Wed, May 22, 2019 16:50होमपेज › Kolhapur › कोल्‍हापुरातील प्राचीन शिवमंदिरे (Video)

कोल्‍हापुरातील प्राचीन शिवमंदिरे (Video)

Published On: Aug 31 2018 7:37AM | Last Updated: Aug 31 2018 1:01AMकोल्हापूर : पुढारी ऑनलाईन 

आई अंबाबाईच्या वास्तव्याने पावन झालेल्या करवीर नगरीत अनेक प्राचीन शिवालये आहेत. यातील अनेक मंदिरांचा संदर्भ करवीर महात्म्यातही आहे. परिसरातील तलाव, तिर्थ, कुंड आणि त्यांच्या धार्मिक महत्वातून या शिवालयांची नावे पडली आहेत. याशिवाय क्षेत्र रक्षणाची जबाबदारी  बजावणार्‍या महाद्वार लिंग आणि अष्टमहालिंग म्हणून प्रचलित असलेली शिवस्थानेही येथे आहेत. 

कोल्हापूर शहरामध्ये लक्षतीर्थ, कोटीतीर्थ, वरुणतीर्थ, रावणेश्‍वर, काशिविश्‍वेश्‍वर, अतिबलेश्‍वर, सोमेश्‍वर, ऋणमुक्तेश्‍वर, वटेश्‍वर, चंद्रेश्‍वर, सुर्येश्‍वर, उत्तरेश्‍वर, बाळेश्‍वर अशी अनेक प्राचीन महादेव मंदिरे आहेत. शहराच्या चारी दिशांना वसलेल्या तलावाच्या काठी तसेच शहराच्या मध्यावर अनेक ठिकाणी ही मंदिरे आहेत. अनेक मंदिरांचा जिर्णोध्दार करण्यात आला आहे. तर आजही अनेक मंदिरे आपले प्राचीन सौंदर्य टिकवून आहेत. श्रावण मासानिमित्‍त यापैकी काही मंदिरांचा अल्पपरिचय...

लक्षतीर्थ महादेव मंदिर

कोल्‍हापूर शहरातून फुलेवाडीकडे जाताना लक्षतीर्थ महादेवाचे मंदिर आहे. हे मंदिर लक्षतीर्थ नावाच्या तळ्‍याच्या ठिकाणी आहे. या मंदिराचे वैशिष्ट्ये म्हणजे येथील शिवलिंग चौकोनी आकाराचे आहे. मंदिर छोटेसे असले तरी, या मंदिराचा निसर्गरम्य परिसर आणि लक्षतीर्थ तळ्‍याचे शांत पाणी, यामुळे या मंदिराचा परिसर रमणीय आहे. 

ग्रामदैवत कपिलेश्‍वर

तळ्यांचे शहर म्हणूनही परिचित असलेल्या कोल्हापुरात अनेक ठिकाणे ही पाणथळांच्या नावांनी  वसले आहेत. या तळ्यांच्या काठी हमखास प्राचीन महादेवाची मंदिरे पहायला मिळतात. कपिलतीर्थही या तिर्थांपैकीच एक. कपिलतीर्थाकाठी कपिलेश्‍वराचे मंदिर आहे. कालांतराने कपिलतीर्थ उरले नसले तरी कपिलेश्‍वराचे अस्तित्व याठिकाणी कायम आहे. कपिलेश्‍वराचे हेमाडपंथी मंदिर आजही कोल्हापूरचे ग्रामदैवत मानले जाते. सध्या या ठिकाणी कपिलतीर्थ नावाने भाजी मार्केट वसविण्यात आले आहे. 

