Fri, Jul 19, 2019 07:52होमपेज › Kolhapur › जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाणी होणार स्मार्ट

जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाणी होणार स्मार्ट

Published On: Mar 23 2018 1:57AM | Last Updated: Mar 23 2018 12:55AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

जिल्ह्यातील सर्वच पोलिस ठाणी पायाभूत सुविधांसह अद्ययावत तंत्रज्ञानासह परिपूर्ण करण्यासाठी येत्या 1 मेअखेर जिल्ह्याची सारी पोलिस यंत्रणा स्मार्ट करण्यावर प्राधान्य देण्यात येत आहे, असे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील व पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. दैनंदिनी कामकाजात इंटरनेट सुविधांसह संगणकाचा वापर करण्यावर भर देण्यात येत आहे. असेही ते म्हणाले. 

शाहूवाडी उपविभागातील पोलिस ठाणी काही दिवसांत स्मार्ट होत आहेत. परिक्षेत्रांतर्गत सातारा जिल्ह्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील पोलिस ठाणी स्मार्ट करण्याचा प्रयत्न आहे. असेही त्यांनी सांगितले. 
 सुस्थितीत व प्रशस्त जागेसह सर्वसोयींनीयुक्‍त पोलिस ठाणी, स्वागत कक्ष, फर्निचर, स्वतंत्र मुद्देमाल कक्षासह शस्त्रसाठा, रेकॉर्डरूम, कर्मचार्‍यांसाठी विश्रांतीगृह, लॉकअपमध्ये पुरेशी हवा, स्वच्छतागृह, स्वतंत्र मुलाखत कक्षाचा अंतर्भाव असेल. समीर रूपलग, सेजल रूपलग या दाम्पत्याच्या सहकार्याने जिल्ह्यातील सर्वच पोलिस ठाण्याचे रूपडं बदलण्याचा प्रयत्न केला जात आहे.

पोलिस ठाण्यांतर्गत सीसीटीव्ही, सीटीएनएस प्रणालीच्या अनुषंगाने कॅस सॉफ्टवेअर व हार्डवेअरचा वापर करण्यावर भर देण्यात येणार आहे. इंटरनेट सुविधा, संगणकासह प्रिंटर, झेरॉक्स मशीन, फॅक्स मशीन, स्कॅनर या सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे.असेही ते म्हणाले.  स्मार्ट योजनेंतर्गत कायदा व गुन्ह्याची सत्यता पडताळून कार्यवाही करणे, विनाविलंब अर्जाची स्वीकृती, गुन्ह्याची तीव्रता कमी न करणे, कमीत कमी वेळेत घटनास्थळाची पाहणी करणे, अशिक्षित व कायद्याचे ज्ञान नसलेल्या तक्रारदारास योग्य सल्ला देणे, तक्रारदारास तक्रार नोंदविल्यानंतर प्रत देण्यासह शास्त्रशुद्ध पद्धतीने तपास करण्याबाबत अधिकारी, कर्मचार्‍यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

शांतता समित्यांची पुनर्रचना करा कोल्हापूर परिक्षेत्रातील कायदा-सुव्यवस्थेच्या अनुषंगाने कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर व पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षकांची विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी येथे बैठक झाली. चार तास चाललेल्या बैठकीत परिक्षेत्रांतर्गत शांतता-सुव्यवस्थेचा आढावा घेण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्‍वभूमीवर सूचना देण्यात आल्या. शहरासह जिल्ह्यातील शांतता समित्यांची पुनर्रचनेबाबत स्थानिक पातळीवर निर्णय घेण्यात यावेत, असेही विशेष पोलिस महानिरीक्षकांनी स्पष्ट केले.

Tags : Kolhapur, Kolhapur News, All police stations,  district, will be smart