होमपेज › Kolhapur › नोकर्‍या नाहीत; सरकारने बेकारीच वाढवली

नोकर्‍या नाहीत; सरकारने बेकारीच वाढवली

Published On: Feb 07 2018 1:46AM | Last Updated: Feb 07 2018 1:38AMकसबा बीड : वार्ताहर

अनेक शासकीय योजनांचे पैसे रखडले आहेत. दोन कोटी लोकांना नोकरी देणार्‍या सरकारने बेकारी वाढवली आहे. ‘अच्छे दिन आनेवाले है, देवेंद्र जानेवाले है’. 2019 च्या निवडणुकांमध्ये जनताच भाजपला जागा दाखवेल, असा इशारा आ. अमित देशमुख यांनी दिला.

करवीर तालुक्यातील बीडशेड येथे झालेल्या शेतकरी व काँग्रेस कार्यकर्ता मेळावाप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार व जिल्हा काँग्रेस अध्यक्ष पी. एन. पाटील होते. बुलेट ट्रेनचे कर्ज जनतेला फेडावे लागणार आहे. भाजपच्या काळात कृषी विकास सर्वात कमी झाला आहे. सर्वसामान्य माणूस भरडला जात आहे. सरकार बदलल्याशिवाय सामान्य माणसांचे जीवन सुधारणार नाही. येत्या निवडणुकांमध्ये विरोधकांची अनामत जप्‍त झाली पाहिजे. पी. एन. पाटील यांना तुम्ही आमदार करा, आम्ही त्यांना योग्य जागी बसवू. कोल्हापूर जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी खड्डा दाखवा एक हजार मिळवा, अशी घोषणा केली होती. लातूरमध्ये खड्डेच खड्डे आहे. त्यामुळे एक खड्डा दाखवला तर एक हजार मग किती हजार रुपये खड्डे दाखवून मिळवता येईल हे दादा तुम्हीच सांगा.असे देशमुख यांनी सांगितले.
दरम्यान, मान्यवरांच्या हस्ते भैरवनाथ विकास संस्था महे, पशुवैद्यकीय दवाखाना, श्रीपतराव दादा बँक या नवीन वास्तू इमारतींचे उद्घाटन करण्यात आले. जाहिरातबाजीचे दिवस निघून गेलेत. येत्या निवडणुकांत सर्वसामान्य जनताच युती सरकाला जागा दाखवेल. भाजपमध्ये कोणीतरी शेतकरी आहे का? हे सरकार घटना बदलून सामान्य माणसांचा हक्‍क काढून घेत आहे, असे माजी मंत्री प्रतिक पाटील यांनी सांगितले.

यावेळी माजी खासदार जयवंतराव आवळे, विशाल पाटील, पृथ्वीराज पाटील (सांगली), माजी आमदार भरमूआण्णा पाटील, दिनकरराव जाधव, गोकुळ अध्यक्ष विश्‍वासराव पाटील, के.डी.सी.सी. बँक संचालक उदयानीदेवी साळोखे, विश्‍वासबापू किरुळकर, गोकुळ संचालक अरुणकुमार डोंगळे, उदय पाटील, बाळासाो खाडे, उपनिबंधक धायगुडे, जि. प. सदस्य राहुल पाटील, राजेंद्र सूर्यवंशी,  श्रीपतरावदादा बँकेचे चेअरमन राजेश पाटील, उपसभापती विजय भोसले, शंकर पाटील, सज्जन पाटील, बुद्धिराज पाटील, पंडित पाटील, शामराव सूर्यवंशी आदी सेवा संस्थांचे पदाधिकारी, भोगावती कारखाना, दादा बँक, जि. प., पं. स.चे आजी-माजी सदस्य व काँग्रेसचे  कार्यकर्ते, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वागत सरपंच सत्यजित पाटील यांनी केले. आभार जगदीश पाटील यांनी मानले. 

विरोधकांची अनामत जप्‍त झाली पाहिजे ः देशमुख

या मतदार संघातून पी. एन. पाटील यांना मताधिक्याने निवडून देऊन, विरोधकाची अनामत जप्‍त झाली पाहिजे. पी. एन. पाटील निष्ठावन व कार्यकर्ता सांभाळणारा नेता आहे, पक्षाशी एकनिष्ठ असल्याने जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदी त्यांचीच निवड करण्यात आली.

सर्वसामान्यांचा विकास साधणारे सरकार असावे ः देशमुख

यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, शरद पवार, विलासराव देशमुख यांच्यासारखे सर्वसामान्यांचा विकास साधणारे सरकार असावे, असे अमित देशमुख म्हणाले.