Fri, Apr 26, 2019 20:04होमपेज › Kolhapur › भांडळे खिंड - आंबाघाट मार्ग धोकादायक

भांडळे खिंड - आंबाघाट मार्ग धोकादायक

Published On: Jan 29 2018 1:40AM | Last Updated: Jan 28 2018 11:09PMबांबवडे : आनंदा केसरे

कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावरील शाहूवाडी तालुक्यातील भांडळे खिंड ते आंबा घाट या मार्गावर गेल्या चार वर्षांत भरधाव वेग, वेडीवाकडी वळणे, अरुंद रस्ते आणि इतर कारणामुळे गेल्या चार-पाच वर्षांत अनेक जणांचे बळी गेले असून शासन या बाबत सकारात्मक विचार करणार तरी कधी? असा संतप्त सवाल प्रवाशी, वाहनचालक, नागरिकांमधून व्यक्त होत आहे. शुक्रवार 21 रोजी या मार्गावरील तळवडे आंबा येथे प्रवाशी कार झाडावर आदळून सहा ठार झाले.

गेल्या चार वर्षांत 120 अपघात या मार्गावर झाले. त्यात अपवाद वगळता ठार होण्याच्या घटना अधिक घडल्या आहेत.  जून 2009 करंजोशी  मलकापूर येथे एस.टी. अपघातात 9 व्यक्ती ठार झाल्या होत्या. त्या नंतरचा या मार्गावरील 26 रोजीचा सर्वात मोठा अपघात आहे.

जून 2015 पुणे येथील कॉलेज तरुण-तरुणी कोल्हापूर येथून गणपतीपुळे येथे जात असताना तळवडे वळणावर मोठा अपघात झाला होता. त्यात पाच इंजिनिअर तरुण व तरुणींचा मृत्यू झाला होता.  आता जो अपघात झाला आहे त्यांच्या जवळपास हा आपघात झाला होता. जून 2016 मध्ये रत्नागिरी येथील मुस्लिम समाजातील लोक विशाळगडला जात असतांना मुस्लिम दाम्पत्यांसह 6 जन ठार झाले होते. जुलै 2017 वारुळ पुलावरून ट्रक खाली नदीत कोसळून चालक ठार.

पंधरा दिवसांपूर्वी या मार्गावरील केर्ले गावच्या वळणावर वाळूचा डंपर व मोटारसायकल अपघात यात सांगली जिल्ह्यातील दोन तरुण जागीच ठार झाले होते. तर वारुळ येथे कार व ट्रकची धडक होऊन या अपघातात सांगली येथील चार व्यक्ती ठार तर नेपाळ येथील एक व्यक्ती ठार झाली होती. तीन वर्षांपूर्वी वाकोली येथील एका वळणावर आरसेकर कुटुंबातील दोन व्यक्ती ठार झाल्या होत्या. एक वर्षापूर्वी गोगवे येथे इनिव्हा गाडी झाडावर आदळून तीन व्यक्ती ठार झाल्या होत्या. चार वर्षांपूर्वी बजागेवाडी फाटा येथे ट्रक-मोटारसायकल धडकेत रत्नागिरीचे पती-पत्नी ठार.  

दोन महिन्यांपूर्वी बांबवडे बाजार पेठेत भरधाव ट्रक घुसून एक ठार. अशा काही ठळक घटना या मार्गावरील  अपघाताच्या असून गेल्या चार वर्षांत शेकडो लोकांचा बळी या मार्गाने घेतला आहे. या रस्त्यावरील भाडळे खिंड त्या पुढचे वळण, खुटाळवाडी, डोणोली, बांबवडे, बजागेवाडी वळण, जुळेवाडी खिंड, करंजोशी मलकापूर, येळाणे-भोसलेवाडी, निळे वाल्लूर, वारुळ केर्ले, तळवडे या ठिकाणी अत्यंत धोकादायक मार्ग आहे.

दोन वर्षांपूर्वी  खुटाळवाडी लग्न वर्‍हाडाचा टेम्पो पलटी यात सात ठार अशा घटना या रस्त्यावरील अडचणीमुळे घडत आहे. या सर्व गोष्टींचा शासनाने त्वरित विचार करावा. हा मार्ग चौपदरीकरणासह त्वरित होणे गरजेचे, तसेच काही गावातून बायपास रस्ता होणे गरजेचे आहे.