Wed, Apr 24, 2019 11:29होमपेज › Kolhapur › दहावीच्या सर्वच विषयांच्या आता ‘कृतिपत्रिका’ 

दहावीच्या सर्वच विषयांच्या आता ‘कृतिपत्रिका’ 

Published On: Feb 27 2018 2:04AM | Last Updated: Feb 27 2018 12:20AMकोल्हापूर  :  प्रतिनिधी 

आगामी शैक्षणिक वर्षांत दहावीच्या सर्व विषयांची परीक्षा प्रश्‍नपत्रिकेऐवजी ‘कृतिपत्रिके’च्या आधारावर होणार आहे. अभ्यासातील ज्ञानरचनावाद परीक्षेतही यावा, या उद्देशाने राज्य सरकारने हा महत्त्वपूर्ण बदल करण्याचा निर्णय घेतला असून, त्यानुसार पाठ्यपुस्तकांच्या निर्मितीचेही काम हाती घेण्यात आले आहे. 

देशात शिक्षण हक्‍क कायदा लागू झाल्यापासून शिक्षणात ज्ञानरचनावादाला विशेष महत्त्व देण्यात आले. ज्ञानरचनावादामध्ये शिक्षकांनी शिकविण्यापेक्षा विद्यार्थ्यांना शिकण्यात मदत करणे यावर विशेष भर देण्यात येतो. त्यानुसार राज्य सरकारही पाऊले टाकत आहे. म्हणूनच परीक्षाभिमुख झालेल्या आपल्या शिक्षण व्यवस्थेला ज्ञानाभिमुख करण्यासाठी अभ्यासक्रमासोबतच परीक्षा पद्धतीही बदलण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार चालू शैक्षणिक वर्षात दहावीच्या भाषा विषयांच्या परीक्षेत बदल करण्यात आला आहे. 

आता पुढील शैक्षणिक वर्षात गणित, विज्ञान, इतिहास, भूगोल अशा सर्वच विषयांच्या प्रश्‍नपत्रिकांची जागा कृतिपत्रिका घेणार आहेत. या कृतिपत्रिका सोडविणे सुलभ व्हावे, यासाठी पाठ्यपुस्तकांमध्येही बदल करण्यात येणार असून, याचे 

काम अभ्यास समितींमार्फत सुरू आहे. अर्थात, हे बदल सर्व स्तरांवरील विद्यार्थ्यांचा विचार करूनच करण्यात आल्याचे या प्रक्रियेत सहभागी असलेल्या एका शिक्षकाने सांगितले. 

पाठांतरावर गुण मिळवणे कठीण

सध्याच्या प्रश्‍नपत्रिका शिक्षककेंद्रीत होत्या. कृतिपत्रिका या विद्यार्थीकेंद्रीत असतील. त्यामुळे विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांव्यतिरिक्‍तचे वाचनही करावे लागणार आहे. विद्यार्थ्यांच्या मताला या कृतिपत्रिकेत विशेष महत्त्व देण्यात येणार आहे. यामुळे केवळ पाठांतरावर गुण मिळवणे विद्यार्थ्यांना अवघड होणार आहे. एकूणच विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीस लागण्यास मदत होईल, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.