Sun, Jan 19, 2020 15:56होमपेज › Kolhapur › कोल्हापूर जिल्ह्यात युतीच्या सर्व जागा जिंकणार : चंद्रकांत पाटील

कोल्हापूर जिल्ह्यात युतीच्या सर्व जागा जिंकणार : चंद्रकांत पाटील

Published On: Jul 20 2019 2:09AM | Last Updated: Jul 20 2019 2:09AM
कोल्हापूर : प्रतिनिधी

आगामी विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यात युतीच्या सर्व जागा निवडून आणू, असा विश्‍वास भाजपचे नूतन प्रदेशाध्यक्ष ना. चंद्रकांत पाटील यांनी व्यक्‍त केला. प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर प्रथमच कोल्हापुरात आलेल्या ना. पाटील यांचे दसरा चौकात फटाक्यांची आतषबाजी करून जल्‍लोषी स्वागत करण्यात आले. यावेळी उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. योगेश जाधव, पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, आमदार अमल महाडिक उपस्थित होते.

कार्यकर्त्यांशी संवाद साधताना ना. पाटील म्हणाले, गडहिंग्लज येथील एका कार्यक्रमात आ. हसन मुश्रीफ म्हणाले की, मी भाजपमध्ये जाणार नाही. तेव्हा माझ्या भाषणात मी त्यांना सांगितले की, अजून वेळ गेलेली नाही. येणार्‍या विधानसभा निवडणुकीत युतीचे सरकार येणार हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही. पाच वर्षे सत्तेच्या बाहेर तुम्ही राहणार, तोपर्यंत तुम्ही म्हातारे व्हाल. त्यामुळे आताच निर्णय घ्या. तुमच्यासारखा सहृदयी व्यक्‍ती पक्षाला हवाय. ते आले तर त्यांचे स्वागत आहे; अन्यथा लोकसभा निवडणुकीत ज्या पद्धतीने आपण एकजुटीने काम केले तसेच काम पुन्हा करून पराक्रम घडवायचा आहे. वर्षानुवर्ष कोल्हापूर, हातकणंगले, सांगली, माढा यासारख्या जागा कायम काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षांकडे होत्या. त्या आता आपल्याकडे आल्या आहेत. यामध्ये आपले संघटन मजूबत होते. भाजप-शिवसेना एकत्रितपणे विधानसभा निवडणुका लढवणार आहेत. दोन्ही पक्षांचे उमेदवार निवडून आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम करून पुन्हा युतीचे उमेदवार निवडून आणायचे आहेत, असे आवाहन त्यांनी केले. 

प्रदेशाध्यक्षपदाची नवीन जबाबदारी स्वीकारत असताना पक्ष संघटन मजूबत करण्याबरोबरच सुसंस्कृत कार्यकर्ता घडवण्याला प्राधान्य देणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत यश मिळवण्याची जबाबदारी आहेच; पण  आपल्या भारतीय संस्कृतीला पुढे नेणारा कार्यकर्ता निर्माण करण्याची गरज आहे. संस्कृती म्हणजे देव, धर्म नव्हे, तर संस्कृती म्हणजे जगण्याचे नियम, दोन माणसांनी एकमेकांशी वागण्याचा व्यवहार आहे. पक्षनिष्ठेबरोबरच कार्यकर्त्यांनी सहृदयी व्हावे, आपापसात न भांडता जनेतेचे प्रश्‍न सोडवण्यासाठी भांडावे, अशी भारतीय संस्कृती प्रत्येक गावात पोहोचवण्याला आपले प्राधान्य राहणार आहे, असे ना. पाटील म्हणाले.

दरम्यान, भारतीय जनता पक्षाबरोबरच शहरातील विविध सामाजिक, राजकीय, सहकार, शैक्षणिक क्षेत्रांतील मान्यवरांनी ना. पाटील यांचे स्वागत केले. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. शौमिका महाडिक,  विजय जाधव उपस्थित होते. यावेळी ‘माझा दादा अध्यक्ष झाला’ हा फलक घेऊन घरेलू महिला संघटनेच्या कार्यकर्त्यांनी चंद्रकांत पाटील यांचे औक्षण करून स्वागत केले.  

‘संस्कृती बढाने के लिए आपको अध्यक्ष बनाया है’

महाराष्ट्राच्या प्रदेशाध्यपदी निवड झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोन आल्याचे सांगून ना. पाटील म्हणाले, ‘दादा, आपको महाराष्ट्र का प्रदेशाध्यक्ष बनाया है। पक्ष संघटन तो आप मजबूत करेंगे ऐसा मुझे विश्‍वास है; पर अपने देशकी संस्कृती बढाने के लिए आपको अध्यक्ष बनाया है। मुझे आशा है, ऐसा सुसंस्कृत कार्यकर्ता आप तयार करेंगे।’ मोदी यांनी दाखवलेल्या विश्‍वासास पात्र राहून आपण काम करणार आहे, असे ते म्हणाले.