Sat, Jun 06, 2020 20:43होमपेज › Kolhapur › गाडगीळ खून प्रकरणातील आरोपीचा मृत्यू; सीपीआरमध्ये डॉक्टरांना धक्काबुक्की

गाडगीळ खून प्रकरणातील आरोपीचा मृत्यू; सीपीआरमध्ये डॉक्टरांना धक्काबुक्की

Published On: Aug 11 2018 1:20AM | Last Updated: Aug 12 2018 1:01AMकोल्हापूर : प्रतिनिधी

पाचगावातील धनाजी गाडगीळ खून प्रकरणातील संशयित आरोपी अक्षय जयसिंग कोंडेकर (वय 33, रा. पाचगाव) याचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. गुरुवारी दुपारी सीपीआरमध्ये त्याला दाखल केले होते. अक्षयला मृत घोषित केल्याने काही संतप्त कार्यकर्ते डॉक्टरांच्या अंगावर धावून गेल्याने तणाव निर्माण झाला. चार दिवसांपासून त्याला त्रास होत असताना कळंबा कारागृहातील डॉक्टरांनी हलगर्जीपणा केल्याची तक्रार नातेवाईकांनी मानवी हक्क आयोगाकडे केली आहे.

पाचगावमधील ‘खून का बदला खून’ या सूडचक्रातून धनाजी गाडगीळ याचा 22 डिसेंबर 2013 मध्ये खून करण्यात आला. अशोक पाटील खून प्रकरणातील मुख्य संशयित डी. जे. ऊर्फ दिलीप जाधव याचा मेहुणा धनाजी गाडगीळ याचा पाचगावच्या प्रगतीनगर चौकात तलवार व गुप्तीने वार करून खून करण्यात आला होता. याप्रकरणी अशोक पाटील यांची मुले संशयित मिलिंद पाटील, महेश पाटील तसेच अक्षय कोंडेकर, निशांत माने, प्रमोद शिंदे, गणेश कलकुटगी यांना 23 एप्रिल 2018 रोजी आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली होती.

अक्षय कळंबा कारागृहातील बरॅक क्रमांक एकमध्ये होता. मंगळवारी  श्‍वासोच्छ्वासाचा त्रास झाल्याने त्याला कारागृहातील दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. प्रकृती अधिक खालावल्याने गुरुवारी दुपारी त्याला सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना शुक्रवारी सकाळी नऊच्या सुमारास त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

सीपीआर आवारात तणाव

अक्षयच्या मृत्यूची माहिती मिळताच नातेवाईक, मित्रपरिवार मोठ्या संख्येने सीपीआर आवारात जमले. अक्षय कोंडेकरच्या मृत्यूने अनेक मित्रांना धक्का बसला. डॉक्टरांनी तो मृत झाल्याचे सांगितल्यानंतर उपचारात हलगर्जीपणाचा आरोप करत काही जण डॉक्टरांच्या अंगावर धावून गेल्याने मोठा तणाव निर्माण झाला.

बंंदोबस्त नसल्याने...

चार दिवस श्‍वासोच्छ्वासाचा त्रास होत असल्याचे अक्षयने नातेवाईकांना सांगितले होते. दरम्यान, सात व आठ ऑगस्टला पोलिस मुख्यालयाकडून बंदोबस्त न मिळाल्याने अक्षयला सीपीआर रुग्णालयात नेण्यात आले नसल्याची माहिती कळंबा कारागृहाकडून देण्यात आली आहे.

मानवी हक्क आयोेगाकडे तक्रार

अक्षयने चार दिवसांपूर्वी प्रकृती ठीक नसल्याची तक्रार केली होती. वारंवार सांगूनही कारागृहातील डॉक्टर व अधीक्षक जाधव यांनी लक्ष दिले नाही. दोन दिवस उपचारात दिरंगाई केल्याने त्याची प्रकृती चिंताजनक बनल्याचा आरोप अक्षयचा भाऊ सागर इळके याने केला आहे. याप्रकरणी संबंधित डॉक्टर व जेेलरविरोधात मानवी हक्क आयोगाकडे तक्रार करण्यात असल्याचे इळके व अक्षयच्या कुटुंबीयांनी सांगितले.

पाचगावमध्ये कडेकोट बंदोबस्त

सायंकाळी अक्षयचा मृतदेह पाचगावमधील घरी नेण्यात आला. पाचगावमध्ये अंत्यसंस्कारावेळी मोठी गर्दी झाली होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.