उत्तरेश्‍वर महादेव

करवीर महात्म्यात उत्तरेश्‍वर महादेव मंदिराचा उल्‍लेख आहे. कोल्हापुरातील जुन्या वसाहतींपैकी एक म्हणजे उत्तरेश्‍वर होय. हे मंदिर तत्कालिन वसाहतीच्या उत्तरेला वसल्याने त्याला उत्तरेश्‍वर महादेव असे नाव देण्यात आले. मंदिराचे वैशिष्ट म्हणजे आकाराने भव्य असलेले शिवलिंग होय. साधारणत: चार ते पाच फुट उंच आणि आकाराने भव्य असलेल्या या शिवलिंगाला पाहण्यासाठी अनेक लोक मंदिरात येतात. मंदिरात गणपती आणि 11 मारुती असलेली वैशिष्टपूर्ण मूर्ती आहे. श्रावण सोमवार आणि महाशिवरात्रीदिवशी या मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी असते.

ऋणमुक्तेश्‍वर महादेव

करवीरात तळ्याकाठी वसलेल्या प्राचीन शिवमंदिरापैकी एक म्हणजे ऋणमुक्तेश्‍वर मंदिर. करवीर महात्म्यात या मंदिराचा उल्लेख आढळतो. पूर्वजन्मीच्या ऋणातून मुक्त करणारा महादेव अशी याची ख्याती आहे. तळ्याच्या जागी उद्यानाची उभारणी करण्यात आली आहे. मंदिरात सखलात आकर्षक शिवलिंगासमोर मोठा नंदी आहे. याशिवाय गणपती, मारुती आणि संगमरवरातील विष्णूलक्ष्मी व दत्तात्रयांची मूर्तीही मंदिरात आहेत. मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला असून, शहरातील हे महत्‍वाचे मंदिर आहे. 

रावणेश्‍वर महादेव

आजचे कोल्‍हापूर हे पूवीच्या सहा खेड्‍यांनी बनले असून, त्‍यातील एका खेड्‍याचे नाव म्‍हणजे रावणेश्वर. करवीर महात्‍म्‍यात देखील याच कारणाने याला राक्षसालय असे नाव मिळाले असावे. या खेड्‍याची ग्रामदेवता मुक्‍तांबिका तर भैरव आणि काळभैरव हे क्षेत्रपाल असून रावणेश्वर हा गावचा महादेव होता. या तळ्‍यातील अनेक भाग सीता, मारुती व त्रिजटा यांच्या नावाने तसाच राहीला.

आरंभी साध्या लोखंडी छत्री खाली असणार्‍या देवालयाचा जिर्णोध्दार १९९४ साली झाला आणि त्‍याठिकाणी शिवलिंगाच्या आकाराचे नवे मंदिर बांधण्यात आले. सन २०१३ मध्ये शिखर चढवण्याचे नियोजन करण्यात आले. यासाठी कर्नाटकातील कसबी कारागिरांच्या हातून एक एक शिल्‍पकृती साकारली गेली त्‍यांचा आपण थोडक्‍यात परिचय करून घेऊ.

मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी प्रवेशव्दारावरती आपणास शिवशंकराची ध्यानस्‍थ मूर्ती पाहावयास मिळते, नंदी व मोर यांच्या शिल्‍पांनी अलंकृत अशा या प्रवेशव्दारातून आत येताणाच मंदिराच्या संरक्षक भिंतीवरती आपणास बारा ज्‍योतिर्लिगांची उठाव शिल्‍पे पहावयास मिळतात. ही शिल्‍पे पहात येतानाच दोन स्‍तंभावरती शृंगी आणि भृंगी हे दोन शिवगण दिसतात. विशेष म्‍हणजे हे त्रिपाद (३ पायांचे ) असून यातील कुठलाही एक पाय झाकला असता उरलेल्‍या दोन नृत्‍यमुद्रा दिसतात. यातील श्रृंगीच्या हातात कर ताल तर भृंगीच्या हातात वीणा आहे. या शिवगणांचे दर्शन घेत आपण मंदिराच्या मुख्य दरवाजाजवळ येतो. तीर्थ दाराच्या दोन बाजूला काचेमध्ये आपणास उजवीकडे वीरभद्राचे तर डावीकडे भैरवाचे चित्र दिसते. 

