Wed, Aug 21, 2019 19:03होमपेज › Kolhapur › ‘बी.वाय. दादा केसरी’चा अजय गुज्जर मानकरी

‘बी.वाय. दादा केसरी’चा अजय गुज्जर मानकरी

Published On: Feb 09 2018 2:18AM | Last Updated: Feb 08 2018 11:46PMमलकापूर : वार्ताहर

शाहूवाडी-पन्हाळा तालुक्याचे भाग्यविधाते माजी आमदार बाबासाहेब यशवंत पाटील - सरूडकर (दादा) यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त दादाप्रेमी जनता, अमृतमहोत्सव गौरव समिती व कुस्ती संयोजन समितीच्या वतीने आयोजित केलेल्या अव्वल दर्जाच्या कुस्ती मेदानात ‘बी. वाय. दादा केसरी’चा किताब दिल्लीचा मल्ल अजय गुज्जर याने पटकावला तर आमदार सत्यजित पाटील चषक श्रीकृष्ण आखाड्याचा मल्ल योगेश पवार याने पटकावला.

आखाड्याचे पूजन माजी आमदार बाबासाहेब पाटील-सरूडकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार सत्यजित पाटील, युवा नेते युवराज पाटील, जि.प. सदस्य हंबीरराव पाटील, विजय बोरगे, उपसभापती दिलीप पाटील, माजी जि. प. सदस्य नामदेव पाटील-सावेकर, ‘उदय’चे संचालक प्रकाश पाटील, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष सर्जेराव पाटील-मानकर आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रथम क्रमांकाची कुस्ती पै. मारुती जमदाडे (गंगावेश) विरुद्ध अजय गुज्जर (दिल्ली) यांच्यात प्रारंभी दोघांच्यात झटापट झाली. अवघ्या एका मिनिटातच अजय गुज्जरने माऊलीला समोरून लफेट डावावर पराभूत करून विजय मिळवला तर द्वितीय क्रमांकाची लढत पै. बाला रफिक (न्यू मोतीबाग) विरुद्ध योगेश पवार यांच्यात झाली. रफीक व पवार हे दोघेही मल्ल डाव-प्रतिडाव करत अखेर योगेश पवारने समोरून आखाडी डावावर बाला रफिकला आस्मान दाखवले. प्रथम व द्वितीय क्रमांकाच्या कुस्त्या चटकदार झाल्याने कुस्तीशौकिनांच्या डोळ्यांचे पारणे फिटले.

तिसर्‍या क्रमांकाची लढत पै. विलास डोईफोडे (सह्याद्री कुस्ती संकुल, पुणे) व योगेश बोंबाळे यांच्यात सुमारे दहा मिनिटे सुरू होती. अखेर विलास डोईफोडेला पोकळ घिस्सा डावावर योगेश बोंबाळेने धोबीपछाड केले. चौथ्या क्रमांकाची कुस्ती पै. सोनुकुमार (हरियाणा) व गणेश जगताप (सह्याद्री कुस्ती संकुल, पुणे) यांच्यात सुरू झाली. दोघांच्यात सुमारे पंचवीस मिनिटे झटापट सुरू होती. अखेर पंचांनी ही कुस्ती बरोबरीने सोडविली. पाचव्या क्रमांकाची कुस्ती मनिषकुमार (दिल्ली) विरुद्ध विष्णू खोसे (सह्याद्री कुस्ती संकुल, पुणे) यांच्यात रंगली. सुमारे दहा मिनिटे चाललेली कुस्ती विष्णू खोसे याने गुणावर जिंकली.

सहाव्या क्रमांकासाठी पै. कार्तिक काटे (कर्नाटक केसरी) व पै. आतिष मोरे (सह्याद्री कुस्ती संकुल, पुणे) यांच्यात झाली. प्रारंभी दोघांनी आपल्या ताकदीचा अंदाज घेत कार्तिक काटेने समोरून ढाक डावावर तिसर्‍या मिनिटातच आतिष मोरेला आस्मान दाखवले. सातव्या क्रमांकाची लढत पै. विजय धुमाळ (मोतीबाग) व संग्राम पाटील (शाहू कुस्ती केंद्र) यांच्यात सुमारे 12 मिनिटांच्या झटापटीनंतर अखेर विजय धुमाळने विजयी मिळवला. आठव्या क्रमांकासाठी पै. राजेंद्र राजमाने (सह्याद्री कुस्ती संकुल, पुणे) विरुद्ध पै. शिवाजी पाटील (वारणा कापशी) यांच्यात झाली. तिसर्‍या मिनिटाला शिवाजी पाटील यास पोकळ घिस्सा डावावर राजमानेनी चितपट केले. या अव्वल दर्जाच्या कुस्त्यांसाठी संयोजकांनी लाखोचा इनाम विजय मल्लांना दिला.

अन्य विजयी मल्ल असे ः प्रथमेश पाटील (कोपार्डे), ओम भोपळे (मलकापूर), नीलेश कणदूरकर (बांधेवाडी), बाजीराव माने (वाकुर्डे), संदेश मगदूम (शित्तूर वारुण), विशाल काटे (पुणे), बाबुराव कोलते (पेरीड), धीरज पवार (शिवारे), अमर पाटील (कापशी), समीर शेख (न्यू मोतीबाग), सौरभ खामकर (सरूड), नवनाथ इंगळे (न्यू मोतीबाग), सिद्धनाथ ओमणे (न्यू मोतीबाग), विकास पाटील (मांगरूळ), तानाजी विणकर (आटपाडी), आदिनाथ पाटील (न्यू मोतीबाग), दत्ता नरळे (गंगावेश), रवी शेंडगे (टेंबुर्णी), सूरज यादव (पेरीड), अक्षय पाटील (म्हाळसवडे), चंद्रकांत रोडे (पाटणे), शरद साळुंखे (शिंपे) आदी सुमारे 75 हून अधिक चटकदार कुस्त्या झाल्या.

पंच  म्हणून पोलिस उपअधीक्षक संभाजी मगदूम, दादा आळवेकर, रामचंद्र साळुंखे, समिंधर जाधव, वसंत पाटील, संपत पाटील, चंद्रकांत पाटील, प्रकाश काळे, भीमराव यांनी कामकाज पाहिले. समालोचन शंकर पुजारी, संतोष कुंभार व आनंदा केसरे यांनी केले.

मान्यवरांची मैदानात उपस्थिती
उद्योगपती महादेवराव महाडिक, आमदार शंभुराजे देसाई (पाटण), वैभव नाईक (कणकवली), प्रकाश आबिटकर (भुदरगड), उल्हास पाटील (शिरोळ), रमेश लटके (मुंबई), उदय साखरचे चेअरमन मानसिंगराव गायकवाड, युवा नेते रणवीरसिंह गायकवाड, युवा नेते युवराज पाटील, जि. प. सदस्य हंबीरराव पाटील, विजय बोरगे, उपसभापती दिलीप पाटील  यांच्यासह राजकीय, क्रीडा क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

अपघातग्रस्त मल्लांच्या कुटुंबीयांना मदत
वांगी येथे झालेल्या अपघातातील मृत्यू झालेल्या मल्लांच्या कुटुंबीयांना कुस्ती संयोजन समितीने दहा हजार रुपयांची मदत केली.मैदान यशस्वीतेसाठी बाजीराव कळंत्रे, विजय कारंडे, सर्जेराव पाटील-मानकर, सुधाकर पाटील, ‘उदय’चे संचालक प्रकाश पाटील, नामदेव पाटील, आनंदराव भेंडसे आदींनी परिश्रम घेतले.