारी महिलांची मात्र मानधनाअभावी कुचंबणा होत आहे, याकडे दुर्लक्ष होत आहे. 

जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघातर्फे अतुल दिघे, सुवर्णा तळेकर यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांना दिले. यावेळी कर्मचार्‍यांनी शासनाच्या निषेधाच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. गेल्या 2 डिसेंबरला अंगणवाडी कर्मचारी युनियनतर्फे कॉ. आप्पा पाटील, जयश्री पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेवर मोर्चा काढण्यात आला होता. 

दोन्ही मोर्चेकरांच्या मागण्या या एकच आहेत. त्यामध्ये अंगणवाडी कर्मचार्‍यांनी ज्या मानधनवाढीसाठी महिनाभर संप केला त्या मानधनवाढीचे आदेशच अद्याप शासनाकडून आलेले नाहीत. जुन्याच दराने मानधन दिले जात आहे. भाऊबीज 2000 रुपये देण्याचे जाहीर केले होते; पण तीही केवळ 1000 रुपये दिली आहे. अंगणवाडी मानधनासाठी घाईगडबडीने ऑनलाईन प्रक्रिया राबवल्याने ती ऑफलाईनने करून तातडीने मानधन द्यावे, रजिस्टरचे पैसे द्यावेत, खाऊची व इंधनबिले मार्चपासून थकलेली आहेत, सेवानिवृत्तीचा लाभ मिळवून द्यावा या मागण्यांसाठी दोन्ही संघटनांनी आंदोलन केले; पण विषय एकच असताना मोर्चे मात्र पंधरा दिवसांच्या अंतराने दोन वेळा निघत असल्याने या विषयाचे गांभीर्य कमी होत चालले आहे, अशी चर्चा मोर्चास्थळीही होती.