पुढे येताच कोपर्‍यात असणार्‍या गंगा व गौरी यांच्या आकर्षक मुर्ती लक्ष वेधून घेतात. लगतच्या भिंतीवर भगवान रावणेश्वराकडे मुख करून नमस्‍कार केलेली त्रिजटा पहावयास मिळते. सीतामाई अशोक वनात असता तिने प्राणपणाने त्‍यांचे रक्षण केले म्‍हणून प्रभू रामचंद्रांनी तिला वरदान दिले की, कार्तिक महिण्याचे स्‍नान संपल्यावरदेखील लोक ३ दिवस जास्‍त तुझे नावाने स्‍नान करतील. अशा या त्रिजटेचे अपवादात्‍मक तीर्थ या करवीरी होते. त्‍याची आठवण म्‍हणून हे शिल्‍प स्‍थापन केले आहे. 

त्रिजटे पुढे नंदी व त्‍यापुढे गर्भागाराच्या उजवीकडे श्रीमारूती तर डावीकडे श्रीगजानन विराजमान असून गाभार्‍यात रावणेश्वर महाराज पुर्वाभिमुख असून शिवलिंगाची नाळ उत्‍तरेला आहे. दक्षिणेच्या रामेश्वराप्रमाणेच चौकोणी पिठीकेत देवाचे लिंग आहे. 

महादेवाचे दर्शन घेवून गाभार्‍यातून बाहेर पडताच वर  महालक्ष्मी, तुळजाभवानी, रेणूकामाता व सप्तशृंगी या साडेतीन शक्‍तीपीठ देवतांच्या प्रतिमा त्‍यांच्या स्‍तुतीमंत्रासहीत आहेत.मंदिरात अमरनाथ गुंफाची व हिमलिंगाची प्रतिकृती व तेथेच देव लक्ष्मणेश्वर आणि गणेशाचे आपणास दर्शन होते. 

या मंदिराचे वैशिष्‍ट्‍य म्‍हणजे शिवनिर्माल्‍य कुठेही ओलांडले जात नाही. मात्र येथे श्रीलिंगाजवळ चंडेश गणाची स्‍थापना केल्‍याने निर्माल्‍य दोष नाहीसा झाला असून, त्‍यामुळे मंदिरास पूर्ण प्रदक्षिणा घालता येते. या मंदिराचे अधिक लक्ष वेधणारे वैशिष्‍ट्‍य म्‍हणजे याचे शिखर, या शिखराच्या पूर्वेस भगवान महादेव, गौरी-गणपती, स्‍कंद (कार्तिक) यांच्या समवेत सहपरिवार वात्‍सल्‍यरूपात आहेत. अशा शिल्‍पवैभवांनी समृध्द असणारे असे हे श्रीरावणेश्वर मंदिर भाविकांच्या श्रध्देचे असून, पर्यटकांच्या आकर्षनाचे केंद्र बनले आहे. 

सध्याच्या शाहू स्टेडीयमच्या जागी पूर्वी रावणेश्‍वर तलाव होता. या तलावात रावणेश्‍वर महादेवाचे मंदिर होते. तलावातील या मंदिराची प्रतिष्ठापना पुढे साठमारी परिसरात करण्यात आली. काही वर्षापूर्वी या मंदिराचा जिर्णोध्दार करण्यात आला आहे. या मंदिराचे वैशिष्‍ट्‍य म्‍हणजे हे मंदिर महादेवाच्या शिवलिंगाच्या आकाराचे बनवले आहे. 

तसेच मंदिराच्या परिसरात देवी देवतांच्या आकर्षक मुर्ती, हिमालय, नंदी, मोर तसेच भारतातील बारा जोतिर्लिगांच्या प्रतिमा भिंतित साकारण्यात आल्‍या आहेत. सुंदर कलाकुसर आणि त्‍यावर आकर्षक विद्‍युत रोषनाईमुळे या मंदिराला नवे रुप प्राप्त झाले आहे. रावणेश्‍वर मंदिर हे प्राचिन शिवालयांपैकी असल्याने याठिकाणी भक्तांची दर्शनासाठी गर्दी असते. 

