Sat, Mar 23, 2019 18:09होमपेज › Kolhapur › चिमुकल्यांचा ‘खाऊ’ लालफितीत

चिमुकल्यांचा ‘खाऊ’ लालफितीत

Published On: Jan 09 2018 1:33AM | Last Updated: Jan 08 2018 11:13PM

बुकमार्क करा
नानीबाई  चिखली : वार्ताहर 

कागल तालुक्यातील अंगणवाडीच्या मुलांना खाऊ वाटप करणार्‍या अंगणवाडी पूरक पोषण आहाराचा ठेका  महिला बचत गटांकडे आहे;  परंतु गेल्या 8 महिन्यांची बिले थकीत असल्यामुळे या बचत गटांनी खाऊ वाटप करण्याचे काम बंद केले आहे. कागल तालुक्यातील 315 अंगणवाडीतील चिमुकल्यांचा खाऊ निधीअभावी बंद झाल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.

सध्या बचत गटांनी खाऊ करण्याचे बंद केल्यामुळे प्रशासनाकडून पर्यायी व्यवस्था केली आहे. तो आहार बनविण्याची जबाबदारी अंगणवाडी  मदतनीसांकडे देण्यात आली आहे. पण त्यांना 50 पैशाप्रमाणे देय असणारी बिलेही थकली आहेत. त्यामुळे चिमुकल्यांचा खाऊ दुहेरी संकटात सापडला आहे.  तालुक्यातील बचत  गटांची 8 महिन्यांची लाखो रुपयांची बिले थकल्यामुळे त्यांचीही आर्थिक कुचंबणा होत आहे. पदरमोड करून काही महिने खाऊ दिला असल्यामुळे व किराणा दुकानातून उधारीवर माल घेतला असल्यामुळे त्यांची बिलेही द्यावयाची आहेत.

याबाबत कागल तालुका अंगणवाडी पर्यवेक्षिका रेखा बावडेकर यांच्याशी संपर्क साधला असता, निधी उपलब्ध नसल्यामुळे महिला बचत गटाची बिले थकली आहेत. निधी नेमका कधी मिळेल याबाबत अनिश्‍चितता आहे. त्यामुळे  चिमुकल्यांचा ‘खाऊ’ लालफितीत अडकल्याचे स्पष्ट झाले आहे.