Sun, Jul 21, 2019 14:45
    ब्रेकिंग    होमपेज › Kolhapur › आंबा-विशाळगड रात्रीची वाहतूक बंद

आंबा-विशाळगड रात्रीची वाहतूक बंद

Published On: May 17 2018 1:27AM | Last Updated: May 17 2018 12:42AMकोल्हापूर : प्रतिनिधी

वन्यप्राण्यांची शिकार आणि तस्करी रोखण्यासाठी वनविभागासह पोलिस यंत्रणा एकत्रित प्रयत्न करणार आहेत. आंबा, तिलारी आणि आंबोली परिसरात संयुक्‍त गस्तीसह नाकाबंदीही करण्यात येणार आहे. वन्यप्राण्यांच्या सुरक्षिततेसाठी आंबा ते विशाळगड मार्गावरील रात्रीची वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय व्याघ्र कक्ष समितीच्या बैठकीत बुधवारी घेण्यात आला.पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी सायंकाळी पोलिस आणि वन विभागातील वरिष्ठ अधिकार्‍यांची पोलिस मुख्यालयात तातडीची बैठक झाली. बैठकीत हा निर्णय घेण्यात आला, असेही पोलिस अधीक्षक मोहिते यांनी सांगितले.

वन्य जीवांच्या सुरक्षिततेसाठी 2016 मध्ये व्याघ्र कक्ष समितीची स्थापना करण्यात आली आहे. जिल्हा, परिक्षेत्र आणि राज्य पातळीवरील समित्यांच्या माध्यमातून वन्य जीवांच्या सुरक्षेसह अवैध शिकार, तस्करी रोखण्याचे काम करण्यात येते.असेही सांगण्यात आले.जिल्ह्यात हत्ती व गव्यांचा मानववस्तीत वावर वाढला आहे. वन्यप्राणी व माणसामध्ये संघर्ष वाढू नये, यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. आंबा ते विशाळगड या मार्गावर घनदाट जंगल आहे. रात्रीच्यावेळी सरपटणारे प्राणी रस्त्यावर येतात.जंगली प्राण्यांचाही रस्त्यावर वावर वाढतो आहे. अशा वन्य जीवांच्या सुरक्षेसाठी आंबा-विशाळगड मार्गावरील रात्रीची वाहतूक बंद ठेवली जाणार आहे. त्यामुळे चोरटी शिकार रोखण्यासाठीही मदत होईल.

तिलारी आणि पाटगाव परिसरात चोरट्या शिकारीच्या घटना घडताहेत. या घटनांना आळा घालण्यासाठीही संयुक्‍त गस्तीपथके नियुक्‍त करून तातडीने अंमलबजावणी करण्याचा निर्धार करण्यात आला.
बैठकीला पोलिस अधीक्षक मोहिते यांच्यासह अप्पर पोलिस अधीक्षक तिरूपती काकडे, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक दिनकर मोहिते, उपवनसंरक्षक प्रभुनाथ शुक्‍ल,अनिल पाटील,रमण कुलकर्णी आदी उपस्थित होते.वनविभागातील अधिकारी, पोलिस यांच्यात समन्वय राखण्यासाठी लवकरच संयुक्‍त बैठक घेण्यात येणार आहे. जंगलात कार्यरत असलेल्या वनविभागाच्या अधिकारी, कर्मचार्‍यांना पोलिस दलाकडून शस्त्र चालविण्याचे प्रशिक्षणही देण्यात येणार आहे, असेही पोलिस अधीक्षकांनी सांगितले.