कैलासगडची स्‍वारी मंदिर...

कोल्‍हापुरात अनेक शिव मंदिरे आहेत यामध्ये मंगळवार पेठेतील कैलासगडची स्‍वारी मंदिराचाही समावेश आहे.  विषेश बांधनी आणि कलाकुसर यामुळे हे मंदिर भक्‍तांच्या आकर्षनाचे केंद्र बनले आहे. तसेच कोल्‍हापुरातील अनेक पर्यटन स्‍थळामध्ये या मंदिराला विशेष महत्‍व प्राप्त झाले आहे.  

एतिहासिक, पौराणिक व अभिजात कलेचा संगम इथे पहावयास मिळतो. शिल्‍पकलेचे अत्‍यंत रंम्‍य व मनोहारी अविष्‍काराचे दर्शन या मंदिरात होते. या मंदिराच्या बाहेर दोन्ही बाजुला पितळेच्या भव्य समया उभ्‍या केल्‍या असुन, या समया भाविकांचे लक्ष वेधुन घेतात. मंदिरावर चंद्र,सुर्य या पितळेमध्ये घडवलेल्‍या प्रतिमा आहेत. तसेच मंदिराच्या प्रवेश व्‍दारावर बसलेला कलाकुसरीनियुक्‍त असलेला पितळेचा नंदी पाहण्यासारखा आहे. मंदिराच्या आत प्रवेश करताचं संगमरवरातील नतमस्‍तक असलेले भव्य कासव परमेश्वरासमोर नेहमी नतमस्‍तम राहण्याची जणू शिवकण देते. मंदिरात महादेवाची पिंड त्‍याची बांधलेली आकर्षक पूजा पाहून भाविकांचे मन प्रफुल्‍लित होते. यासोबतच मंदिरात छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्‍याभिषेक सोहळ्‍याचे भव्य चित्र असुन यातील बारकावे पाहुन भक्‍त चित्रात हरवुन जातात. या सोबतच महादेवाचे तांडव नृत्‍य, रायगडवरची शिवरायांची समाधी आणि शिवरायांचे चित्रे  तसेच मंदिरात मंदिरात मध्यभागी भगवान शंकराचे हिमालयात तपश्चर्या करत असलेले चित्र पाहुन भक्‍तीरसात आकंट बुडून जातो. 

या क्षेत्राकडे भाविकांचा तसेच पर्यटकांचा ओघ वाढत आहे. यासाठी मंदिरात प्रशस्‍त वीस फुट उंचीवर सांस्‍कृतिक हॉल बांधला असून, तेथे प्रवचन,किर्तन,सभा यासारखे सांस्‍कृतीक कार्यक्रम होत असतात. या मंदिराची संपूर्ण माहिती चित्रमय रूपात दिलेली आहे. श्रावण सोमवार आणि महाशिवरात्रीच्या दिवशी भाविक मोठ्‍या संख्येने भाविक या मंदिरात हजेरी लावत असतात. 

सर्वेश्‍वर महादेव

पंचगंगेच्या काठी असणारे महादेव मंदिर म्हणजे सर्वेश्‍वर महादेव मंदिर. शिवाजी पुलाच्या बाजूला पंचगंगा स्मशानभूमीच्या प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूस सर्वेश्‍वराचे छोटे पण सुंदर मंदिर आहे. सर्वेश्‍वर महादेवाचे दर्शन घेतल्याने करवीर क्षेत्रातील सर्व देवदेवतांचे दर्शन घेतल्याचे पुण्य मिळते असा पुराण ग्रंथात उल्लेख आहे. मंदिरात मोठे शिवलिंग आहे. या मंदिरानजीकच उग्रेश्‍वर महादेवाचे मंदिर आहे. उग्रेश्‍वर महादेवाला स्मशानभूमीतील महादेव म्हणूनही ओळखले जाते. 

