Fri, Jul 19, 2019 23:19होमपेज › Kolhapur › आजर्‍याच्या निसर्गसंपदेला गुन्हेगारीचा शाप..?

आजर्‍याच्या निसर्गसंपदेला गुन्हेगारीचा शाप..?

Published On: Mar 06 2018 12:38AM | Last Updated: Mar 05 2018 10:58PMआजरा : प्रतिनिधी

जिल्हाच्या एका टोकाला असणारा डोंगराळ व निसर्गसंपन्‍न तालुका अशी ओळख असणार्‍या आजरा तालुक्याच्या पश्‍चिम भागामध्ये घडणार्‍या अनेक गुन्हेगारी स्वरूपाच्या घटना आता निसर्गसंपदेला शाप ठरू लागल्या आहेत. मार्च 2016 मध्ये बिल्डर अमोल पवार याने विम्याची बडी रक्‍कम मिळविण्यासाठी रमेश नाईक याची हत्या करून आपल्याच मृत्यूचा केलेला बनाव व त्यानंतर अभय कुरुंदकर याच्याकडून सहायक पोलिस निरीक्षक अश्‍विनी बिंद्रे यांची केली गेलेली हत्या यामुळे आजरा आता वेगळ्याच अर्थाने चर्चेत येऊ लागले आहे. 

आजरा तालुक्याच्या पश्‍चिम भागामध्ये असणारी मुबलक नैसर्गिक संपन्‍नता, जवळच असणारे कोकण, गोव्याला जाणारा जवळचा मार्ग यामुळे आजरा-आंबोली मार्गावर बड्या अधिकार्‍यांनी, राजकीय मंडळींनी मोठ्या प्रमाणावर जमिनी खरेदी करून फार्महाऊस उभा केली आहेत. या मार्गावर असणारे घनदाट जंगलामुळे अगदी आंबोलीपर्यंत वेगवेगळ्या गुन्हेगारी स्वरूपाच्या घटना वेळोवेळी घडल्याचे निष्पन्‍न होत आहे. नेहमी या मार्गावर प्रवास करणार्‍या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या मंडळींकडून छोटा-मोठा गुन्हा करून तो सहजपणे दडपण्यासाठी आता या मार्गाचा वापर होऊ लागला आहे. 

वन्य प्राण्यांच्या कातड्यांची तस्करी, सर्प विषाची तस्करी, कागल व निपाणी येथील तरुणांकडून या मार्गवर प्रवास करणार्‍या बड्या व्यापार्‍यांना बंदुकीचा धाक दाखवून केलेली लूटमार, पिंग आयर्नच्या गाड्यांची झालेली लूट, अमोल पवार याच्याकडून करोडोंची विमा भरपाई मिळविण्यासाठी स्वतःच्याच मृत्यूचा बनाव करून रमेश नाईक या निष्पाप तरुणाचा घेतलेला बळी व सध्या महाराष्ट्रभर चर्चेत असलेल्या अश्‍विनी बिंद्रे या महिला सहायक पोलिस निरीक्षकाच्या हत्येशी याच परिसरातील हाळोली येथील कुरुंदकर याच्या फार्महाऊसशी जोडला गेलेला संबंध, नवी मुंबई पोलिसांच्या हाळोली येथे वारंवार होत असणार्‍या भेटी हे सर्वच धक्कादायक आहे. 

वास्तविक अमोल पवार प्रकरण, वन्यप्राणी कातडी तस्करी प्रकरणे, वाटमारी प्रकरणे, सर्प विष प्रकरण, अंमली पदार्थ तस्करी प्रकरण यातील प्रमुख संशयित यांचा आजरा तालुक्याशी काहीही संबंध नव्हता. कुरुंदकर याच्या बाबतीतही हाच प्रकार आहे. त्याने 12 वी पर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर नोकरीनिमित्त बाहेरगावी होता. 

शैक्षणिक कालावधी आजरा तालुक्यात गेल्याने त्याचा स्थानिक मित्रपरिवार मात्र खूप मोठा राहिला आहे. त्याच्या फार्महाऊसवरील पार्ट्यांची चर्चा आता होऊ लागली आहे. महाराष्ट्रातील एका बड्या नेत्याचे कुटुंबीय प्रतिवर्षी सुट्टीकरिता त्याच्या फार्महाऊसवर येत होते. याच नेत्याच्या अप्रत्यक्ष पाठबळावर त्याची वाटचाल सुरू होती. यापूर्वी घडलेल्या इतर घटना व बिंद्रे प्रकरण यामध्ये मोठा फरक आहे. या प्रकरणामध्ये स्थानिक महेश फळणीकर याच्यासह अनेकांची नावे पुढे येऊ लागली आहेत. 

निमित्त पर्यटनाचे... शोध गुन्हे लपविण्याचा जागांचा

आजरामार्गे कोकण, गोव्याला ये-जा करणार्‍या पर्यटकांची संख्या प्रचंड आहे. आजर्‍यासह आंबोली येथे अनेक धक्‍कादायक अशा हत्यांच्या घटना उघडकीस येत आहेत. पर्यटनाच्या निमित्ताने येणारे गुन्हेगारी स्वरूपाचे पर्यटक गुन्हे लपवता येतील अशा स्वरूपाच्या जागांची वेळोवेळी रेकी करून येथील परिसराचा गुन्हा लपविण्यासाठी वापर करत असल्याचे उघडकीस आलेल्या विविध गुन्ह्यावरून स्पष्ट होत आहे.