Sat, Jun 06, 2020 19:18होमपेज › Kolhapur › आंबोलीत सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर!

आंबोलीत सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर!

Published On: Feb 27 2018 2:04AM | Last Updated: Feb 27 2018 12:46AMआंबोली : वार्ताहर

आंबोली पर्यटनस्थळाला गतवर्षी नोव्हेंबर महिन्यापर्यंत अवैध प्रकारांमुळे गालबोट लागलेे होते. यानंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी या ठिकाणी नियमन आदेश जारी करण्यात आला. त्यानुसार आंबोलीतील पर्यटनस्थळी विनापरवानगी जाण्यासाठी एक महिना बंदी होती. ही बंदी 21 डिसेंबर 2017 ला संपली असून, पुन्हा सुरक्षिततेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.  

उन्हाळी पर्यटन हंगामावेळी कोणतेही अनुचित प्रकार घडू नयेत आणि आंबोली पर्यटनस्थळाची बदनामी होऊ नये, यासाठी कायमस्वरूपी उपाययोजनांची गरज आहे. गेल्या तीन-चार वर्षांत आंबोली परिसर व येथील घाटमार्गात अवैध धंदे वाढल्याने आता पर्यटनद‍ृष्ट्या या थंड हवेच्या पर्यटनस्थळाची  बदनामी होत आहे.  

आंबोली घाट, महादेवगड पॉईंट व कावळेशेत पॉईंट हे तर मृतदेहांचे डम्पिंग ग्राऊंड बनले आहे. आंबोली येथील कावळेशेत पॉईंट (गेळे) आता सुसाईड पॉईंट म्हणून कर्नाटक व पश्‍चिम महाराष्ट्रातील पर्यटकांकडून ओळखले जाते. येथे आजवर जेवढे अवैध धंदे, अपराध व घातपात करून मृतदेहांची विल्हेवाट लावल्याचे प्रकार उघडकीस आले त्यामध्ये पश्‍चिम महाराष्ट्र व कर्नाटकातील गुन्हेगारांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असल्याचे आढळून येते.

गतवर्षीच्या उघडकीस आलेल्या अपराधिक कृत्यांमुळे कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी येथील पर्यटनस्थळांवर 22 नोव्हेंबर ते 20 डिसेंबर असा 1 महिना सायंकाळी 6 ते सकाळी 6 अशी विनापरवानगी जाण्यास मनाई होती. तसेच मुख्य रस्त्यावरील कावळेशेत फाट्यावर तपासणी नाका सुरू करण्यात आला होता. मात्र, हा तपासणी नाकाच वादाच्या भोवर्‍यात सापडल्याने अवघ्या काही दिवसांत तो बंद करण्यात आला.