 

 

वरुणतीर्थ महादेव मंदिर.....

सध्याचे गांधी मैदान म्हणजे वरुणतिर्थ. वरुणराजाने तपश्‍चर्या करुन प्राप्त केलेले तिर्थ म्हणूनही याची ख्याती आहे. याठिकानीही वरुणतीर्थ महादेवाचे लहानसे मंदिर आहे. 
 

बाळेश्‍वर महादेव 

पंचगंगा नदीकाठी सन 1597 च्या सुमारास करवीर पीठाच्या शंकराचार्य मठाची उभारणी झाली. मठाच्या मागील बाजूस असलेल्या मस्कुती तलाव परिसरात बाळेश्‍वर मंदिर आहे. हेमाडपंथी पध्दतीच्या या मंदिरात शिवलिंग, नंदीची मूर्ती अत्यंत देखणी आहे.

शिवपार्वतीचे सोमेश्‍वर मंदिर

पंचगंगा नदीच्या मार्गावरच एका गल्लीमध्ये सोमेश्‍वराचे मंदिर आहे. मंदिरात शिवलिंग आणि नंदी सोबत पार्वतीचीही आकर्षक मूर्ती आहे. सोमेश्‍वर मंदिराच्या मुळ दगडी बांधकामावर संगमरवरी फरशी बसवण्यात आली आहे. सखलात कोरीव दगडी शिवलिंग आणि त्यामागे हाती तलवार, त्रिशूल आणि कुंकवाचा करंडा घेतलेली पार्वतीची मूर्ती आहे. करवीर महात्म्यात या मंदिराचा उल्लेख असून उमा (पार्वती) व ईश्‍वर म्हणजे उमेसह ईश्‍वर म्हणजेच सोमेश्‍वर असा त्याचा नामोल्लेख केला जातो. 

पेटाळ्यातील शंभू महादेव 

पूर्वीचा पेटाळा तलाव आणि सध्याच्या न्यू एज्युकेशन सोसायटीच्या मैदानावर शंभू महादेवाचे मंदिर आहे. भक्कम दगडी आणि उंच पायावर हे मंदिर बांधण्यात आले आहे. शिवलिंग, नंदी, गणेश यासह विविध मूर्ती शिल्पे या मंदिरासमोर आहेत. काही वर्षापूर्वी  काळ्या पाषाणातील मंदिरालाही संगमरवराने झाकण्यात आले आहे. 

नंदी शिवाय चंद्रेश्‍वर आणि नंदी महादेव मंदिर

महादेव मंदिराची रचना म्हणजे साधारणत: गाभार्‍यात शिवलिंग आणि गाभार्‍याबाहेर नंदी अशी पहायला मिळते. पण याला छेद देणारीही काही मंदिरे कोल्हापूर शहरात पहायला मिळतात. शिवाजी पेठेतील चंद्रेश्‍वर महादेव मंदिर नंदीशिवाय पहायला मिळते. तर शेजारीच म्हणजे मर्दानी खेळाच्या आखाड्यालगत नंदी महादेव  मंदिरात नंदीची प्रतिष्ठापना करण्यात आली असून, गाभार्‍याबाहेर शिवलिंग असलेले पहायला मिळते. भारतात मद्रास येथे असे मंदिर असल्याचे सांगीतले जाते. शिवाजी पेठेत चंद्रेश्‍वर गल्लीत चंद्रेश्‍वर महादेवाचे लहान मंदिर आहे. या मंदिरात नंदी नाही. पण इथला नंदी म्हणजेच नंदी महादेव मंदिरातील नंदी असल्याचे लोक सांगतात.

श्री अतिबलेश्‍वराचे मंदिर.....

अंबाबाई मंदिरात श्री अतिबलेश्‍वराचे मंदिर आहे. तर ब्रम्हेश्‍वर बाग परिसरात ब्रम्हेश्‍वर महादेवाचे हेमाडपंथी मंदिर आहे.