Sun, Nov 18, 2018 09:22होमपेज › Kolhapur › अकोळकर, पवारला फरारी घोषित करा

अकोळकर, पवारला फरारी घोषित करा

Published On: Dec 23 2017 2:05AM | Last Updated: Dec 23 2017 12:36AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

ज्येष्ठ पुरोगामी नेते कॉ. गोविंद पानसरे यांचे मारेकरी सारंग अकोळकर, व विनय पवार यांना फरारी घोषित करण्यात यावे, अशी मागणी विशेष सरकारी वकिलांनी शुक्रवारी जिल्हा न्यायालयात केली.

कॉ. पानसरे खून खटल्याची जिल्हा न्यायाधीश (2) एल.डी.बिले यांच्यासमोर सुनावणी सुरू आहे. विशेष सरकारी वकील शिवाजीराव राणे यांनी युक्‍तिवादात अकोळकर, पवार अद्याप फरारी असल्याने तपास प्रक्रियेवर विपरित परिणाम होत असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.

कॉ. पानसरे हत्येप्रकरणात समीर गायकवाड, डॉ. वीरेंद्र तावडेसह अकोळकर, पवार यांच्या प्रत्यक्ष सहभागाचे पुरावे एसआयटी चौकशीत उघड झाले आहेत. मारेकर्‍यांना फरारी उद्घोषित करण्याचे निर्देश न्यायालयाने ऑगस्ट 2017 मध्ये दिले होते. तपास पथकासमोर हजर होण्यासाठी 30 दिवसांची मुदत देण्यात आली होती. संशयितांकडून आदेशाचे पालन झाले नाही. दोघांना फरारी घोषित करण्यात यावे, अशीही मागणी करण्यात आली.

फरारी उद्घोषित निर्देशाच्या अनुषंगाने सातारा जिल्हा पोलिस अधीक्षक व पुणे शहर पोलिस आयुक्‍तांनी मारेकर्‍यांच्या शोधार्थ बजाविलेल्या प्रसिद्धीकरणाचा अहवालही आज न्यायालयात सादर झाला. विशेष सरकारी वकिलांनी केलेल्या मागणीवर 4 जानेवारीला सुनावणी होणार आहे.

साडविलकरविरुद्ध कोर्टात खासगी फिर्याद दाखल

साक्षीदार संजय साडविलकर (रा. कोल्हापूर) यांच्या बेकायदा शस्त्र तस्करीची चौकशी होऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी समीर गायकवाड याने जुना राजवाडा पोलिसांकडे केली होती. तथापि, तक्रारीची दखल  घेण्यात आली नसल्याने गायकवाडच्या वतीने प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. ए. पवार यांच्या न्यायालयात आज गुन्हा खासगी फिर्याद दाखल करण्यात आली. त्यावरही 4 जानेवारीला सकाळी 11 वाजता सुनावणी होणार आहे.