Wed, Jun 26, 2019 17:29होमपेज › Kolhapur › तामगावला जोडणार्‍या पर्यायी रस्त्याची पाहणी

तामगावला जोडणार्‍या पर्यायी रस्त्याची पाहणी

Published On: Jul 03 2018 1:51AM | Last Updated: Jul 03 2018 1:16AMउजळाईवाडी : प्रतिनिधी

कोल्हापूर विमानतळ सुरक्षेच्या दृष्टीने उजळाईवाडी ते तामगाव नेर्ली कडे जाणारा रस्ता भारतीय विमान पत्तन प्राधिकरणाकडून लवकरच बंद करण्यात येणार असल्याने तामगाव-नेर्लीकडे जाण्यासाठी पर्यायी सुदर्शन पेट्रोल पंपापासून प्रचलित रस्त्याची पाहणी खा. धनंजय महाडिक, आ. अमल महाडिक, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, करवीर प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी सोमवारी केली.

भारतीय विमान पत्तन प्राधिकरणाकडून कोल्हापूर विमानतळाचे वेगाने काम चालू आहे. यासाठी सुमारे 274 कोटी चा विकास आराखडा मंजूर झाला असून, या विकास आराखड्याचा महत्त्वाचा टप्पा म्हणून सुमारे तीनशे हेक्टर जागेला सुरक्षा भिंत बांधल्याने काम चालू आहे. विमानतळाच्या सुरक्षा दृष्टीने उजळाईवाडीतून तामगाव नेर्लीकडे जाणारा रस्ता लवकर बंद करण्यात येणार असल्याने सोमवारी खा. धनंजय महाडिक, आ. महाडिक, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, करवीरचे प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी प्रथम कोल्हापूर कॅन्सर सेंटर जवळून पर्यायी रस्ता निघतो का, याची सर्कल मुकुंद निगम व तलाठी उदय लांबोरे तसेच ग्रामस्थांकडून जाणून घेतला.

परंतु, हा रस्ता सुरक्षा भिंतीला लागून वेडा-वाकडा जाणार असल्याने तसेच खासगी जागा लोकांकडून घ्यावी लागणार असल्याने हा रस्ता सोयीचा नसल्याचे दिसले. तसेच धावपट्टी पुढे वाढवण्यापेक्षा तामगाव कडील भाग जो ज्याच्यावर कोणतेही बांधकाम झालेली नाहीत, अशी जमीन शेतकर्‍यांकडून घेणे सोपे होईल, असा निर्णय घेऊन यासंदर्भात विमानतळ अधिकार्‍यांशी चर्चा करण्याचा निर्णय घेतला.

त्यानंतर सुदर्शन पेेट्रोल पंपापासून मौलाना आझाद नगरकडे जाणारा रस्ता व तेथून पर्यायी असलेले तामगाव तलावाजवळून एक पुढील व मागील बाजूचे दोन प्रचलित रस्ते कसे विकसित करता येतील, याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात लवकरच कार्यवाही करण्यात येईल, असे खा. धनंजय महाडिक यांनी सांगितले.