Tue, Mar 26, 2019 22:37होमपेज › Kolhapur › अंबाबाईचा अवभृत स्नान सोहळा उत्साहात

अंबाबाईचा अवभृत स्नान सोहळा उत्साहात

Published On: Jun 07 2018 2:05AM | Last Updated: Jun 07 2018 1:28AMकोहापूर : प्रतिनिधी

तीन वर्षांतून एकदा अधिक महिन्यामध्ये करवीरनिवासिनी श्री अंबाबाई देवीचा अवभृत स्नान सोहळा होत असतो. बुधवारी अंबाबाईच्या उत्सवमूर्तीस बुधवारी पंचगंगा नदी घाटावर स्नान घालून देवीचा अवभृत स्नान विधी मोठ्या उत्साहात झाला. सवाद्य मिरवणुकीने अंबाबाईची उत्सवमूर्ती सुवर्ण पालखीतून पंचगंगा तिरावरील सिद्धेश्‍वर महाराज समाधी मंदिरापर्यंत नेण्यात आली. देवीचा स्नानविधी आटोपून देवीचा नौका विहार सोहळा  झाला. हा धार्मिक विधी पाहण्यासाठी करवीरकरांनी पंचगंगा तिरावर गर्दी केली होती. 

अधिक महिन्यानिमित्त अंबाबाई मंदिरातील श्रीपूजक मंडळाच्या वतीने गरूड मंडप येथे श्रीसुक्‍त महापूरश्‍चरण, ऋग्वेद स्वाहाकार विधी तसेच होम-हवन अशा धामिर्र्क कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या धार्मिक उपक्रमांची सांगता बुधवारी देवीच्या अवभृत स्नान आणि नौका विहाराने करण्यात आली. या सोहळ्यासाठी बुधवारी सकाळी करवीरनिवासिनी अंबाबाईची उत्सवमूर्ती सवाद्य मिरवणुकीने सुवर्ण पालखीतून पंचगंगा घाटावर स्नानासाठी मार्गस्थ झाली. मंदिर परंपरेनुसार घोडे, पोलिस बँड, मानकरी असा लवाजमा पालखीच्या पुढे होता. पालखी महाद्वार रोड, पापाची तिकटी, गंगावेशमार्गे पंचगंगा घाटावरील सिद्धेश्‍वर महाराज समाधी मंदिर येथे आणण्यात आली.

यावेळी श्रीपूजक आणि मानकर्‍यांनी देवीची उत्सवमूर्ती नदीपात्रामध्ये नेऊन देवीचा स्नानाचा धार्मिक विधी पार पडला. यावेळी देवीला नौकाविहार ही करवण्यात आले. त्यानंतर पालखी पुन्हा गरूड मंडप येथे आणण्यात आली. यावेळी देवीचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. त्यानंतर पूर्णाहुतीने गरूड मंडप येथे सुरू असलेल्या होम-हवन व धार्मिक उपक्रमांची सांगता करण्यात आली. यावेळी श्रीपूजक माधव मुनीश्‍वर, गजानन मुनीश्‍वर, मंदिर व्यवस्थापक धनाजी जाधव यांच्यासह भक्‍त मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

अजित ठाणेकरांचा मंदिर प्रवेश रोखला

बुधवारी करवीरनिवासिनी श्री अंबाबाई अवभृत स्नानासाठी पालखीतून मंदिराबाहेर पडणार होती. त्यामुळे देवीच्या दर्शनासाठी श्रीपूजक अजित ठाणेकर मंदिरात आले. ठाणेकर मंदिरात येताच अंबाबाई मंदिर पुजारी हटाव संघर्ष समितीला समजले. समितीच्या कार्यकर्त्यांकडून शहर पोलिस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांना कळवून त्यांचा मंदिर प्रवेश रोखण्यात आला. कोणताही विरोध न करता अजित ठाणेकर यांनी मंदिर सोडले. दरम्यान, याप्रकरणी डॉ. अमृतकर यांनी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होईल अशी कोणतीही कृती नको, असे समजावले.