Sun, Jul 21, 2019 14:58
    ब्रेकिंग    होमपेज › Kolhapur › अंबाबाईचा खजिना 16 कोटींचा

अंबाबाईचा खजिना 16 कोटींचा

Published On: Jul 10 2018 1:22AM | Last Updated: Jul 10 2018 1:18AMकोल्हापूर : प्रतिनिधी

पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून 2018 पर्यंतच्या मूल्यांकनाचे काम पूर्ण झाले आहे. याअंतर्गत देवस्थान समितीकडील 3 हजार 42 मंदिरांपैकी करवीरनिवासिनी अंबाबाई देवीचा खजिना सर्वाधिक असून, 2018 च्या मूल्यांकनानुसार देवीचा खजिना सुमारे 16 कोटींचा झाला आहे. अंबाबाई देवस्थानकडे 50 किलो 963 ग्रॅम सोने असून, आजमितीस याची किंमत 12 कोटी 21 लाख 22 हजार 700 रुपये होते. तर चांदी 945 किलो 275 ग्रॅम असून, याची किंमत 3 कोटी 88 लाख 13 हजार 823 रुपये झाली आहे. या मूल्यांकनात देवीच्या प्राचीन जडावाच्या दागिन्यांचा समावेश करण्यात आलेला नाही, अशी माहिती देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

श्री अंबाबाईच्या खजिन्यातील पारंपरिक नित्यालंकार, जुन्या धाटणीसह सध्याच्या काळातील आधुनिक दागिन्यांचे मूल्य आजच्या सोने व चांदी दराप्रमाणे 16 कोटी रुपये आहे. गेल्या आठवड्यात देवस्थान समितीच्या वतीने गेल्या दीड वर्षात भाविकांकडून देणगीदाखल आलेल्या दागिन्यांचे मूल्यांकन केले. 27 जून  ते 4 जुलै 2018 या कालावधीत ही मूल्यांकन  प्रक्रिया मूल्यांकन समितीतील सरकारमान्य सराफ पुरुषोत्तम काळे, उमेश पाठक व योगेश कुलथे यांच्या देखरेखीखाली करण्यात आली. यापूर्वी 2013 मध्येही दागिन्यांचे मूल्यांकन करण्यात आले होते. आज देवस्थान समितीकडे देवीच्या नित्यालंकारांसह, भाविकांकडून देण्यात आलेल्या सोने- चांदीच्या एकूण खजिन्याची रक्‍कम सुमारे 16 कोटी झाल्याचे सांगण्यात आले.

जाधव म्हणाले, देवस्थान समितीच्या वतीने अंबाबाईच्या दागिन्यांची मोजदाद व मूल्यांकन करण्याच्या प्रक्रियेत अंबाबाई मंदिर, जोतिबा मंदिरसह पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थानच्या अखत्यारीत समाविष्ट असलेल्या 3 हजार 42 मंदिरांमधील दागिन्यांचेही मूल्यांकन केले. एकूण 3 हजार 42 मंदिरांपैकी 471 मंदिरांतील देवतांचे सोने व चांदीचे दागिने आहेत.

‘त्या’ 25 जणांना नोटिसा...

देवस्थानच्या कुळांकडून जमिनींची परस्पर विक्री, 400 सागवान झाडांची तोड, बेकायदा मत्स्य व्यवसाय, बेकायदा बॉक्साईट उत्खनन, शासन दरबारी चुकीची कागदपत्रे सादर करून जमिनी स्वत:च्या नावावर करून घेणे, प्लॉट पाडून विक्री, अतिक्रमण, जमिनींचा वर्षानुवर्षे खंड न भरणे, जमिनीवर राष्ट्रीयीकृत बँकांची कर्जे आहेत. देवस्थान समितीच्या जमिनींवर अनेकांनी गेली 20 ते 25 वर्षे बेकायदा वर्चस्व करून देवस्थानचा खंडही न भरणार्‍या 25 जणांना देवस्थान समितीकडून कायदेशीर नोटिसा बजावण्यात आल्या आहेत, अशी माहिती त्यांनी सांगितली.पत्रकार परिषदेला पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव विजय पोवार, सहसचिव एस. एस. साळवी, सदस्या संगीता खाडे, सदस्य शिवाजीराव जाधव आदी उपस्थित होते.

अमूल्य खजिना

अंबाबाईच्या दागिन्यांमध्ये अनेक दागिने शिवकालीन आहेत. यामध्ये अनेक दागिन्यांमध्ये जडजवाहिरांचा वापर करण्यात आला आहे. देवीचा सोन्याचा तसेच जवाहिरांनी सजलेला असे दोन किरीट आहेत. पाचूचा हार, हिर्‍याची नथ, बोरमाळ, कोल्हापुरी साज, पुतळ्यांची माळ, कवड्यांची माळ असा अमूल्य ऐवज आहे. खांडेकर घराण्याकडे खजिन्याच्या सुरक्षेची जबाबदारी असून, त्यांची पाचवी पिढी सध्या या कामात कार्यरत आहे. देवीच्या खजिन्यात चारशे वर्षांपूर्वीचा सोन्याचा किरीट असून, या किरीटावर नागलिंगयोनी कोरलेली आहे; पण हा किरीट झीज झाल्याने सध्या देवीला वापरला जात नाही.