Tue, Jun 18, 2019 22:19होमपेज › Kolhapur › अंबाबाई मंदिर पगारी पुजारी ठाणेकरांची याचिका मागे

अंबाबाई मंदिर पगारी पुजारी ठाणेकरांची याचिका मागे

Published On: Jun 29 2018 12:55AM | Last Updated: Jun 29 2018 12:45AMकोल्हापूर : प्रतिनिधी

अंबाबाई मंदिरामध्ये पगारी पुजारी नेमण्याच्या प्रक्रियेविरोधात श्रीपूजक अजित ठाणेकर यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका तांत्रिक कारणामुळे मागे घेतली. गेल्या आठवड्यात याबाबतची याचिका ठाणेकर यांनी उच्च न्यायालयात दाखल केली होती.

पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने विधी व न्याय विभागाच्या सूचनेनुसार अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी नेमण्यासाठी मुलाखत प्रक्रिया राबवली. या प्रक्रियेला विरोध करणार्‍या दोन याचिका न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत. पैकी अजित ठाणेकर यांच्याकडून उच्च न्यायालयात एक याचिका, तर  कोल्हापूरच्या दिवाणी न्यायालयात सुरेश पवार यांनी दुसरी याचिका दाखल केली आहे. अजित ठाणेकर यांनी पगारी पुजारी नेमण्यासाठी पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने राबवलेल्या प्रकियेवर आक्षेप घेतला. त्यांच्या वतीने  अ‍ॅड. श्रीकृष्ण गणबावले यांनी युक्‍तिवाद केला. तर पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने युक्‍तिवाद करणार्‍या अ‍ॅड. संजीव सावंत यांनी  देवस्थान समितीने शासन नियमानुसार ही पगारी पुजारीसाठी मुलाखत प्रक्रिया राबवली आहे. त्यामुळे ठाणेकर यांची याचिका चुकीची असल्याचे काही दाखले देऊन सांगितले. यावेळी ठाणेकर यांच्या वकिलांनी काही तांत्रिक कारणामुळे याचिका मागे घेण्याची विनंती न्यायाधीशांना केली. त्यामुळे उच्च न्यायालयातील पगारी पुजारी नेमण्याबाबतचा युक्‍तिवाद संपला आहे.

उच्च न्यायालयात झालेल्या निर्णयामुळे आता कोल्हापूरच्या दिवाणी न्यायालयाच्या याचिकेकडे लक्ष लागून आहे. शनिवारी याबाबत सुनवणी होणार आहे.
याचिका फेटाळणार हे लक्षात 

आल्यानेच मागे घेतली : जाधव

दरम्यान, याबाबत पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, विधी व न्याय विभागाच्या सूचनेनुसार ही मुलाखत प्रक्रिया राबवण्यात आली होती. उच्च न्यायालयात याचिका फेटाळणार असल्याचे लक्षात आल्याने श्रीपूजकांनी  याचिका मागे घेतली आहे. समितीचे काम नियमानुसार चालले आहे, यावर उच्च न्यायालयानेही शिक्‍कामोर्तब केले आहे. अंबाबाईच्या संदर्भात कोणी पुजारी दिशाभूल करून चुकीच्या पद्धतीने माहिती देत असेल, तर अशा पुजार्‍यांनी सावध रहावे, असे आवाहन केले.

देवस्थान समितीला पगारी पुजारी नेमण्याचा अधिकार नाही : ठाणेकर

सध्या जी पगारी पुजारी नेमणुकीची प्रक्रिया चालली आहे, त्याला आमचा विरोध आहे. नवीन कायद्यानुसार देवस्थान समितीला ही प्रक्रिया राबवण्याचे अधिकार नाहीत. आम्ही याचिका मागे घेतली याचा अर्थ माघार घेतली असे नाही, नव्याने यासंदर्भात काय करता येईल, याबाबत लवकरच निर्णय घेणार असल्याचे अजित ठाणेकर यांनी सांगितले.