होमपेज › Kolhapur › पर्यायी पुल : खोदकाम थांबवले, ‘पिलर’चे डिझाईन बदलणार

पर्यायी पुल : खोदकाम थांबवले, ‘पिलर’चे डिझाईन बदलणार

Published On: Jun 12 2018 12:51AM | Last Updated: Jun 12 2018 12:44AMकोल्हापूर : प्रतिनिधी

पर्यायी पुलासाठी सुरू असलेले खोदकाम काही काळासाठी थांबविण्यात आले आहे. सुमारे 35 फुटांपेक्षा अधिक खोदकाम करूनही अपेक्षित दगड लागलेला नाही. नुसतीच माती लागत असल्याने ‘पिलर’चे डिझाईन बदलण्यात येणार आहे. त्याद‍ृष्टीने आराखडा तयार करण्यात येत असून, नवे डिझाईन बुधवारी मुंबई येथील राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कार्यालयात सादर केले जाणार आहे. यासह या परिसरातील दगडाचे नमुनेही तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत.

पर्यायी पुलासाठी खोदकाम सुरू आहे. मात्र, एका बाजूला मातीच लागत आहे. अपेक्षित पाया लागत नसल्याने खोदकाम सुरूच होते. रविवारी पाहणी झाल्यानंतर आज कोअर घेण्यात येणार होते. मात्र, आज सकाळी पुन्हा खोदकाम करण्यात आले. आणखी पाच फूट खोदाई झाली, तरी दगड लागला नाही. अखेर खोदकाम थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला.

तीन बाजूला दगड आणि एका बाजूला माती लागत आहे, त्याद‍ृष्टीने डिझाईन तयार केले जात आहे. हे डिझाईन बुधवारी मुंबईतील कार्यालयाला सादर केले जाईल, त्या कार्यालयाने या डिझाईनला मंजुरी दिल्यानंतर त्यानुसार पुन्हा आवश्यक ते खोदकाम सुरू केले जाईल, असे राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता विजय कांडगावे यांनी सांगितलेे.