Wed, Nov 14, 2018 04:37होमपेज › Kolhapur › दानोळीतून अमृत योजना रद्द

दानोळीतून अमृत योजना रद्द

Published On: Jun 01 2018 2:04AM | Last Updated: May 31 2018 11:27PMदानोळी : वार्ताहर

वादातील असलेली इचलकरंजीची अमृत योजना वारणा नदीवरून होणार नाही. उपसा केंद्र कोथळी ते मजरेवाडी दरम्यान होणार, असा निर्णय मुंबईतील बैठकीत झाल्याचे समजताच दानोळीसह परिसरात साखर वाटून व  आतषबाजी करून आनंदोत्सव साजरा केला. गेले अनेक दिवस चाललेल्या अमृत योजनेच्या विरोधाच्या पार्श्‍वभूमीवर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी इचलकरंजीचे लोकप्रतिनिधी आणि वारणा काठावरील लोकप्रतिधी यांची तोडगा काढण्यासाठी बैठक बोलावली होती.  

यावेळी अमृत योजना वारणेवरून नाही तर कृष्णा नदीवर हरिपूर संगमापासून पुढे कोथळी ते मजरेवाडीपर्यंत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मंडळाच्या सर्वेक्षण अहवालानुसार निर्णय घेऊन राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच इचलकरंजीची  सध्याची  कृष्णा योजना दुरुस्तीसाठी शासन दोन टप्प्यात आवश्यक तो निधी देण्याबरोबरच  दानोळीतील 1400 गावकर्‍यांवर 2 मे च्या आंदोलनात दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. मुंबईत झालेल्या बैठकीत प्रा. एन. डी. पाटील आणि विक्रांत पाटील यांच्या मागणीनुसार इचलकरंजी व वारणा काठ ग्रामस्थ आंदोलन मागे घेणे तसेच आ. उल्हास पाटील आणि वारणा बचाव कृती समितीचे अध्यक्ष महादेव धनवडे यांच्या मागणीनुसार पंचगंगा शुद्धीकरण मोहीम राबविणे व माजी आ. विनय कोरे यांच्या मागणीनुसार लाभक्षेत्रातील वगळलेली गावे पुन्हा लाभक्षेत्रात घेण्याचा निर्णय घेण्यात आले.