होमपेज › Kolhapur › विरोधकांनी सत्तापरिवर्तनाची स्वप्ने पाहू नयेत

विरोधकांनी सत्तापरिवर्तनाची स्वप्ने पाहू नयेत

Published On: Jan 09 2018 1:33AM | Last Updated: Jan 08 2018 11:09PM

बुकमार्क करा
आजरा : प्रतिनिधी 

आजरा साखर कारखाना गेले 61 दिवस सुरू आहे. त्यातील टर्बाइनच्या तांत्रिक अडचणींने बारा दिवस बंद होता. त्यावर मात करून देखील हंगाम सुव्यवस्थित व नियोजनबद्ध पद्धतीने सुरू असताना, काही असंतुष्ट विरोधी संचालक आपल्या तालुक्यातील ऊस बाहेरील कारखान्याला घालण्याचा प्रयत्न करीत आहेत. या संचालकांचे नेतृत्व करणार्‍या मंडळीही जाणूनबुजून कारखाना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. पत्रकबाजी करून सत्तापरिवर्तनाची स्वप्ने विरोधकांनी पाहू नयेत, असे आजरा कारखान्याच्या दहा सत्ताधारी संचालकांनी स्पष्ट करत विरोधकांच्या पत्रकबाजीचा निषेध नोंदवला आहे. कारखान्याची गाळप क्षमता 2500 मे. टन इतकी असून 3 हजार मे. टन गाळप सुरू आहे. 

आज अखेर कारखान्यातून 1 लाख 60 हजार मे. टन उसाचे गाळप झाले आहे. 140 बीडच्या टोळ्या व स्थानिक 100 टोळ्यांच्या माध्यमातून ऊसपुरवठा सुरू आहे. स्थानिक टोळ्यांचे 250 करार असतानाही 150 टोळ्या अद्याप आलेल्या नाहीत. असे असतानादेखील अध्यक्ष व सत्ताधारी संचालक मिळून कारखान्यास ऊसपुरवठा करण्याबाबत नियोजन केले आहे. शेतकर्‍यांची ऊस बिले, कर्मचार्‍यांचे पगार ज्या-त्या वेळी अदा केली आहेत असे असताना विरोधकांकडून सभासदांची दिशाभूल करणारी पत्रकबाजी सुरू आहे. परंतु, कारखान्याच्या अध्यक्षांच्या पाठीशी आपण दहा संचालक असून विरोधकांनी हे प्रकार थांबवावेत, असे आवाहनही या संचालकांनी केले आहे. 

या प्रसिद्धी पत्रकावर अध्यक्ष अशोक चराटी, उपाध्यक्ष आनंदराव कुलकर्णी, दिगंबर देसाई, मारुती घोरपडे, राजेंद्र सावंत, सुनीता रेडेकर, जनार्दन टोपले, दशरथ अमृते, मलिककुमार बुरुड, आनंदा कांबळे यांच्या सह्या आहेत.