Sun, May 26, 2019 21:29होमपेज › Kolhapur › अमृत योजनेत काळेबेरे

अमृत योजनेत काळेबेरे

Published On: May 28 2018 1:42AM | Last Updated: May 28 2018 12:33AMकोल्हापूर : प्रतिनिधी

इचलकरंजी शहराला प्यायला पाणी देण्यास आमचा विरोध नाही. पण, प्यायच्या नावाखाली गरजेपेक्षाही जास्त पाणी उचलून उद्योेगांना देण्याचा डाव स्पष्टपणे दिसत आहे. पाणी मागणीत आणि कागदपत्रातही काळेबेरे असून, ढपलाही पाडला जात आहे, असा आरोप प्रा. डॉ. एन.डी.पाटील यांनी केला. एन.डी.पाटील म्हणजे पालापाचोळा नाही. 75 वर्षे नैतिकतनेच आंदोलने केली आहेत. त्यामुळे या योजनेच्या माध्यमातून मला फासावर लटकवण्याचे प्रयत्न तडीस जाणार नाहीत, अशा शब्दात त्यांनी कुणाचेही नाव न घेता सुनावले. 

दरम्यान, वारणा नदीतून पाणी उपशाला विरोधासाठी 2 जूनला मोटारसायकल रॅली निघणार आहे. नदीच्या डाव्या व उजव्या तिराकडून दोन रॅली निघून त्याची सांगता दुपारी वारणानगरात होणार आहे. 
पिण्याचे पाणी देण्यास वारणा बचाव कृती समिती अटकाव करत असल्याबद्दलची टीका झाल्याने  प्रा. पाटील यांनी रविवारी पत्रकार बैठक घेऊन खुलासा केला. यावेळी आ. उल्हास पाटील, आ. सुजित मिणचेकर, इरिगेशन फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष विक्रांत पाटील किणीकर, स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे, बाबासाहेब पाटील भूयेकर, फेडरेशनचे सचिव मारुती पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. 
प्रा. एन.डी म्हणाले, शहराला पिण्याचे पाणी देण्यास आमचा विरोध नाही, पण नगरपालिकेने दानोळीच्या डोहाचा हट्ट सोडावा. सध्या उपसा होत असलेल्या मजरेवाडीतूनच पाणी उचलावे. प्रसंगी तेथील प्रदुषण थांबवून, गळती लागलेल्या पाईप बदलाव्यात, पण दानोळी डोहाकडे ढुंकूनही पाहू नये.

कुणालाही विश्‍वासात न घेता इचलकरंजी नगरपालिकेने दमदाटीने फौजफाट्यासह भूमीपूजन करून हा वाद पेटवला आहे. ही वस्तुस्थिती असताना बदनामी मात्र दानोळीची व समस्त वारणा खोर्‍याची होत आहे. खोटे बोलणार्‍यांची आम्ही तोंड धरू शकत नाही पण वस्तूस्थिती सर्वांसमोर मांडून त्यांना आम्ही उघडे पाडू शकतो. त्यासाठी साधारणपणे 31 मे पर्यंत होणार्‍या बैठकीत मुख्यमंत्र्यासमोर संपूर्ण वस्तुस्थिती मांडली जाणार आहे. त्यानंतर पाणी परिषदेचा निर्णय होणार आहे. मजरेवाडीतून होणार्‍या पाणीउपसाच्या पाईपलाईनला गळती आहे. त्याच्या दुरुस्तीसाठी 27 कोटी रुपये आले. पण, दुरुस्तीऐवजी नव्याने 76 कोटीची योजना राबवण्यामागचा हेतूही स्पष्ट होत नाही.  त्यामुळे यात बरेच काळेबेरे दिसत आहे, ते आम्ही उघडे पाडणार, असेही एन.डी.पाटील यांनी सांगितले.

उजवा कालवा नगरपालिकेनेच बंद पाडला

वारणा धरणातून डावा व उजवा असे दोन कालवे मंजूर झाले होते. पण,  2002 साली इचलकरंजी नगरपालिकेने शासनाकडे पत्र पाठवून उजवा कालवा करू नका अशी विनंती केली.  कालवा रद्द झाल्याने लाभक्षेत्रातील 92 गावांना आजतागायत पिण्यासाठी व सिंचनासाठी पाणी मिळाले नाही. तसेच धरणक्षेत्रातील 170 गावेही पाण्यापासून वंचित राहिली. कोट्यवधीच्या जमिनी कालव्यात जातात म्हणून इचलकरंजीकरांनी या कालव्याला विरोध केला, असा आरोप आ. सुुजित मिणचेकर व आ. उल्हास पाटील यांनी केला.