Tue, Nov 20, 2018 18:02होमपेज › Kolhapur › दारू नको,  दूध प्या!; हुपरीत ३१ डिसेंबरला  दुधाचे वाटप

दारू नको,  दूध प्या!; हुपरीत ३१ डिसेंबरला  दुधाचे वाटप

Published On: Jan 02 2018 1:33AM | Last Updated: Jan 01 2018 11:23PM

बुकमार्क करा
हुपरी : वार्ताहर

31 डिसेंबर रोजी मद्यप्राशन करून व हिडीस नृत्य करून पाश्‍चात्त्य संस्कृतीचे अनुकरण करण्याला आळा घालून तरुणांना त्या दिवशी दुधाचे वाटप करण्याचा आदर्शवत उपक्रम हुपरी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी राबविला. यावेळी 3 हजार लिटर दुधाचे वाटप करण्यात आले. पोलिस ठाण्यात अबालवृद्धांनी मसाला दुधाचा आनंद घेतला. 

31 डिसेंबर रोजी रात्री मद्यप्राशन करून तरुणाई बेधुंदपणे पाश्‍चिमात्य संस्कृतीचे अनुकरण करते. त्यामुळे काही गैरप्रकारही घडतात. दारू पिऊन वाहने चालवल्याने अपघात घडतात. या प्रकारांना आळा घालण्यासाठी हुपरी पोलिसांच्यावतीने त्यादिवशी दूध वाटपाचा निर्णय घेतला होता. दारू नको, दूध प्या, असा संदेश देत पोलिसांनी तरुणांना दारूपासून परावृत्त केले.

सायंकाळी 6 ते 10 या वेळेत तरुणांना दूध वाटण्यात आले. यावेळी कलाकारांनाही व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले होते. नगरसेवक सूरज बेडगे, गणेश वाईंगडे, जयकुमार माळगे, राजेंद्र साळोखे, विनायक विभुते आदींनी दूध वाटपाचे नियोजन केले. नागरिकांनी यावेळी स.पो.नि. शिंदे यांचा सत्कार केला. ही संकल्पना राबवण्यासाठी पोलिस उपनिरीक्षक सतीश पाटील, पीएसआय सुशील गायकवाड, संतोष तेली यांच्यासह कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले.